computer

डॉ. मनसुख वाणी : लाखो लोकांना कॅन्सरमुक्त करून जीवदान देणारा शास्त्रज्ञ

कॅन्सर हा शब्दच भल्याभल्यांची भीतीने गाळण उडवणारा. अगदी पहिल्या स्टेजला असला तरी लोक त्याला खूप घाबरतात. या कॅन्सरवती संशोधन करुन त्याविरोधी काम करणाऱ्या रसायनांचा शोध लावण्याचं काम एका भारतीय वंशाच्या, महाराष्ट्रात जन्मलेल्या माणसानं केलंय. आजचा हा लेख बोभाटाच्या वाचकांना खास त्यांची माहिती करून देण्यासाठी!!

कॅन्सर म्हणजे काय?

आता हे सोप्या शब्दांत सांगायचं तर, आपल्या शरीरात हजारो पेशी असतात. त्यांचं सतत विभाजन होत असतं. नवीन पेशी तयार होतात तेव्हा जुन्या पेशी मरून जातात. मात्र जेव्हा ही विभाजनाची क्रिया अनियंत्रित होते, तेव्हा जुन्या पेशी नष्ट न होता अनेक नव्या पेशींना जन्म देत राहतात आणि अशा अ‍ॅब्नॉर्मल किंवा अनियंत्रित वाढलेल्या पेशींची एक गाठ तयार होते. या अवस्थेला कॅन्सर म्हणतात.

आता कॅन्सर होण्यामागे असंख्य कारणं आहेत. आनुवंशिकता, विशिष्ट वंश, विशिष्ट भूप्रदेश, जीवनशैली, व्यक्तिची शरीरयष्टी, हवा-पाणी यांचं प्रदूषण, रसायनांवरचं अतिअवलंबित्व, किरणोत्सर्ग, प्रक्रिया केलेल्या अन्नाचा सततचा वापर इथपासून ते अन्न शिजवण्याच्या आणि साठवण्याच्या चुकीच्या पद्धती इथपर्यंत अनेक घटक यासाठीचे ट्रिगर्स आहेत. त्यामुळे कॅन्सरवर मूलभूत संशोधन आणि कमीत कमी दुष्परिणाम असणारी प्रभावी उपचारपद्धती विकसित करणं हे जगभरातल्या संशोधकांसाठी कायम आव्हान ठरलेलं आहे.

डॉ. मनसुख वाणी हे नाव यासंदर्भातच पुढे येतं. नुकतंच म्हणजे जगभरात टाळेबंदी सुरू झाल्यानंतर एप्रिल २०२० मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांची एका वाक्यात ओळख करून द्यायची तर टॅक्सॉल आणि कॅम्पटोथेसिन या कॅन्सरविरोधी रसायनांचा शोध लावणारा हा संशोधक. खरंतर सहसंशोधक. डॉ. वाणी आणि डॉ. मन्रो वॉल या दोघांनी मिळून या रसायनांवर संशोधन केलं. आज या रसायनांमुळे लाखो आयुष्यं वाचली आहेत. त्यांचं हे संशोधन इतकं महत्त्वपूर्ण आहे, की एकविसावं शतक उजाडताना कॅन्सररोधक औषधांच्या बाजारपेठेत एक तृतीयांश हिस्सा या दोन औषधांचा किंवा त्यांच्यासारखेच गुणधर्म असणार्‍या रसायनांचा होता. इतक मोठं काम करणार्‍या आणि मूलभूत संशोधनावर भर देणार्‍या या शास्त्रज्ञाचं मूळ भारतातलं, महाराष्ट्रातलं आहे.

मनसुख वाणी नंदुरबारचे. १९५० मध्ये मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रातलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर १९५८ मध्ये ते अमेरिकेला गेले, ते संशोधन करण्यासाठी. त्याकाळी आजच्यासारखे लोक मोठ्या प्रमाणावर परदेशात जात नसत. मनसुख यांच्याबरोबर त्यावेळी इंडियाना युनिव्हर्सिटीत शिकणार्‍यांमध्ये केवळ २५ भारतीय विद्यार्थी होते. तिथे पीएचडी मिळाल्यानंतर त्यांना आरटीआय (रीसर्च ट्रँगल इन्स्टिट्यूट) मध्ये नोकरी मिळाली. त्यांना औषधनिर्मितीत रस होता आणि इथे त्यात संशोधन करायला भरपूर वाव होता.

अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असलेली संवेदनशील रसायनं हाताळण्यात त्यांचं प्रभुत्व होतं. हे पाहून त्या प्रयोगशाळेतले डॉ. मन्रो वॉल हे ज्येष्ठ संशोधक प्रभावित झाले. त्यावेळी त्यांचं कॅन्सर प्रतिरोधक औषधांच्या संशोधनावर काम सुरू होतं आणि कॅम्पटोथेसिन नावाचं रसायन त्यांनी तेव्हा मूळ संयुगापासून विलग करण्यात यश मिळवलं होतं. त्यांनी या गुणी तरुणाला बरोब्बर हेरलं आणि आपल्याबरोबर काम करण्याची ऑफर दिली. डॉ. वाणींनीही ३ महिन्यांच्या आत कॅम्पटोथेसिनची रचना शोधून काढली. त्यांच्या आयुष्यातला हा एक मोठा ब्रेक थ्रू होता! इथून पुढे नैसर्गिक उत्पादनांपासून हवे असलेले घटक विलग करण्याच्या आणि त्यांच्यावर संशोधन करण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.

ही संपूर्ण प्रक्रिया बरीच गुंतागुंतीची आहे. एका मुलाखतीत डॉ. वाणी यांनी त्यातले महत्त्वाचे टप्पे सांगितले. त्यानुसार, नैसर्गिक स्रोतांपासून या प्रक्रियेसाठीचा कच्चा माल गोळा केला जातो आणि एक्स्टेन्सिव्ह फ्रॅक्शनेशन या टप्प्यादरम्यान त्यातला उपयुक्त घटक वेगळा केला जातो. नंतर त्याची रासायनिक रचना निश्चित केली जाते आणि त्यानुसार कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्याचा कोणत्या स्वरूपात उपयोग करायचा हे ठरवले जाते. मग सुरू होतो टेस्टचा टप्पा. त्यादरम्यान मानवी कॅन्सरच्या गाठींचं उंदरांमध्ये रोपण (इम्प्लान्ट) केलं जातं आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ही रसायने वापरली जातात. त्यांचे परिणाम/दुष्परिणाम यांची नोंद ठेवली जाते. फेज 1, 2, आणि 3 अशा मानवी चाचण्यांच्या तीन टप्प्यांमध्ये यावर सखोल संशोधन केलं जातं. सगळ्या टप्प्यांचे निष्कर्ष अपेक्षेनुसार आले, की एफडीए (फूड अ‍ॅन्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन) सारख्या संस्थेकडून त्याच्या वापरासाठी मान्यता मिळते. ही प्रक्रिया बरीच किचकट आणि वेळखाऊ आहे.

आता परत कॅम्पटोथेसिनकडे वळू.

हे रसायन मिळतं कॅम्पटोथेका अ‍ॅक्युमिनाटा नावाच्या मूळ चिनी झाडापासून. या रसायनात डीएनएची पुनरावृत्ती (रेप्लिकेशन) रोखण्याची आणि कॅन्सरपेशी नष्ट करण्याची अद्भुत क्षमता आहे.

तर या रसायनासंबंधीचे निष्कर्ष प्रकाशित झाल्यावर शास्त्रज्ञांमध्ये एकदम उत्साह संचारला. ते प्रयोगशाळेत त्याचं उत्पादन करण्यासाठीचे मार्ग शोधायला लागले. पण या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू झाल्या आणि मध्येच माशी शिंकली. अमेरिकेतल्या मेयो क्लिनिकमधील चार्ल्स मॉर्टेल या कर्करोगतज्ज्ञाने क्लिनिकल ट्रायल्स केल्या होत्या. त्याने या औषधाला तीव्र विरोध केला. त्याच्या मते हे रसायन फार विषारी होतं. मग परत एकदा दीर्घकाळ संशोधनाची प्रक्रिया सुरू झाली आणि शेवटी त्याच रसायनाची दोन समवर्ती (गुणधर्म आणि कार्य यांत मूळ पदार्थासारखी) रसायनं अस्तित्वात आली. त्यांना वैद्यकीय मान्यता आहे आणि अंडाशयाच्या (ओव्हरीयन) आणि मोठ्या आतड्याच्या (कोलोन) कॅन्सरवरच्या उपचारात ती मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत.

टॅक्सॉलच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. त्यासाठीचं संयुग वेगळं केलं गेलं ते पॅसिफिक यु ट्री नावाच्या झाडाच्या सालीपासून. त्यासाठी तब्बल एक वर्ष लागलं. हे झाड दुर्मीळ प्रजातींमध्ये गणलं जात असल्यामुळे रसायनाचा पुरवठा अगदीच कमी होता. असंही एका झाडापासून इतकं कमी रसायन मिळायचं, की उपलब्ध असलेली सगळीच्या सगळी झाडं वापरून केवळ पाच पेशंट्सवर उपचार करता आले असते! यानंतर त्याची रचना ठरवणं हे कामही कमी जिकिरीचं नव्हतं. त्यासाठीची प्रगत उपकरणं आणि तंत्रं त्यावेळी त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. तरी त्यांनी नेटाने काम चालू ठेवलं. दोन वर्षं खटपटी लटपटी करूनही यश नजरेच्या टप्प्यात येईना. अखेर एक दिवस डॉ. वॉल यांनी डॉ. मनसुख यांना ‘टॅक्सॉल हा विषय विसरून जा’ असा सल्ला दिला. मात्र डॉ. मनसुख वाणी यांची त्यासाठी तयारी होईना. त्यांनी फावल्या वेळात त्यावर काम करायची परवानगी मागितली. आता टॅक्सॉलवरचं काम थोडं खालच्या प्रायोरिटीला गेलं. पण निदान चालू राहिलं.

शेवटी १९८४मध्ये क्लिनिकल ट्रायल्स सुरू झाल्या. परत एकदा आधीचाच गोंधळ. एका डॉक्टरने सांगितलं, हे अतिविषारी आहे आणि त्यामुळे उपचारांसाठी प्रभावी नाही. मात्र पीटर विअर्निक नावाच्या एका डॉक्टरच्या मते हा विषार खुद्द टॅक्सॉलमुळे नाही तर ते ज्यात विरघळवलं जातं त्या द्रावकामुळे होता. त्याने पेशंट्सना टॅक्सॉल देण्याआधी अ‍ॅन्टी-हिस्टामाइन, अ‍ॅन्टासिड आणि स्टेरॉइड देण्याचा सल्ला दिला. हा सल्ला अमलात आणताच जणू एकदम जादूच झाली. कॅन्सरवरच्या उपचारात हे औषध खूपच प्रभावी आहे हे दिसून आलं.

या दोन रसायनांनी डॉ. मनसुख वाणींना केवळ प्रसिद्धीच नव्हे तर आंतरिक समाधानही मिळवून दिलं आहे. आज ही दोन्ही औषधं विविध अवयवांच्या कॅन्सरवरच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहेत. त्यांच्या वाटचालीदरम्यान त्यांना अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले. पण ९५ वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य आणि त्यामध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करून लाखो लोकांना जीवदान दिल्याबद्दलची कृतकृत्यता यांचं मोल कशात होऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं? 

 

लेखिका : स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required