ओझोन थरातलं भलंमोठं भगदाड भरून निघालं आहे....याला लॉकडाऊन कारणीभूत आहे का ?
लॉकडाऊनमुळे समुद्रात डॉल्फिन दिसू लागलेत, प्रदूषण कमी झालंय आणि ओझोनच्या थरात पडलेलं भगदाडही भरून निघत आहे. तसं प्रदूषण कमी झालं म्हणून घरातूनच वेस्टोरस किम्वा क्लाउडमधला डेटा दिसल्याचे मीम्सपण आले आहेत. पण ते असो. आजच्या आपल्या लेखाचा विषय आहे ओझोन आणि ओझोनचा थर!!
गेल्या आठवड्यात युरोपियन युनियनच्या ‘कोपर्निकस ॲटमॉस्फियर मॉनिटरींग सर्व्हिस’ने (CAMS) बातमी दिली की आर्क्टिक म्हणजेच उत्तर ध्रुवावरच्या ओझोन थरातलं भगदाड भरून निघालं आहे. ही बातमी महत्त्वाची आहे, कारण हे आजवरचं सर्वात मोठं भगदाड होतं.
लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी झाल्यानं ओझोन थरातलं हे भगदाड भरून निघाल्याचं म्हटलं जात आहे. तशा अनेक पोस्ट सध्या व्हायरल झाल्या आहेत....पण हे खरं आहे का? ओझोन थर भरून निघतोय याचं नक्की काय कारण आहे? आणि हो, ओझोनचा थर म्हणजे काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आर्क्टिक ओझोन थरात भगदाड असल्याचं आढळून आलं. तेव्हापासून आतापर्यंत हे भगदाड वाढत वाढत तब्बल १० लाख स्क्वेअर किलोमीटर एवढं मोठं झालं होतं. ते अचानक भरून निघण्याचं कारण आहे ‘पोलर वोर्टेक्स’ म्हणजेच पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर असलेला कमी दाबाचा पट्टा. हा पट्टा थंड हवामानात आकुंचन पावतो, तर उष्ण हवामानात प्रसारण पावतो. पोलर वोर्टेक्सचा आणि ओझोनचा संबंध काय आहे हे आपण जाणून घेऊच पण त्यापूर्वी ओझोनबद्दल जाणून घेऊया.
ओझोन वायूचा थर म्हणजे काय?
ओझोन हे ऑक्सिजनच्या ३ अणूंपासून तयार झालेलं संयुग आहे. म्हणून ओझोनला ट्रायऑक्सीन पण म्हणतात. हा निळ्या रंगाचा वायू असतो. वातावरणात अगदी वरच्या भागात हा वायू आढळून येतो. या भागाला वैज्ञानिक भाषेत स्ट्रॅटोस्फीयर म्हणतात.
ओझोनचा थर महत्त्वाचा का आहे?
सूर्याकडून आपल्याला उष्णता मिळते. या उष्णतेत मोठ्याप्रमाणात घातक अशा अतिनील किरणांचा समावेश असतो. ओझोनच्या थरामुळे ही अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वीच शोषून घेतली जातात. म्हणून तर ओझोन वायूच्या थरातील कमतरता चिंताजनक बाब असते.
ओझोन थरात भगदाड पडणे म्हणजे काय?
आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया. ओझोन वायूच्या थरात असलेलं भगदाड हे खरं तर भगदाड नसून, ओझोन वायूचं प्रमाण अत्यंत कमी असणारा भाग असतो. ओझोन वायूच्या थरात भगदाड पडल्याच्या ज्या बातम्या आपण ऐकतो त्यातल्या बहुतेक बातम्या या अंटार्क्टिका भागातल्या म्हणजे दक्षिण ध्रुवावरच्या ओझोन थराबद्द्ल असतात. दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये हे भगदाड तयार होतं म्हणजे ओझोन वायूत घट होते. यामागे विशिष्ट प्रकारचे रासायनिक आणि हवामानातील बदल कारणीभूत असतात.
दक्षिण आणि उत्तर या दोन्ही गोलार्धांत अशी भगदाडे पडतात. आपण ज्या आर्क्टिक ओझोन थराबद्द्ल (उत्तर गोलार्ध) बोलत आहोत तिथे उबदार हवामानामुळे दक्षिण गोलार्धापेक्षा कमी भगदाडे आढळतात. यावर्षी आढळेलं भगदाड हे याला अपवाद ठरलं होतं. वैज्ञानिकांच्या मते स्ट्रॅटोस्फीयरमध्ये कमी झालेल्या तापमानामुळे ही परिस्थिती उद्भवली असावी. पोलर वोर्टेक्सचा पट्टा थंड हवामानात आकुंचन पावत असल्यामुळे ओझोनचा थर कमी झाला होता. थंडी कमी झाल्यामुळे पोलर वोर्टेक्स प्रसारण पावलं आणि ओझोनचं प्रमाण पूर्वपदावर आलं.
The unprecedented 2020 northern hemisphere #OzoneHole has come to an end. The #PolarVortex split, allowing #ozone-rich air into the Arctic, closely matching last week's forecast from the #CopernicusAtmosphere Monitoring Service.
— Copernicus ECMWF (@CopernicusECMWF) April 23, 2020
More on the NH Ozone holehttps://t.co/Nf6AfjaYRi pic.twitter.com/qVPu70ycn4
जाता जाता हेही सांगायला हवं की ओझोन वायू कमी होण्यामागे प्रदूषणाचाही मोठा सहभाग असतो. एअर कंडिशनर्समधून बाहेर पडणारे क्लोरोफ्युरोकार्बन्स, कारखाने आणि इतर माध्यमातून बाहेर पडणाऱ्या क्लोरीन आणि ब्रोमिन या दोन रसायनांमुळे ओझोन वायूत घट होते.
काही असो, ओझोनचा थर पातळ होणं ही चिंताजनक बाब आहे. नाहीतरी लॉकडाऊनमुळे आपण आजवर बऱ्याच गोष्टींचा विचार करत आहोत, जो आजवर कधी मनातही आला नसेल. तेव्हा पोलर वोर्टेक्समुळे काहीही होवो, आपणही शक्य तितकं प्रदूषण कमी करुन ओझोनचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी मदत करुयात.