computer

आधारकार्ड लीक झाल्याने हा गिरगावकर भोगतोय जिवंतपणीच नरकयातना!!

आधारकार्डमध्ये आपली पूर्ण कुंडली असते. ही माहिती जर उघड झाली किंवा आपल्या आधारकार्डचा वापर जर चुकीच्या पद्धतीने कोणी केला, तर मोठं संकट ओढवू शकतं. हे खरोखर एका व्यक्तीसोबत घडलं आहे. आज आपण त्याचीच गोष्ट वाचणार आहोत.

गिरगाव येथे राहणारा अमेय ढापरे या व्यक्तीचे आधारकार्ड कोण्या अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन लीक केले होते. त्यानंतर अनेकांनी या आधार कार्डचा जमेल तेवढा वापर केला. मोबाईलचे सीम कार्ड्स घेण्यासाठी, बँक अकाऊंट उघडण्यासाठी, ऑनलाईन खरेदी करण्यासाठी अशा अनेक कारणांनी या आधारकार्डचा वापर झाला आहे. नेमकं काय घडलं हे आता जाणून घेऊया.

अमेयला २०१२ साली आधारकार्ड मिळालं. ३ वर्षानंतर त्याच्या घरी पुण्याचे पोलीस आले. एका महिलेला फोनवरून त्रास देत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. अमेयला याबद्दल काहीच माहित नव्हतं. त्याला पुण्याला जाऊन आपली जबानी नोंदवावी लागली. तपासात आढळलं की कोणत्या तरी अज्ञाताने त्याच्या आधारकार्डचा वापर करून सीम कार्ड खरेदी केले होते.

या घटनेनंतर अमेयला वाटलं की हे प्रकरण इथेच संपलं. मात्र २०१७ साली जेव्हा तो बँकेत अकाऊंट उघडायला गेला तेव्हा त्याला समजलं की त्याचे आधारकार्ड आधीच एका बँक अकाऊंटला जोडलेला आहे.  

अमेयने गुगलवर आपली माहिती शोधल्यावर सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. कोणीतरी त्याच्या आधारकार्डची कॉपी वेगवेगळ्या वेबसाईट्सवर पोस्ट केली होती. पुढे याहून धक्कादायक प्रकार घडला. त्याचा आधारकार्ड वापरून कोणीतरी ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर अकाऊंट उघडलं होतं. या अकाऊंटवरून महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता येतील असं खोटंनाटं सांगून अनेकांना चुना लावण्यात आला होता. लवकरच अमेयच्या घरासमोर फसवल्या गेलेल्या लोकांची रांग लागली. अमेयकडून ते पैशांची मागणी करू लागले. काहींनी तर त्याला दमही दिला.

अमेयने शेवटी आधारकार्ड जारी करणाऱ्या Unique Identification Authority of India (UIDAI) कडे तक्रार दाखल केली. UIDAI कडून सांगण्यात आलं की कोणाचाही आधारकार्ड क्रमांक बदलता येऊ शकत नाही. एक उपाय म्हणजे आधारकार्ड बंद (de-activate) करणे. पण हा पर्याय शक्य नव्हता, कारण अमेयनेही आधारकार्ड अनेक ठिकाणी जोडलेले होते. याखेरीज त्याला प्रत्येक गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आलं. या गुन्ह्यांची यादी एवढी मोठी होती की प्रत्येकाबद्दल माहिती देणं शक्यच नव्हतं.

यानंतर अमेयने सायबर क्राईम पोलीस स्टेशन गाठलं. सायबर क्राईम पोलिसांना त्याने आपल्या आधारकार्डची कॉपी इंटरनेटवरून काढायची विनंती केली. सायबर क्राईम पोलिसांनासुद्धा यात यश आलं नाही. सायबर पोलिसांकडून ही केस स्थानिक पोलिसांकडे गेली, पण तिथूनही पाहिजे तेवढी मदत मिळाली नाही.

अमेयच्याच शब्दात सांगायचं झालं तर ‘अनेक फोन कॉल्स आणि मेसेज व्यतिरिक्त मला दरदिवशी २-तीन ‘ऑथेंटिकेशन फेल्युअर’चे इमेल्स येतात. याचा अर्थ कोणी ना कोणीतरी माझा आधारकार्ड वापरण्याचा प्रयत्न करत असतो. झारखंड, पंजाब, हरयाणा अशी भलीमोठी यादी आहे.’ पुढे तो म्हणतो की ‘मी घरी नसतानाही अनोळखी माणसं येतात. माझ्या घरी लहान मूल आहे. मला भीती वाटते’ 

अमेयची गोष्ट इथेच संपलेली नाही. त्याचे आधारकार्ड जोवर इंटरनेटवर आहे तोवर त्याला सुखाने जगता येणार नाही. त्याचे आधारकार्ड इंटरनेटवरून कायमचे जाईल अशी कोणती चिन्हंही दिसत नाहीत. अमेयच्या गोष्टीवरून आपण एवढाच बोध घेऊ शकतो की आपली महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक ठेवली पाहिजेत.

हे इंटरनेटवर घडलं असलं तरी प्रत्यक्ष आयुष्यातही असं घडू शकतं आणि थोड्या खबरदारीने पुढचे धोके टाळता येतात. आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा अशा महत्त्वाच्या फोटोकॉपीज म्हणजेच शुद्ध मराठीत झेरॉक्स गहाळ करू नका. या फोटोकॉपीज कुठेही देताना त्यावर कशासाठी देत आहोत ते कारण आणि तारीख टाकावी. उदा. मुलाच्या शाळेच्या ऍडमिशनसाठी, ३०/१२/२०१९. कधी झेरॉक्स काढून देणारा कॉपी चांगली आली नाही असं कारण देऊन एक कॉपी त्याच्या कचऱ्यात टाकतो आणि दुसरी आपल्याला देतो, ती वाईट झेरॉक्सही तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या. 

त्याचं असं आहे की डिजिटल जगापासून आपण अलिप्त राहू शकत नाही. ते चांगल्या रीतीने वापरलं तर वरदान,नाहीतर या अमेय ढापरेसारखं शापही वाटू शकतं. काळजी घेणं आणि सतर्क राहाणं इतकंच आपल्या हाती आहे.

 

संदर्भ

१. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/man-endures-living-hell-as-aadhaar-card-is-put-online/articleshow/73038561.cms

२. https://www.moneylife.in/article/aadhaar-nightmares-coming-true-how-ameya-dhapre-is-enduring-living-hell-with-his-aadhaar-report/59034.html

३. https://www.moneycontrol.com/news/india/living-hell-says-techie-whose-aadhaar-card-image-was-shared-online-4783181.html

४. https://www.timesnownews.com/mirror-now/crime/article/mumbai-threats-intimidation-police-follow-after-computer-engineers-aadhar-card-posted-online/534112

५. https://www.freepressjournal.in/mumbai/my-life-has-become-hell-computer-engineer-whose-aadhaar-card-copy-is-put-online

 

सबस्क्राईब करा

* indicates required