computer

या आहेत जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला बसचालक...वाचा त्यांचा प्रवास !!

ड्रायव्हर म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं सांगा बरं? अर्थात कोणी पुरुषच. साधं कोपऱ्यावर जायचं असेल तर पुरुषमाणूस गाडी चालवणार, लांबचा प्रवास असेल तर कार चालवणाराही घरातला पुरुषच असतो. बायकांना आवड असेल तर 'कमी गर्दी असेल तिथे चालव' असं सहज सांगितलं जातं.

अवजड ट्रक किंवा बस यांचे ड्रायव्हर कोणी स्त्री असेल याचा कोणी विचारही केला नसेल. हो ना? पण कठुआ बसोहली जिल्यातील सांधर गावच्या पूजादेवी यांनी हा समज दूर केलाय. पुजादेवी ह्या जम्मू काश्मीर  पहिल्या महिला बसचालक ठरल्या आहेत. त्यांनी २४ डिसेंबरला कठुआ ते जम्मू हा ८५ किलोमीटरचा प्रवास बस चालवून यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हा रस्ता पहाडी वळणाचा असून प्रवासी भरलेली बस चालवत घेऊन जाणे हे जबाबदारीचे काम आहे. पुजादेवींनी हे सिद्ध केलं की या क्षेत्रातही स्त्रिया स्वतःला सिद्ध करू शकतात.

कोण आहेत पुजादेवी?

पुजादेवी या सांधर या अतिशय छोट्या गावातून आहेत. त्यांनी वयाची तिशी ओलांडलेली असून २ मुलांच्या आई आहेत. लहानपणापासूनच त्यांना गाड्या चालवायचे वेड आहे. परंतु कुटुंबाचा विरोध होता. त्यांची प्रबळ इच्छा त्यांना शांत बसू देईना. ड्रायव्हिंग शिकणासाठी त्यांनी पहिल्यांदा टॅक्सी शिकली. स्टेअरिंगवर हात बसल्यावर त्यांना आत्मविश्वास आला. मग त्यांनी अवजड वाहने चालवायचा निर्धार केला. पण त्यालाही कडाडून विरोध झाला. बस किंवा ट्रक कधी कोणती स्त्री चालवताना पाहिलय का? असं म्हणून त्यांना हिणवलं गेलं.

पण म्हणतात ना स्वप्नांना तीव्र इच्छेचे बळ असल्यास आपोआप पंख मिळतातच. अगदी तसच झालं, त्यांना जम्मूमध्ये ट्रक चालवायला मिळाला. त्या दिवशी त्या खूप आनंदात होत्या. त्यांना असं ट्रक चालवताना पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले. एक स्थानिक बस ट्रान्सपोटरने त्यांचे सफाईदार ड्रायव्हिंग बघून त्यांना बस चालवण्याची संधी दिली. त्यांचे हेच स्वप्न होते जे अखेर पूर्ण झाले. आता बसचालक म्हणून स्वतःची ओळख देताना त्यांना अभिमानच वाटतो. इतर बसचालकानी ही त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. हे त्यांच्यासाठी प्रोत्साहन देणारं ठरलं. घरांच्याचा विरोध हळूहळू मावळू लागला.

दंगल चित्रपटात आपण महिला कुस्तीगीर पाहिले. फोगट बहिणींची जिद्द पाहून नंतर अनेक मुली या क्षेत्रात येत आहेत. जम्मूच्या पहिल्या बसचालक पुजादेवी यांनीही पुरुषांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र निवडून मुसंडी मारली आहे.

अश्या जिद्दीला बोभाटाचा सलाम. लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

 

आणखी वाचा:

महिला चालकांना कितीही नावं ठेवा, पण या बाईंमुळेच आज आपण कार चालवत आहोत..

सबस्क्राईब करा

* indicates required