देशात पहिल्यांदाच चालकविरहीत मेट्रो सुरु होत आहे... या मेट्रोबद्दल महत्त्वाचे सगळे मुद्दे जाणून घ्या !!
Driverless म्हणजे चालकविरहीत कार तुम्ही पाहिल्यात का? ऑगस्ट २०१९ मध्ये सचिन तेंडुलकरने त्याच्या चालकविरहित अत्याधुनिक कारचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं ना? हे मोठ्या लोकांचे खेळ आहेत. ते काय सगळं विकत घेऊ शकतात.
पण आता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या गाडीतही Driverless तंत्रज्ञान असणार आहे. समजा तुम्हाला अशाच चालकरहीत मेट्रोमध्ये रोज प्रवास करायला मिळाला तर? तोही अत्याधुनिक सुरक्षा आणि सेवेसह? हे परदेशात नाही तर आपल्या भारताची राजधानी दिल्लीतच घडत आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चालकविरहीत मेट्रोचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं आहे. आजच्या लेखातून आपण या मेट्रोबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईनवर जनकपुरी वेस्ट ते बॉटनिकल गार्डन कॉरिडॉर असा ३७ किलोमीटरचा प्रवास या मेट्रोने केला आहे. इतकच नाही तर नव्या मेट्रोबरोबरच नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड (NCMC)च्या सेवेचंही उद्धाटन झालं आहे. ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ म्हणजे देशाच्या कोणत्याही भागामधून जारी करण्यात आलेलं ‘रुपे डेबिट कार्ड’. हे डेबिट कार्ड प्रवासासाठी वापरता येऊ शकेल. ही सुविधा २०२२ पर्यंत दिल्ली मेट्रोच्या संपूर्ण नेटवर्कवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (DMRC) ने दिलेल्या माहितीनुसार सध्या फक्त ५ मेट्रो विनाचालक धावतील. हळूहळू ही संख्या वाढवण्यात येणार आहे. आता जरी हा स्वयंचलित प्रवास ३७ किलोमीटरचा असला तरी जून २०२१ पर्यंत एकूण ९४ किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. ही खरंच दिल्लीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण रोज लाखो प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. त्यात आयटी कंपन्या आणि नोयडातील नामांकित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा बराचसा वेळ वाचणार आहे.
मेट्रोचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विनाचालक असल्यामुळे सगळं वेळेत होईल. निघायचा वेळ आणि पोहोचण्याचा वेळ प्रोग्राममध्ये ठरलेला असेल. वीस मिनटं किंवा अर्धा तास उशीर झालाय असं होणार नाही. प्रत्येक स्टेशनवर मेट्रो किती मिनिटं थांबणार ही वेळही ठरलेली असेल. समजा अगदीच काही अडचणीमुळे उशीर झाला तर वेग वाढवून प्रवाशांना वेळेत त्यांच्या नियोजित जागी पोहोचण्याचे नवीन तंत्रज्ञानही आहे.
पूर्वीच्या मेट्रोमध्ये पूर्ण नियंत्रण हे चालकाकडे असायचे. म्हणजे मेट्रो सुरू करणे, वेग कमी किंवा जास्त करणे, दरवाजे उघडणे आणि बंद करणे. पण नव्या मेट्रोमध्ये स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) प्रणालीद्वारे वेग निश्चित केला जातो. चालक काही मर्यादेपेक्षा जास्त वेगवान मेट्रो चालवू शकत नाहीत, पण आता फक्त स्टार्ट बटन दाबून सर्व ऑटोमॅटिक होणार. सध्या चालक असणार आहेत पण हळूहळू त्यांची संख्या कमी होईल.आपत्कालीन परिस्थितीसाठी रोलिंग स्टॉक कंट्रोलर(मेट्रो ऑपरेटर) तयार असतील.
मेट्रोमध्ये अत्याधुनिक हाय-रेझोल्यूशन कॅमेरे बसवले गेले आहेत. आधी चालक प्रत्येक गाडीच्या पहिल्या आणि शेवटच्या केबिनमध्ये बसायचे, जे पुढचे आणि मागचे ट्रॅकचे दृश्य स्वतःहून पाठवायचे, पण आता केबिन काढून तिथे कॅमेरे, Obstruction detection device (ODD) आणि सेन्सर बसवले गेले आहेत. त्यामुळे ट्रॅकमध्ये मोठा अडथळा आल्यास सेन्सरमुळे गाडी थांबू शकते किंवा अगदी किरकोळ अडचण असेल तर अपोआप सोडवली जाऊ शकते. आता फक्त हार्डवेअर बिघाड झाल्यासच मानवी हस्तक्षेप लागेल. बाकी सगळ्या गोष्टी स्वयंचलित होतील.
प्रत्येक कोच म्हणजे डब्यामध्ये २४ प्रवासी बसून प्रवास करू शकतात. आणीबाणीच्या प्रसंगी प्रवाशांना धोक्याची सूचना देता यावी यासाठी चार PAD (Passive Attenuation Device buttons) बसवण्यात आले आहेत. जर काही अडचण आली तर प्रवासी PAD चं बटन दाबून धोक्याची सूचना पोहचवू शकतात. त्यामुळे हे महिलांसाठीही अधिक सुरक्षित आहे.तसेच डब्याच्या आत cctv कॅमेरेही बसवलेले आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चालविलेल्या गाड्या आल्यामुळे दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) जगातील अत्याधुनिक मेट्रो नेटवर्क्सच्या गटात प्रवेश मिळवला आहे. जगात फक्त ७ टक्के मेट्रोच अशा प्रकाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. त्यामुळे भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
भारतात मेट्रोचे जाळे हळूहळू प्रत्येक शहरात वाढत आहे. महाराष्ट्रातही मेट्रोचे काम जोरात चालू आहे. मेट्रो वापरून बराचसा प्रवासाचा वेळ आणि इंधन वाचवून पर्यावरणालाही हातभार लावणे शक्य होईल यात शंका नाही. सध्या दिल्लीत गेल्यावर हा नवा मेट्रो प्रवास अनुभवता येईल.
तुमचं काय मत आहे?
लेखिका: शीतल अजय दरंदळे