दारूच्या दुकानाला ५१० कोटींची बोली? कुठे घडलंय हे ?
काहीवेळा एखाद्या गोष्टीसाठी बोली लावताना समोरच्या व्यक्तीची जिरवण्यासाठी बोलीची किंमत फुगवत नेली जाते. याचाच परिणाम म्हणजे जी गोष्ट विकली जाणार असते तिची खरी किंमत कमी असताना पण ती अव्वाच्या सव्वा किमतीला विकली जाते.
राजस्थान येथील हनुमानगड जिल्ह्यातील एका दारूच्या शॉपची बोली सकाळी सुरू होऊन थेट दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता संपली. या लिलावाने मात्र देशभर हवा केली आहे. एखाद्या दारूच्या दुकानासाठी किती बोली लागू शकते? एकवेळ ५ कोटी ठीक आहे, पण इथे सुरू झालेली बोली चक्क ५०० कोटींवर जाऊन थांबली.
या शॉपसाठी मूळ किंमत (Base Price) ही ७० लाख ठेवण्यात आली होती. बोली सुरू झाली तसे आकडे वाढायला लागले. शेवटी बोली जेव्हा 510 कोटींवर थांबली तेव्हा मात्र सगळ्यांचे डोळे विस्फारले होते. यातही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बोली लावणाऱ्या दोन्ही महिला होत्या, आणि एकाच कुटुंबातील होत्या.
याआधी लॉटरी पद्धतीने हे शॉप दिले जात असे. मागच्या वेळी फक्त ६५ लाखात हे शॉप देण्यात आले होते. बोलीचे आकडे बघून आबकारी कराचे अधिकारी देखील चकित झाले. बोली जिंकणाऱ्या महिला किरण कुवर यांना पुढील दोन दिवसात एकूण किमतीच्या २ टक्के रकम जमा करावी लागणार आहे.
तर एकंदरीत बोली लावताना तोल सुटला तर एखादं साधं दुकानही मोठ्या कंपनीच्या किमतीला विकलं जाऊ शकतं, हे यातून सिद्ध होतं.