'होम क्वारंटाइन’ असताना वजन आटोक्यात कसं ठेवाल?
कोरोना व्हायरसपासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे आणि घरातच क्वारंटाइन म्हणजे विलग होणे आवश्यक आहे. पण गेले तीन-चार दिवस घरात बसून आहात आणि आता पुढचे आणखी दोन-तीन आठवडे घरातच बसून राहायची वेळ आलेली असताना ‘हवं ते खात’ सुटू नका. कारण जेव्हा आपण अधिकाधिक वेळ घरातच बसून राहतो तेव्हा एकतर वारंवार भूक लागते आणि दुसरीकडे, शरीराला कोणताच व्यायाम नसल्याने वजन वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोरोनापासून तर दूर रहाल पण वजन वाढल्यामुळे दुस-याच काही आजारांना निमंत्रण देऊन बसाल!
हे जर टाळायचं असेल, तर पुढचे काही दिवस पुढील काळजी आवर्जून घ्या.
न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन डाॅ. स्नेहल अडसुळे ह्यांनी सांगितलेल्या टिप्स :
आहारात प्रथिनांचा समावेश करा -
जेव्हा वजन कमी करायचं असतं, तेव्हा न्यूट्रिएंट्समध्ये प्रोटिन्सला म्हणजे प्रथिनांना राजा मानलं जातं. तुमचं पोट भरताना पुरेशी प्रथिनं तुमच्या शरीरात जातील, ह्याची काळजी आवर्जून घ्या.
आरोग्यदायी स्नॅक्स खा-
घरी बसून किंवा नेटफ्लिक्सवर वेबसीरीज बघून कंटाळा आला की, आपले हात आपोआप स्नॅक्सवर जातात. अरबट-चरबट स्नॅक्स चवीला चांगले लागले तरी शरीराला ते अपायकारकच. शिवाय, ते खाल्ल्यामुळे वजन वाढणार ह्याची ग्यॅरंटीच. म्हणून योगर्ट, फळं, नट्स, गाजर, उकडलेली अंडी ह्यांचा तुमच्या स्नॅक्समध्ये समावेश करा.
साखरेवर लक्ष असू द्या-
घरी आहात म्हणून उठ-सूठ चहा पिऊ नका. चहामधून तुमच्या शरीरात अतिरिक्त साखर जाऊ शकते. संपूर्ण दिवसभरात तुमच्या शरीरात दोन चमच्यांपेक्षा अधिक साखर जाणार नाही, ह्याची काळजी घ्या.
पाणी प्या-
भरपूर पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, हा दावा सत्य आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक काही सांगण्याची गरज नाही. अधूनमधून पाणी पित रहा. कोमट पाणी प्यायलात तर आणखी उत्तम.
लिक्विड कॅलरीज आणि व्हाइट रिफाइन्ड कार्ब्ज टाळा-
साॅफ्ट ड्रिंक्स, फ्रूट ज्यूस, चाॅकलेट मिल्क, एनर्जी ड्रिंक्स ह्यांमधून शरीरात लिक्विड कॅलरीज जातात आणि व्हाइट ब्रेड, पास्ता, पेस्ट्री, मिठाई ह्यांमधून रिफाइन्ड कार्ब्ज. शक्यतो ह्यांचं सेवन टाळा.
ध्यान करा आणि पुरेशी झोप घ्या-
कोरोनाच्या भितीच्या सावटाखाली आपण सर्वजण जगत असताना मन शांत राहणं किंवा तसं ते जाणीवपूर्वक ठेवणं हे सोपं नाही, ह्याची मला कल्पना आहे. पण कोरोनाविषयी अधिक विचार करणं किंवा त्याविषयी चिंता करत बसणं, ह्यामुळे तुम्हाला कोणताही लाभ होणार नाहीए. हा ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ का होईना, पण नियमित ध्यानधारणा करा. झोपही पुरेशी घ्या.
व्यायाम करा-
घरातच असलात तरी अॅक्टिव्ह रहा. सूर्यनमस्कार, योगासनं किंवा दोरीच्या उड्या हे व्यायाम तुम्ही घरात सहज करू शकता.
लेखिका : डाॅ. स्नेहल अडसुळे
(डाॅ. स्नेहल अडसुळे ह्या न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन असून 'वूमन मेटाबोलिझम डाएट' ह्यात विशेषज्ञ आहेत.)