टेक जगातील ५ महत्त्वाच्या घडामोडी...या बातम्यांचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे जाणून घ्या !!
सध्याच्या युगात टेक्नॉसेव्ही असणं खूप गरजेचं झालं आहे. कुठलाही व्यवसाय करणाऱ्या लोकांना तर व्यवसाय वृद्धीसाठी हे आवश्यकच बनलं आहे. काळ बदलतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला बदलावंच लागतं नाहीतर मग तुम्ही मागे पडत जाता. बोभाटाने वाचकांसाठी त्यासाठीच टेक्नॉलॉजी जगतातल्या व्यवसायावर परिणाम करू शकतात अशा पाच महत्वाच्या घडामोडी आणल्या आहेत..
1) मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर बंद करत आहे
मायक्रोसॉफ्ट आपलं 25 वर्ष जुनं वेब ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोरर बंद करणार आहे, म्हणजेच यापुढे ते उपलब्ध असणार नाही. १७ ऑगस्ट २०२१ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. मायक्रोसॉफ्टचे वेब ॲप येत्या नोव्हेंबरपासून इंटरनेट एक्सप्लोररच्या लेटेस्ट व्हर्जनला म्हणजेच इंटरनेट एक्सप्लोरर ११ ला सपोर्ट करणं बंद करेल आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या इतर ३६५ सेवा पुढील वर्षापासून इंटरनेट एक्सप्लोररला सपोर्ट करणं बंद करतील. एक्सप्लोररची जागा मायक्रोसॉफ्ट एज घेईल. या एजमध्ये एक्सप्लोररपेक्षा जास्त सुविधा आहेत. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट एजमध्ये क्रोमियम ब्राउझर आहे जो गूगलने त्यांच्या क्रोम ब्राउझरसाठी तयार केला होता.
ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते कारण -
तुम्ही अजूनही तुमच्या काही ॲप्लिकेशन्ससाठी इंटरफेस म्हणून एक्सप्लोररचा वापर करत असाल तर तो तुम्हाला बंद करावा लागेल आणि क्रोम किंवा एज वापरणं चालू करावं लागेल. मायक्रोसॉफ्टचं असं म्हणणं आहे की नवीन मायक्रोसॉफ्ट एज हे क्रोमपेक्षा फास्ट असून कमी रिसोर्सेस वापरून ते काम करतं.
2) ऑनलाईन विक्रीत मागच्या तिमाहीत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ!
अमेरिकेच्या कॉमर्स डिपार्टमेंटने जाहिर केल्यानुसार कोरोना महामारीमुळे गेल्या तिमाहीत अमेरिकेतील एकूण ऑनलाईन विक्रीत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यावर्षीच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण २११.५ बिलियन डॉलर्सची ऑनलाईन विक्री झाली. ही विक्री पहिल्या क्वार्टरपेक्षा ३१.८ टक्क्यांनी जास्त आहे! वॉलमार्टनेदेखील आपला रिपोर्ट जाहीर केला असून यावर्षीच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये त्यांच्या ऑनलाईन विक्रीत तब्बल ९७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे! सर्व ऑनलाईन पिकअप आणि डिलिव्हर करणाऱ्या दुकानांना धन्यवाद, कारण त्यांच्यामुळेच हे सर्व शक्य झालं आहे! कॉमर्स डिपार्टमेंटच्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील एकूण विक्रीपैकी १६.१ टक्के विक्री ही आता पूर्णपणे ऑनलाईन होते.
भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. इकॉनॉमिक टाइम्सनुसार कोरोनाकाळात भारतातील टॉप कन्झुमर ब्रँड्सच्या विक्रीत तब्बल दुप्पटीने वाढ झाली आहे.
ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते कारण -
कोरोनामुळे सगळ्यांचाच धंदा बसला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल असेल तर हा भ्रम आहे. कारण कोरोनाकाळात ऑनलाईन विक्रीत प्रचंड वाढ झाली असून हा परिणाम फक्त आपल्या देशात नव्हे तर जगभरात पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये शॉपिंग मॉल्स आणि दुकाने जरी बंद होती तरी लोकांनी ऑनलाईन शॉपिंगद्वारे आपली खरेदीची भूक भागवली. अजूनही तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाईन आणला नसेल तर लवकरात लवकर तो लोकांना ऑनलाईन उपलब्ध करून द्या!
3) एखादा वेब फॉर्म जर धोकादायक असेल तर आता क्रोम तुम्हाला त्याची लगेच माहिती देईल!
गूगल आपल्या वापरकर्त्यांसाठी अशी टेक्नॉलॉजी विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे ज्याद्वारे तुम्ही जर एखाद्या वेबसाईटवर एखादा फॉर्म भरत असाल आणि ती वेबसाईट जर सुरक्षित नसेल तर गूगल लगेच त्याची तुम्हाला माहिती देईल! फॉर्म भरत असताना जर स्क्रीनवर लाल कलरचा झेंडा आला तर समजायचं की ही वेबसाईट जरी एचटीटीपीसाठी सुरक्षित वाटत असली तरी ती सुरक्षित नाही. सुरुवातीला लाल कलरच्या झेंड्याद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल. जर तुम्ही फॉर्म भरणं तसच चालू ठेवलंत तर स्क्रीनवर तुम्हाला तो फॉर्म आणि आणि वेबसाईट कशी धोकादायक आहे याची माहिती दिली जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही फॉर्म भरणं चालूच ठेवणार आहात का? तुमची संवेदनशील माहिती दुसऱ्यांच्या हाती पडू नये म्हणून गूगल ही सगळी काळजी घेत आहे.
ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते कारण-
तुमचा व्यवसाय तुम्ही ऑनलाईन चालवत आहात आणि तुमच्या वेबसाईटवर आलेल्या ग्राहकांना तुम्ही एखादा फॉर्म भरायला सांगता. जर तो फॉर्म गूगलकडून सुरक्षित मान्य झाला नसेल तर आता गूगल तशी सूचना तुमच्या ग्राहकांना देईल. त्यामुळे लवकरात लवकर तुमची वेबसाईट आणि त्यावरचे फॉर्म्स तुम्ही गूगलकडून सुरक्षित करून घ्या!
4) डिझर आणत आहे पॉडकास्ट ॲनॅलिटीक्स ॲप
तुम्हाला डिझर ॲप माहीत असेलच. या ॲपवर आपल्याला गाणी आणि संगीत ऐकता येतं. तर याच डिझरने आता पॉडकास्ट ॲनॅलिटीक्स ॲप आणले आहे. या ॲपमध्ये पॉडकास्ट संबंधित सर्व डाटा तुम्हाला उपलब्ध असेल.
ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते कारण -
पॉडकास्टिंग जर तुमच्या व्यवसायाचा भाग असेल तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण याद्वारे तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांचा वेगवेगळ्या प्रकारचा डाटा तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल! उदाहरणार्थ प्रेक्षकांचं वय, ते वापरत असलेले मोबाईल्स आणि कॉम्प्युटर्स याबद्दलचा डाटा. त्याचबरोबर तुम्ही पॉडकास्ट केलेले व्हिडिओ किती लोकांनी पाहिले, कधी पाहिले आणि सर्वात जास्त कधी पाहिले याची माहितीदेखील तुम्हाला उपलब्ध होईल.
5) टीडी बँक आणत आहे ऑनलाईन अकाऊंटिंग
टीडी बँक म्हणजेच टोरोंटो डोमीनियन बँक आपल्या ग्राहकांसाठी विशेषतः लघुउद्योगांसाठीऑनलाईन अकाऊंटिंगची आणि पेमेंटची नवीन सुविधा घेऊन येत आहे. याद्वारे बँकेच्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक पेमेंट तसेच क्रेडिट कार्ड पेमेंट थेट त्यांच्या अकाउंट मधून करता येणार आहे. नवीन लघुउद्योग व्यावसिकांना आकर्षित करण्यासाठी बँकेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते कारण-
ऑनलाईन बँकिंग मध्ये नवनवीन सुविधा उपलब्ध होत आहेत आणि त्या जाणून घेणे तुमच्या व्यवसायासाठी नक्कीच फायदेशीर असणार आहे.
लेखक : सौरभ पारगुंडे