जगभरात कौतुकास्पद ठरलेले भारतीयांचे १४ अफलातून शोध !!
परदेशी संशोधकांनी लावलेले शोध सामान्यतः लगेच लक्षात राहतात. पण भारतीय संशोधकांनीही असे अनेक महत्वाचे शोध लावले आहेत. रोजच्या जीवनात आपण यातल्या कितीतरी वस्तू किंवा तंत्रज्ञान वापरत असतो. आज तुम्हाला भारतीय असल्याचा नक्कीच अभिमान वाटेल. या शोधांमुळे केवळ भारतीयांची नाही तर पूर्ण मानवजातीची प्रगती होऊ शकली आहे. आपण जगाला काय दिलं याचा शोध घेऊयात आजच्या या लेखात. यातील काही महत्वाचे शोध आम्ही लेखात मांडले आहेत.
१. बुद्धिबळ, सापशिडी यासारखे बैठे खेळ –
सहाव्या दशकात चंद्रगुप्त काळात शोधलेला हा खेळ. अष्टपदा असे नाव होते. सापशिडी हा खेळ तर आपल्या ज्ञानेश्वरांनी १३व्या शतकात शोधला. मोक्षपाट असे त्याचे नाव होते.
२. USB (Universal Serial Bus) –
भारतीय संगणक तज्ञ अजय भट्ट यांनी USBचा शोध लावला आहे. संगणक किंवा लॅपटॉप मधील माहिती साठवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याआधी फ्लॉपी आणि सीडी वापरली जायची. USB चा वापर स्मार्ट फोन, लॅपटॉप, विविध प्रकारचे इलेक्ट्रनिक गॅजेट चार्ज करण्यासाठी केला जातो. तसेच डेटा ट्रान्सफर करण्यासाठी USBचा वापर केला जातो. USB हे आज जगातील सर्वाधिक वापरल्या इलेक्ट्रनिक डिव्हाइजपैकी एक आहे. २ gb ते १६ gb पर्यंत USB उपलब्ध आहे.
३. बटण –
माणसाची उत्क्रांती झाल्यावर जेव्हा माणूस कपडे घालू लागला तेव्हा बटणाचा शोध लागला. हा शोध देखील भारतीयांनी लावला आहे. ५० हजार वर्षांपूर्वी मोहेंजोदारोच्या सिंधू संस्कृतीत या बटणाचा शोध लागला होता. आज बटनांचा उपयोग सगळीकडे होतो.
४. योग –
योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. योगाचा शोध ५ हजार वर्षांपूर्वी भारतात लागला. मानसिक ताणतणाव आणि शारिरीक स्वास्थ्यासाठी योगचा खूप उपयोग होतो. अनेकजण दरवर्षी परदेशातून योग शिकण्यासाठी भारतात येतात. आधुनिक काळात भारताने जगाला दिलेली ही सर्वोत्कृष्ट भेट आहे असे म्हणता येईल.
५. शाम्पू –
रोजच्या जीवनात स्वच्छतेचे महत्व खूप आहे. शरीरासोबतच केसांचीही निगराणी राखली जाते. केसांसाठी वापरला जातो तो शांपू. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण शाम्पूचा शोधही भारतात लागला होता. १७६२ मध्ये मुघल साम्राज्यात पहिल्यांदा शाम्पू वापरण्यात आला. शेख दीन मोहम्मद या भारतीयाने तो परदेशात नेल्याचं इतिहासात नमूद केलेलं आहे. आज जगभरात तो सर्रास वापरला जातो.
संपूर्ण माहिती वाचण्यासाठी हा लेख नक्की वाचा:
या भारतीयाने शाम्पू जगभर पोचवलं..वाचा शाम्पूच्या जन्म आणि प्रवासाची कहाणी..
६. मोतीबिंदू शस्त्रक्रिया –
साठीनंतर डोळ्यांची होणारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया सर्वांनी ऐकली असेल. हा शोध इ. स.पूर्व तिसऱ्या शतकात भारतीय वैद्य सुश्रुत यांनी लावला होता. त्यांनीच जगातील पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करुन दाखवली होती. त्याकाळी रुग्णाच्या घरी जाऊन शस्त्रक्रिया केली जायची. रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत सुश्रुत हे डोळयांना गरम पाण्याने शेक द्यायचे.
७. वायरलेस कम्यूनिकेशन –
१८९५ साली भारतीय संशोधक जगदिश चंद्र बोस यांनी वायरलेस तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा शोध लावला होता. परंतु त्यांनी या शोधाचा पेटंट मिळवला नव्हता. त्यामुळेच वायरलेस यंत्रांचं श्रेय गुल्येल्मो मार्कोनी यांना मिळाले. आज स्मार्टफोनच्या काळात कितीतरी वायरलेस यंत्रे आपण रोजच्या जीवनात वापरतो. वायरलेस फोन ते आताचे ब्लुटूथ असे कितीतरी प्रगत संशोधन यात झाले.
८. शून्य -
गणितात सगळ्यात महत्वाचा शोध म्हणजे शून्याचा शोध असे मानले जाते. या शून्याचा शोध महान भारतीय गणिततज्ज्ञ आर्यभट्ट यांनी लावला होता. भारतातच सर्वात प्रथम शून्य हा आकडा वापरला गेला. ९ आकड्यानंतर मोजणे सोपे व्हावे म्हणून शून्य वापरला जाऊ लागला. याच शून्याचा वापर आज संपूर्ण जग करते. शास्त्रात सगळ्यात महत्वाचे शोध या शून्यामुळे लागले. मानवजातीच्या प्रगतीला या शून्यामुळे खूप वेग आला. अगदी भौतिकशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत सर्व प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनांमध्ये या शून्याचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे हे नक्की.
९. नैसर्गिक धागे (सुत) –
भारतात चौथ्या शतकापासूनच कापसाची शेती केली जात आहे. नंतर कापूस धाग्यात रूपांतररीत केला जायचा. यापासूनच कॉटन, ज्यूट आणि लोकरीचे कपडे बनवले जायचे. जगभरात कॉटन म्हणजे सुतीचे कपडे सगळ्यात जास्त वापरले जातात.
१०. फायबर ऑप्टिक्स -
इंटरनेटसाठी सगळ्यात महत्त्वाचे असते ते फायबर ऑप्टिक्स तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा शोध अमेरिकेत काम करणाऱ्या एका भारतीय संशोधकाने लावला आहे. त्यांचे नाव डॉ. नरिंदर सिंह कपानी. त्यांना आज फायबर ऑप्टिक्सचे जनक म्हणून संपूर्ण जग ओळखते. अगदी टेलिकम्यूनिकेशन, कंप्यूटर नेटवर्किंगपासून अवकाशात पाठवले जाणारे यान या सर्व ठिकाणी या फायबर ऑप्टिक्सचा वापर केला जातो.
११. मोजायची पट्टी (scale) -
इ.स.पू.१५०० च्या काळात या मोहेंजदडो पट्टीचा शोध लागला. सिंधू सांस्कृतीत ते वापरले गेले. ती पट्टी हस्तिदंतापासून बनवली होती. त्यावर ३३.५ मिलिमीटरपर्यंत अंक होते. त्याचा उपयोग वस्तू किंवा कापड मोजण्यासाठी केला जायचा.
१२. शौचालय व त्याची रचना -
५० हजार वर्षांपूर्वी मोहेंजोदारो हडप्पा संस्कृतीत शौचालयांचा वापर व्हायचा. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुखत्वे विहिरीजवळच्या नाल्यांचा वापर केला जायचा. शौचालयांची रचना आणि सांडपाण्याची व्यवस्था कशी करावी याचे तंत्र भारतीयांनीच संपूर्ण जगाला शिकवले. आजही भारतीय शौचालयाची रचना ही वैद्यकीय अभ्यासानुसार अधिक प्रभावी आणि उपयुक्त मानली जाते.
१३. वजन करायचे माप -
सिंधु संस्कृतीमध्ये इ.स.पु.१८०० ते २४०० च्या दरम्यान वजनकाट्यावर वापरले जाणारे दगड शोधण्यात आले. व्यापारी वस्तू किंवा धान्य मोजण्यासाठी त्याचा वापर करत. दोन वजनदार वस्तूंची तुलना करण्यासाठीही ते वापरले जायचे.
१४. दशांश अंक (decimal number system) -
पूर्वी रोमन संख्या लेखन पद्धत जगभरात वापरली जायची. परंतु एका ठरावीक संख्येनंतर रोमन सख्यांमध्ये मोजमापन करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मग भारतीय गणित तज्ज्ञांनी ही पद्धत सुरू केली जी वापरण्यास खूप सोपी होती. जगभरात ती खूप लोकप्रिय झाली आणि तीच अजूनही वापरली जाते.
हे महत्वाचे शोध आहेतच पण अजूनही कोणते शोध तुम्हाला माहीत असल्यास नक्की कमेंट करून सांगा.
लेखिका: शीतल दरंदळे