computer

जपानी विद्यार्थ्यावर बंगलोरच्या पोलिसाची खुर्ची चोरण्याची वेळ का आली ?

कधी कधी कामाच्या ठिकाणी आपल्यावर अन्याय होतो. न्याय मागायला जावे तर उलटे आपल्यालाच चोरावर मोर ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी हताश व्हायला होतं आणि पुढे नेमकं काय कारावं हे आपल्यालाच समजत नाही. अशीच काहीशी स्थिती झाली आहे, जपानहून भारतात इंग्लिश शिकायला आलेल्या, हिरोतीशी तनाका या तरुणाची.

हिरोतोशी तनाका याने २०१९ मध्ये बेंगळूरूच्या एका इंग्लिश कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश घेतला होता. त्याचा कोर्स संपल्यावर तो परत जाणार होता, पण कोचिंग क्लासेसचे मालक त्याला म्हणाले की, आमच्या क्लासचे प्रमोशन करण्यासाठी थोडी मदत कर. याबदल्यात त्याला योग्य ते मानधन देण्याचेही कबुल करण्यात आले. 

कित्येक दिवस मेहनत करून प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही त्याला त्याचा पगार मिळाला नाही. या विषयावर जेव्हा त्याने क्लास मालकाशी चर्चा केली तेव्हा पागार तर सोडा त्याला धड उत्तरेही मिळाली नाहीत. त्या क्लास मालकांनी हिरोतोशीला सरळ सरळ उडवून लावले. हिरोतीशीला याचा राग येणे तर साहजिकच होते. त्याने रागाच्या भरात त्या क्लास मालकाच्या श्रीमुखातच भडकावून दिली.

त्या क्लास मालकाच्या अंगावर धावून जात त्याला धक्काबुक्कीही केली. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तसे त्या क्लास मालकाने उलट हिरोतोशीवरच केस केली. शिवाय, ‘माझ्यावर हात उगरतो का तुला बघूनच घेईन,’ अशी धमकीही दिली. हिरोतोशीचे म्हणणे आहे की, ‘पगार नाही तर राहूदे, माझी फी तरी यांनी परत दिली पाहिजे.’ पोलिसांनी दोघांच्यात मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचे ठरवले. पोलिसांनी हिरोतोशीला माफीपत्र लिहून देण्यास सांगितले. 

पोलिसांनी हिरोतोशीला पोलीस स्टेशन मध्ये चर्चा करण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले आणि तिथे त्याचे सगळे समान जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याचा फोनही जप्त करण्यात आला. हिरोतोशीने संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. पुढचे १९ दिवस त्याला पराप्पण आग्रहारा जेलमध्ये काढावे लागले. शेवटी त्याने कसाबसा एक वकील मिळवला आणि आपला जमीन करवून घेतला. 

हिरोतोशी जेल मधून बाहेर आल्यानंतर त्याने पोलिसांकडे त्याचे जप्त केलेले साहित्य परत देण्याची विनंती केली. तर त्याचेच साहित्य त्याला परत करण्यासाठी पोलिसांनी ८,५०० रुपयांची लाच मागितली. शेवटी हिरोतोशीने मानव अधिकार आयोगाकडे तक्रार केली. त्याच्या तक्रार नोंदवून घेऊन त्याला सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात आली, पण पोलीस या तारखेसाठी उपस्थितच राहिले नाहीत.

या सगळ्या गोंधळात त्याच्या स्टुडंट व्हिसाची मुदतही संपून गेली. याचा अर्थ त्याला जपानला परत जाणे भाग होते. परंतु आपले साहित्य आणि आपली क्लासची फी घेतल्याशिवाय जायचे नाही असा निर्धार केलेल्या हिरोतोशीला न्याय मिळवण्यासाठी भारतात थांबयाचेच होते. मग यासाठी या पठ्ठ्याने काय युक्ती केली असावी? आपल्याला आणखी काही काळ तुरुंगात डांबले जावे म्हणून पोलीस स्टेशन मधून पोलिसांची खुर्चीच चोरून नेली. किमान चोरीच्या आरोपामुळे तरी त्याला तुरुंगात डांबले जाईल आणि याकाळात तो पोलिसांना त्यांच्या भ्रष्टाचारासाठी धडा शिकवू शकेल. 

हिरोतोशी म्हणाला, 'मी जेल मधून बाहेर आलो तर माझेच साहित्य देण्यासाठी पोलीस माझ्याकडे लाच मागत होते. काहीही कारण न देता त्यांनी मला अटक केली. नंतर मी वीस दिवस तुरुंगात काढले. आता मला पुन्हा तुरुंगात जायचे आहे, कारण माझ्या व्हिसाची मुदत संपली आहे. त्यासाठी मी काहीतरी गुन्हा करणे आवश्यक होते म्हणून मी पोलीस स्टेशन मधील खुर्ची चोरली. मी भ्रष्टाचाराविरुद्धचा खटला जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मला भारतात राहायचे आहे.’

‘मला जर माझी पुस्तके आणि औषधे मिळाली तर मी कितीही दिवस जेल मध्ये राहू शकतो,’ असे हिरोतोशी तनाकाचे मत आहे.

तर याउलट पोलिसांचे असे म्हणणे आहे की, “आम्हाला त्याच्याविरोधात कोणताही खटला सुरु करायचा नाही. त्याच्यावर चोरीचा आरोप लावण्याचीही गरज नाही. त्याने आधीच पासपोर्ट कायदा आणि परदेशी व्यक्तींसाठी असलेल्या कायद्याचे उल्लंघन केले आहे. एफआरआरओने (फॉरेनर रिजनल रेजिस्ट्रेशन ऑफिस) त्याला २८ फेब्रुवारी पर्यंत परत जाण्याची मुदत दिली असताना तो गेलेला नाही. त्यामुळे या कायद्याच्या उल्लंघनाखाली त्याला अटक करता येऊ शकते. ज्यामुळे आणखी काही काळ इथे राहण्याची त्याची इच्छाही पूर्ण होईल.’

सध्या तरी हिरोतोशी तनाका किती दिवस जेलमध्ये राहणार आणि त्याला न्याय मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर मिळणे थोडे कठीणच आहे.

पण, भ्रष्टाचारा विरोधात लढण्याचा हिरोतोशी तनाकाने निवडलेला हा मार्ग कितपत योग्य आहे असे तुम्हाला वाटते?

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required