computer

सोनसळी बहावा नजर सुखासोबत या कितीतरी गोष्टींसाठी उपयुक्त आहे पाहा!

हे दिवस बहाव्याचे आहेत. निसर्गाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सध्या तुम्हांला सोन्यासारख्या बहाव्याच्या सोनसळी फुलांचे सडे घातलेले दिसतील.  या बहाव्याच्या सोन्याबद्दल आजचा हा लेख रुपाली पारखे -देशिंगकर या सुप्रसिध्द लेखिकेने लिहिला आहे. त्यांना बरेच वाचक 'डिस्कव्हरी ताई' या नावाने पण ओळखत असतील. चला वेचू या हे बहाव्याचे सोने.. 

’आरग्वधो राजवृक्षशम्पाकचतुरंगुला:।
आरेवतव्याधिघातक्रुतमालसुवर्णका:॥’

[ अमरकोश, ६९६]

अमरकोशात राजवृक्ष आणि सुवर्णक म्हणून वाखाणलेल्या ’आरग्वध’ वृक्षाचं मराठी नाव कित्ती साधं आणि सुंदर आहे, "बहावा"! अगदी हिमालयापासून थेट कन्याकुमारीपर्यंत मिळणारं हे झाड अगदी १००% भारतीय आहे. ऋग्वेदात म्हटल्याप्रमाणे 'कर्णिकार' आणि 'कृतमाल', म्हणजे कानात घालता येणारा अलंकार! या अलंकारासारख्या फ़ुलांच्या माळाच येतात. असा बहावा फुललेला पाहाणं म्हणजे नेत्रसुखच आहे. महाराष्ट्रात आपल्या पानझडी जंगलामधे हे झाड खूप आढळतं. इतर वेळेस ह्या झाडाच अस्तित्व सामान्य असतं, पण उन्हाळ्यात याची ’कळी खुलते’ तेव्हा त्याचं रुपच पालटून जातं.

सह्याद्रीच्या जंगलात फिरताना आपल्याला हे झाड अनेक ठिकाणी दिसून येतं.  खूप उंच नाही आणि अगदी बुटुकबैंगणपण नाही, मध्यमचणीच्या आणि साध्यासुध्या झाडाच्या कशाही वाढलेल्या फांद्या, त्यातच लोंबकळणार्‍या त्याच्या रबरी नळ्यांसारख्या शेंगा बघितल्या की लेकुरवाळ्या आईचीच आठवण येते. 

वनस्पतीशास्त्र सांगतं की बहाव्याचं शास्त्रीय नाव आहे कॅशिया फिश्चुला [Cassia fistula]. यातलं कॅशिया हे नाव ग्रीक आहे आणि फिश्चुला म्हणजे नळीदार शेंग असलेला! इंग्रजीत या झाडाला बरीच नावं आहेत. बहाव्याला हिंदीत अमलताश म्हणतात. बहावा म्हटलं की दृष्टीसमोर पिवळा गर्द रंग दिसतो, पण काही बाहाव्याची फुलं पाढरी पण असतात. बहावा फक्त पिवळाच नसतो. बहाव्याचे सहा-सात प्रकार आपल्याकडे बघायला मिळतात. एकाची फुलं काही पांढरी येतात तर उरलेली पिवळी! जिथे अति पाऊस पडतो, तिथे टिकाव न लागणारं हे झाड बाकी कुठल्याही प्रकारच्या जमिनीत रुजतं. 

या झाडाचा फुलण्याचा सोहोळा उन्हाळ्याची चाहूल स्थिरावताच सुरु होतो. हिरवी पाने जाऊन नवी कोवळी पालवी येत असते, त्यातच पांढरी-पिवळी आणि हिरवट झाक असलेली टपोरी गोल गोल फुलं घोसात यायला लागतात. अचानक रखरखीत भुरकट-मातकट आणि हिरवट जंगलात हे सामान्य दिसणारं झाड असामान्य सुंदर होऊन जातं. पावसाळ्यात धरलेल्या शेंगा आता काळ्या नळ्या झालेल्या असतात.  वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकेबरोबर बहाव्याच्या फ़ुलांचे जमिनीकडे झेपावणारे घोस हलत असतात. या फुलांना बऱ्यापैकी मंद पण कडसर हवाहवासा सुवास असतो. या फुलांमधे भरपुर फूलरस असतो. त्यामुळे ह्या ’रसरशीत त्वचेच्या तरुण कळ्यांभोवती" पिंगा घालायला भुंगे आणि किटक येतातच. 

हे फ़ुलांचे घोस साधारण एक दीड हात लांब असतात आणि ते वरच्या देठाकडून टोकाकडे फुलत जातात. यांच्याच शेजारी डुलणाऱ्या शेंगा उन्हाळ्यात पिकायला लागतात. या शेंगा पिकल्या की त्यात गोड चिकट चॉकलेटी गर बनतो.

हे झाड कसं हट्टी आहे पाहा...  आपल्या बिया इतर झाडांसारख्या उधळून न देता आख्खीच्या आख्खी शेंगच खाली टाकून देतं. साधारण हातभर लांबीच्या ह्या शेंगांमधे ५० ते १०० चप्पट बदामी अशा कठीण छोट्या बिया असतात.  ह्या झाडाने आपलं पालकत्व इतकं मस्त पार पाडलेलं असतं की बस रे बास! आपल्या प्रत्येक ’बी लेकराला’ गुबगुबीत गरात स्वतंत्र कप्प्याचा जणू सेल्फ कंटेन्ड फ्लॅटच दिलेला असतो. है ना मज्जेकी बात? 

ह्या शेंगांचा उपयोग जोरदार असतो... कसा? हा गर खाता येतो, पण एकदम ’सुखसारक’ देखील असतो. ह्याचा उपयोग अजूनही गावोगावी सारक म्हणजेच पोट साफ करायला एकदम "बहावाबाण’ म्हणून होतो. आपल्या काही पर्गेटिव्ह औषधांमधे ह्याचा वापर होतो. आपली कुत्रीमांजरं जशी पोट बिघडलं की गवत खातात ना, तसच जंगलात कोल्हे, माकडं,अस्वलं, भेकर हरणं अगदी काटे साळिंदरपण ह्याच्यावर आधी हात आणि मग पोट साफ करतात. मेळघाटातली अस्वलं ह्या शेंगांवर ताव मारतात. बहावा रेचक म्हणून अगदी सेफ समजला जात असल्याने आपल्याकडे गरोदर बायका आणि लहान मुलांना औषध म्हणून वैद्य हेच देतात.

बहाव्याच्या प्रत्येक भागाचा, मग ते फुलं असो,पानं असो की शेंगा, सगळं १००% उपयोगाचं आहेच. 

याचं लाकूड दणकट असल्यानं बैलगाड्या, होड्या, शेतीची अवजारे, शोभेच्या वस्तू, मूर्ती बनवण्यासाठी वापर होतो. बहाव्याचं लाकूड त्याच्या उष्मांक मूल्यामुळे चांगलं सरपण समजलं जातं. उत्तम कोळसाही मिळतो. जर हे झाड अती मोठं असतं ना, तर ह्याच्या लाकडाचा वापर घरं बांधायलापण झाला असता. हे झालं लाकडाचं. याची साल देखील उपयोगी आहे.  सालीचा वापर कातडं कमवण्यासाठी करतात. आयुर्वेदामधे याच्या सालीचा काढा करुन घशाच्या गाठींवर देतात. याची पानं स्ट्रोक्सच्या [मज्जातंतूच्या] आजारावर वापरतात. गुरंढोरं याच्या पाल्याला तोंड लावत नाहीत म्हणून हा सगळीकडे लावता येतो. आदिवासी बहाव्याच्या फुलं आणि कळ्याची भाजी पण करतात. प्रयोग करून पाहणारे बहाव्याच्या फुलांचा गुलकंदासारखा प्रकार बनवतात.

तर असं हे १००% भारतीय झाड जगभर नेलं गेलंय आणि त्याचे नानाविध उपयोग लोक करत आहेत. वेस्ट इंडीज, अफ़्रिकेत औषधाबरोबर याचा उपयोग सजावटीचा वृक्ष म्हणूनही करतात. हल्ली शहरात अनेक ठिकाणी यांचा वापर सजावटीचे वृक्ष म्हणून केलेला सर्रास दिसून येतो. सध्या बहावा उर्फ अमलताश जागोजागी फुलतोय, त्याची पिवळी झिरमिळ झुंबरं हवेच्या प्रत्येक गरम झुळुकेबरोबर हलताना पहाणं हेही एक सुख आहेच.  

बहावा फुलला की साधारण दीड महिन्यात पाऊस पडतो असं निरीक्षण नोंदवलं गेलंय. आपल्याकडे तसाही मे अखेरीस वळीव पडून जातोच. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडायला हरकत नाही. बघू या, कावळे आणि बहावा यांच्या निसर्गखुणा किती खऱ्या ठरतात. 

प्रिय वाचक, डिस्कव्हरी ताईचा हा लेख वाचून कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आसपास बहरलेल्या आणि आठवणीतल्याही बहाव्याचे फोटोज नक्की शेअर करा.

 

लेखिका : रुपाली पारखे -देशिंगकर

सबस्क्राईब करा

* indicates required