अधिक मास म्हणजे नक्की काय? त्याला 'धोंडा मास' का म्हणतात? यामागचं शास्त्रीय कारण जाणून घेऊया !!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/adhikmaas.jpg?itok=cJr6-KBN)
नुकताच श्राध्दपक्षाचा पंधरवडा संपला. नेहमीच्या कालगणनेप्रमाणे आतापर्यंत नवरात्र सुरु व्हायला हवं होतं, पण यावर्षी आज आहे तो 'अधिक आश्विन' आल्यामुळे पुढचा महिना 'खरा आश्विन' महिना असेल अशी माहिती घरचे वडीलधारी तुम्हांला देतीलच. म्हणजेच त्या आश्विन महिन्याच्या आधी या वर्षी हा 'एक्स्ट्रा' महिना आला आहे. यालाच आपण अधिक मास असे म्हणतो.
या महिन्यात अनेकजण अनेक व्रते करताना दिसतात. पण या महिन्यात कोणतेही मंगल कार्य करत नाहीत, अशी बरीच माहिती तुम्हाला सांगण्यात येईल. पण आमच्या लेखाचा विषय धार्मिक आचरणाबद्दल नाही. अधिक मास म्हणजे नक्की काय आहे? या अधिक महिन्याला काहीजण 'धोंडा मास' का म्हणतात?काहीजण यालाच पुरुषोत्तम मास का म्हणतात? अशा प्रश्नांमागची शास्त्रीय भूमिका स्पष्ट करण्याचा आहे. या सर्व प्रश्नांचा खुलासा करण्यासाठी बोभाटाचा हा लेख वाचा!
सर्वप्रथम कालगणनेच्या दोन पध्दती जाणून घेऊया. एक वर्षं म्हणजे किती कालावधी हे मोजण्याच्या दोन पध्दती आहेत. एक सौरवर्ष आणि दुसरे चांद्रवर्ष!
पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. हे भ्रमण पूर्ण होण्याचा काळ म्हणजे एक वर्ष असे गणित 'सौर' वर्षाचे असते. तर चांद्रमास आणि चांद्रवर्षाची गणना चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याच्या काळावर आधारभूत असते.
शालिवाहन शकाच्या कालगणनेप्रमाणे चैत्र, वैशाख हे भारतीय महिने चंद्राच्या गतीप्रमाणे व नक्षत्रांवरून मोजले जातात. त्यांना चांद्रमास म्हणतात. सूर्याची व चंद्राची दृक्प्रत्ययी गती थोडी वेगळी असते. चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा २८ दिवसांत पूर्ण करतो. अर्थात त्यानुसार सौर वर्षाप्रमाणे चांद्रवर्षाचे १२ महिन्यांचे ३६५ दिवस न भरता ते ३५५ भरतात. प्रत्येक महिन्यात अशी तूट येत असल्यामुळे आपल्या चांद्रमासाच्या वर्षाचे दिवस (चांद्रगणना) व सौर वर्षाचे दिवस (सौरगणंना) यांचा ताळमेळ घालण्यासाठी साधारणत: दर तीन वर्षांनी म्हणजेच सुमारे साडेबत्तीस महिन्यांनी (२२ महिने १६ दिवस ४ घटिकांनी) एक चांद्रमास दोनदा मोजतात आणि त्यालाच “अधिक मास' म्हणतात. ज्या वर्षी हा अधिक मास येतो, ते चांद्रवर्ष १३ महिन्यांचे असते. (संदर्भ : दिवाकर अनंत घैसास- जय हिंद प्रकाशन)
अगदी तासासेकंदाचा हिशोब मांडायचा ठरवला तर दरवर्षी ११ दिवस, एक तास, ३१ मिनिटे आणि १२ सेकंदाचा फरक पडत असतो. आता तीन वर्षांनी एकदा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पंचांगात 'अधिक' मासाची गणना करण्यात येते. सुप्रसिध्द पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी नुकतीच ही संकल्पना समजावून सांगितली आहे. ही त्यांच्याच शब्दात देतो आहोत.
"ठराविक सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी आपली पंचांगे चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. एका चांद्रवर्षात ३६० तिथी होतात. एका सौरवर्षात ३७१ तिथी होतात. त्यामुळे दरवर्षी ११ तिथी वाढत जाऊन त्या ३३ झाल्या की अधिकमास येतो. भारतात अधिकमासाचे ज्ञान इ. सनापूर्वी पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे वेदकालातही होते. ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास धरला जातो. अधिक महिन्याला पुरुषोत्तममास असेही म्हणतात."
सन २०१८ मध्ये ज्येष्ठ अधिक मास आला होता. आता यानंतर सन २०२३ मध्ये श्रावण अधिक मास येणार असल्याचेही श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
अधिक मासात सूर्यसंक्रांत नसते. आता सूर्यसंक्रांत म्हणजे काय? तर या काळात सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करत नाही. म्हणून या महिन्याला 'मल मास' असेही म्हणतात. काही मंगल कार्ये या काळात केली जात नाहीत म्हणून याचे दुसरे नाव 'धोंडा महिना'!
(शालिवाहन शकाच्या कालगणनेनुसार तयार केलेल्या १८७१-७२ सालच्या दिनदर्शिकेतील एक पान)
अधिक मास हा मार्गशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन या हिवाळ्याच्या चार महिन्यांना जोडून कधीच येत नाही. तीन वर्षांनी वैशाख, आश्विन या महिन्यांत अधिक मास येतो. अधिक कार्तिक मास ही फारच दुर्मिळ घडणारी घटना आहे . गेल्या अडीचशे वर्षांत फक्त एकदाच म्हणजे १९६३ साली अधिक कार्तिक महिना आला होता. बारा वर्षांनी चैत्र, ज्येष्ठ, श्रावण या महिन्यांत अधिक मास येतो. तर अठरा वर्षांनी अधिक आषाढ व चोवीस वर्षांनी अधिक भाद्रपद येतो. जो अधिक मास असतो तो निजमासापूर्वी मोजतात. उदाहरणार्थ, चैत्र मास अधिक धरावयाचा असला तर फाल्गुन संपल्यावर जो पहिला महिना येतो तो अधिक चैत्रमास आणि त्यानंतरचा महिना तो निज (नेहमीचा) 'चैत्रमास’ होय. तर ही आहे अधिक मासाची शास्त्रीय संकल्पना!
आता खगोलशास्त्रात आणि पंचांगाच्या गणितात काही घडू देत आपण आपल्या पध्दतीने त्याचा एक ' मार्केटींग इव्हंट' बनवतो नाही का ? त्याची सुरुवात झालेलीच आहे, त्याचे हे उदाहरण बघा !
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/8b86cd34ff8bcd10504.jpg?itok=dwKSsEg3)
आता प्रचलीत चालीरितीप्रमाणे अधिक महिन्यात जावयांची चंगळ असते म्हणे. त्यांना अनारसे, घीवर, मैसूरपाक अशा गोड पदार्थांची भेट दिली जाते. पण जावयांनो, ही संकल्पना समजावून सांगितल्यावर काही हिस्सा 'बोभाटा'च्या टीम मेंबर्सना पाठवायला विसरू नका !!