डॅम इट!! महेश कोठारेंच्या या चित्रपटांपैकी तुमचा आवडता कोणता?
महेश कोठारेंचं आणि अनुप्रास अलंकारातल्या पाचअक्षरी नावांचं गौडबंगाल काय आहे हे कळत नाही राव. त्याचं प्रत्येक सिनेमातलं महेश जाधव(उच्चारी ज्याधव) हे नांव, हमखास हिरो लक्ष्या हे म्हणजे मराठी चित्रसृष्टीचा अविभाज्य भाग होते.
हिंदी चित्रपटांचा रिमेक असो वा आताच्या कोठारेंच्या चित्रपटांत तितकीशी मजा येत नसो , याच चित्रपटांनी एकेकाळी मनमुराद हसवलंय..
१. धूमधडाका
’प्यार किये जा’ चा रिमेक असूनही अस्सल असावा असा हा चित्रपट. अजूनही टीव्हीवर लागला की त्यातले सगळे डायलॉग पाठ आहेत हे लक्षात येतं.
’जवळकरांना जवळ करा नाहीतर खुर्ची खाली करा’, ’मालकाचा मुलगा’ हे तर आहेच, पण गाणीही अफलातून होती. ’अगं अगं पोरी फसलीस गं’, ’हा चिकीचिकी बुबुम बम’, ’प्रितम्मा, प्रितम्मा, तू माझी चिम्मा’ आणि झालंच तर लक्ष्यासाठी प्रत्येक सिनेमात असलेली फिल्मी गाण्यांची पॅरेडी ’सिनेमावालंsss' पण भारी होती.
रेडे आणि त्याची मुलगी आवडाक्का आठवत असेलच. काही वर्षांनी ती बाई लक्ष्याच्या आईच्या भूमिका करू लागली होती. लक्ष्याचा ब्रेकडान्सची व्याख्या-’कमरेखालच्या व्यायामाचा प्रकार’ आठवतेय का?
आणि सर्वात कडी म्हणजे अशोक सराफचं व्हॅहॅ व्हीही व्हीहॅ.
२. दे दणादण
मारूतीरायाच्या नावाने अंगात शक्ती संचारणारा, लाल रंग पाह्यलावर गळाठणारा लक्ष्या आणि हीहीही करणारा कवट्या महांकाळ!! सहाफूट उंचीचा आणि आडदांड शरीराचा खलनायक म्हणून राहूल सोलापूरकर तेव्हा प्रचंड गाजला. इथेही लक्ष्याची हिरॉईन धूमधडाकामधली आवडाक्काच होती.
३. थरथराट
सिनेमा रिलीज झाल्याच्या काळात कित्येकांनी राहूल सोलापूरकरसारखे टक्कल करून घेतले होते. ’घामही फुटला अंगाला गं सुटलाय थरथराट’ या टायटलसॉंगखेरीज इतरही गाणी तुफान गाजली होती. या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला नवा खलनायक दिला.
४. धडाकेबाज
आधीच्या सिनेमांच्या मानाने यात तितकीशी रंगत नाही आली. बाटलीतला गंगाराम बोअर होता. दीपक शिर्केला आपण हिंदीत फक्त आणि फक्त खलनायकाच्या रूपात पाह्यलं. कोठारेंने त्याला मात्र सहनायकाच्या भूमिका दिल्या.
५. झपाटलेला
ओम भग्नीभागोदरी.. ओम फट स्वाहा... हा सिनेमा काहीतरी नावाने हिंदीतपण डब झाला होता. तात्या विंचूने खलनायक म्हणून बहार आणली होती. याचा दुसरा भाग मात्र तितकासा चालला नाही.
६. पछाडलेला
धडाकेबाज आणि झपाटलेला मध्ये हरवलेली जादू महेश कोठारेंना परत एकदा पछाडलेलामध्ये गवसली. नवीन चेहरे आणि कोठारेंची पाहुणी भूमिका याने या सिनेमात रंगत आणली. दामोदरपंत नाटकापासून एकाच वेळी अनेक भूमिका करणारा भरत जाधव या सिनेमापर्यंत सुसह्य होता. नंतर मात्र तोचतोचपणामुळे सारी गंमत गेली.
७. खबरदार
संजय नार्वेकर, भरत जाधव आणि निर्मिती सावंत या त्रिकूटानं या सिनेमात धम्माल केली. कोठारेंनी स्वत:च्याच डॅम इटची खिल्लीही इथे स्वत:च उडवलीय.
८. जबरदस्त
महेश कोठारेंचा आतापर्यंतचा सर्वात पकाऊ पिक्चर कोणता असं विचारलं तर उत्तर देण्यासाठी फार विचार करावा लागणार नाही.