computer

जगातला सर्वात महागडं ‘पार्किंग’...महागडं असण्यासारखं काय आहे या जागेत ?

(प्रातिनिधिक फोटो)

हॉंगकॉंग शहर जगातलं सर्वात महागडं शहर म्हणून ओळखलं जातं. ‘हमे सस्ती चीजों का शौक नही’ हा दुनियादारीतला डायलॉग या शहरावर अगदी फिट बसतो. जगात कुठेही नसेल एवढी महागडी घरं आणि ऑफिसेस हॉंगकॉंगमध्ये आहेत.२०२० मध्ये झालेल्या एका मोठ्या व्यवहारामुळे तर हॉंगकॉंगमध्ये जगातलं सर्वात महागडं पार्किंग स्पॉट पण आहे.

(दि सेंटर)

मंडळी, ही पार्किंग हॉंगकॉंगच्या ७३ मजल्यांच्या ‘दि सेंटर’ बिल्डींगमध्ये आहे. ही जागा १३४.५ स्क्वेअर फुट एवढी मोठी आहे. ती मिळवण्यासाठी खरेदी करणाऱ्याने तब्बल ९६९००० डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयाप्रमाणे जवळजवळ ६,८८,०६,०७३ एवढी मोठी रक्कम मोजली आहे.

पार्किंग स्पॉटचे पूर्वीचे मालक जॉनी चेउंग यांनी खरेदी करणाऱ्याचं नाव उघड केलेलं नाही. एका बातमीप्रमाणे शेजारच्या बिल्डींगमध्ये त्या व्यक्तीचं ऑफिस आहे.

दि सेंटर नावाची ही बिल्डींग सर्वात महागडी व्यावसायिक इमारत म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी अनेक महत्त्वाची ऑफिसेस आहेत. दि डार्क नाईट या सिनेमातली काही दृश्य याच बिल्डींगमध्ये चित्रित करण्यात आली होती.

या सर्व कारणांनी अर्थातच या जागेची किंमत अनेकपटीने वाढली आहे. अशा ठिकाणी पार्किंग स्पॉटला एवढी किंमत मिळावी यात नवल काय. नवल तर या गोष्टीचं आहे की सध्या हॉंगकॉंगमध्ये जागेच्या किमतीवरून राजकारण पेटलेलं असूनही ही पार्किंग एवढ्या मोठ्या किमतीला विकली गेली कशी?

मंडळी, ही महागडी दुनिया सध्या आतून खदखदत आहे. हॉंगकॉंग मधल्या आकाशाला भिडणाऱ्या जागेच्या भावावरून सध्या राजकारण पेटलेलं आहे. लहानसहान उद्योगधंदे जागेच्या अव्वाच्यासव्वा भाड्यामुळे बंद पडत आहेत. एवढंच नाही तर नागरिकांना घर घेणंही कठीण झालं आहे. या सर्वात आर्थिक मंदीची भर पडली आहे.

आता तुम्हीच सांगा, जगातलं सर्वात महागडं पार्किंग हॉंगकॉंगमध्ये आहे याचा हॉंगकॉंगवाल्यांनी आनंद मानायचा की दुःख?

सबस्क्राईब करा

* indicates required