१३ वर्षांच्या मुंबईकर फॅनने वाहिलीय कलाकाराच्या पहिल्या मृत्यूला तितकीच कलात्मक आदरांजली!!

एका कलाकारासाठी कला किती महत्त्वाची असते हे सांगूनही कळणार नाही. अमेरिकन डान्सर मार्था ग्रॅहमचं एक वाक्य आपल्याला हे समजून घेण्यासाठी कदाचित मदत करु शकेल. ती म्हणते, "कलाकार दोन वेळा मृत्यू पावतो, दुसऱ्यांदा तो सरणावर जळतो ते लोकांसाठी वेदनादायी असते आणि जेव्हा आपली कला सादर करू शकत नाही पहिल्यांदा तो मरतो. हा मृत्यू त्याच्यासाठी अतिशय क्लेशदायक असतो".
आज आम्ही गोष्ट घेऊन आलोय असा पहिला मृत्यू झालेल्या कलाकाराची आणि कलेवर तितकंच प्रेम करणाऱ्या लोकांनी त्या मृत्यूला दिलेल्या आदरांजलींची.
त्या कलाकाराचं नाव आहे वेंडी वेल्हान. वेंडी वेल्हान ही १९८९च्या काळातली ती उत्कृष्ट नर्तिका होती. सलग अठ्ठावीस वर्षे ती काम करीत होती. या क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा अमाप मिळतो, मानसन्मान मिळतात. अर्थातच हे सर्व वेंडीला तिच्या नृत्यकौशल्यामुळे मिळत होते. पण तेव्हाच अचानक एकदा नृत्याच्या सरावादरम्यान तिच्या मांडीचे स्नायू दुखावले. असह्य वेदना होत असतानाही तीने नृत्य सोडले नाही. आणि शेवटी जे व्हायचे तेच झाले. तिच्या मांडीचे आणि कमरेचे स्नायू कायमचे फाटले. आधुनिक उपचार करूनही शरीराने प्रतिसाद दिला नाही आणि ती कायमची अपंग झाली... आणि पहिला मृत्यू ती आता जगते आहे.
वेंडीच्या पहिल्या मृत्यूला बीटीएस ग्रुप नावाच्या जगप्रसिद्ध कोरियन म्युझिक ग्रुपने आदरांजली वाहिली आहे. त्या ग्रुपने हल्लीच वेंडीसाठी एक ब्लॅक स्वान (black swan) गाणं सादर केलंय. या ब्लेक स्वान गाण्याने गाण्याच्या विश्वात अक्षरशः धुमाकूळ घातलाय.बीटीएस ग्रुपने कलाकाराचा अनपेक्षित पहिला मृत्यू आणि त्यातली जीवघेणी वेदना या गाण्यात मूर्तिमंतपणे उभी केली आहे.
(ब्लॅक स्वान)
हे गाणे ऐकून एका मुंबईतल्या फॅनने म्हणजे शांखिनी निक्षेने त्या नर्तकी एक आदरांजली दिली आहे. शांखिनीने वेंडीचे ब्लॅक स्वानमध्ये दाखवलेले चित्र रेखाटले आहे. तुम्हांलाही न राहवून या फॅनच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटेल.
या चित्रात सुंदर नर्तिका तिच्या नृत्यमुद्रेत दाखवली आहे. दागिने आणि मुकुट तिचे ऐश्वर्य आणि संपन्नता दाखवतात, पण त्याचबरोबर तिच्या डोळ्यात अश्रूही आहेत. प्रगतीचा सोपान रक्ताळलेला नि वेदनादायी आहे. भकास अशी रंगसंगती वापरली आहे. विखुरलेले काळ्या राजहंसाचे पंख जमिनीवर पडताहेत. शक्यतो कलाकाराचा वेदनादायी पहिला मृत्यू तिने चित्राच्या माध्यमातून दाखवायचा तिने प्रयत्न केला आहे.

(शांखिनी निक्षे)
दुसऱ्यांच्या वेदना उमगणं म्हणजे माणूस होण्याच्या दिशेने आपले चिमुकले पाऊल या चित्रात दिसत आहे.