बर्फाळ प्रदेशात उष्णतेची लाट कशी आली? कॅनडा आणि अमेरिकेला त्रस्त करणाऱ्या 'हिट डोम'बद्दल जाणून घ्या!!
सध्या कुणीही 'लाट' म्हणले तर भीतीच वाटते. पण आज कोरोनाच्या लाटेविषयी नाही तर उष्णेतेच्या लाटेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. आणि ही उष्णतेची लाट चक्क बर्फ पडणाऱ्या देशात आली आहे. एरवी थंडीमुळे बर्फ होणारे देश उष्णतेच्या लाटेत अक्षरशः भाजून निघत आहेत. इतके की आजपर्यंत १०० हून जास्त लोकांचा मृत्यू या उष्णतेमुळे झाला आहे.
कॅनडा आणि वायव्य अमेरिकेत सध्या ही उष्णतेची लाट आली आहे. एरवी कॅनडा म्हटलं की बर्फाच्छादित प्रदेश डोळ्यासमोर येतो. तिथली थंडी आठवते. पण त्याच कॅनडात तापमान पन्नास अंशांजवळ पोहोचलं आहे. एरवी इथे ३० डिग्रीच्या वर तापमान जात नाही.
उष्णतेच्या लाटेमुळे इथे एका दिवसात ७० जणांचा मृत्यू झाला आहे. व्हँकुवर हे ब्रिटिश कोलंबिया राज्यातलं शहर आहे. हा भाग कॅनडाच्या नैऋत्य भागात आहे. व्हँकुवर शहरात १८ जूनपासून १३० माणसं उष्णतेमुळे मरण पावली आहेत. यात बहुतांश वयोवृद्ध आहेत. याच राज्यातलं दुसरं शहर म्हणजे लिटन शहर. या शहरात २९ जूनला सलग तिसऱ्या दिवशी ४९.०५ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेले आहे.
इतका भयंकर उन्हाळा इतिहासात पहिल्यांदाच आला आहे. लिटनमध्ये लोक अक्षरशः रस्त्यांवर येत नाहीत. मुलं खेळताना दिसत नाहीत. एरव्ही उन्हाळ्यातही ब्रिटिश कोलंबियातलं तापमान फारसं जास्त नसतं त्यामुळे अनेक घरांमध्ये एसी नाहीत. त्यामुळे व्हँकुवरमध्ये काही ठिकाणी तात्पुरते पाण्याचे कारंजे आणि कूलिंग सेंटर्स उभी केली आहेत. अनेक हॉटेल्स फुल्ल झाले आहेत. एसीची मागणी वाढली आहे.
तशीच परिस्थिती अमेरिकेतील पोर्टलँडमधील लोकांचीही आहे. भीषण उष्णतेमुळे सगळेजण हैराण झाले आहेत. गेल्या शनिवारी तापमानाने याआधीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ४५ डिग्रीच्या वर तपमान गेल्याने लोक आजारी पदत आहेत.
ही लाट कशी आली याचा अभ्यास करताना तिथले हवामान तज्ञ सांगतात की, वायव्य अमेरिका आणि कॅनडाच्या वर सध्या तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे ही लाट तयार झाली आहे. तसेच हवामान बदलामुळे असे उष्णतेच्या लाटेसारखे बदल यापुढेही दिसू शकतात. हा उष्णतेचा कहर कधी थांबेल याचा अभ्यास चालू आहे. रस्त्यावर राहणाऱ्या माणसांना थंड पाणी आणि शेल्टर्स दिले जात आहेत.
जागतिक तापमानात वाढीमुळे तिकडे अंटार्टिकाचा बर्फ वितळत आहे तर आता जगातला दुसऱ्या नंबरवर असलेल्या थंड कॅनडाचा वाळवंट झाला आहे. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्ग बदलतो आणि स्वतःचे भीषण रूप दाखवतो हेच यातून सिद्ध होते.
लेखिका: शीतल दरंदळे