'झोमॅटो'चा आयपीओ आलेला आहे...अर्ज करण्यापूर्वी झोमॅटोची संपूर्ण कुंडली जाणून घ्या!!
आज म्हणजे १४ जुलैपासून 'झोमॅटो'या कंपनीचा आयपीओ म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफर सुरु होते आहे. आयपीओ म्हणजे आतापर्यंत खाजगीरित्या सहभाग घेणार्यांच्या पलीकडे जाऊन सर्वसाधारण जनतेकडून भांडवलाची उभारणी करण्यात येते आहे. आता तुम्ही म्हणाल की एखाद्या मास्तराच्या स्टाइलने हे तुम्ही का समजावत आहात? आम्हाला आयपीओ म्हणजे काय ते माहिती आहे. तर मंडळी, इतकी शब्दफोड करून या इश्यूचे असे अनेक पैलू तुमच्यासमोर मांडायचे आहेत ज्याचा आतापर्यंत विचार करण्याची वेळ आलीच नव्हती.
चला तर, आमची मास्तरकी पुढे वाचा!!
१. झोमॅटो लिमिटेड ही एक युनिकॉर्न स्टार्ट-अप कंपनी आहे. स्टार्ट-अपचा सर्वसाधारण अर्थ असा की टेक्नॉलॉजीच्या मदतीने उभा राहिलेला व्यवसाय आणि जेव्हा या व्यवसायाचे व्हॅल्यूएशन (मूल्यांकन) १ बिलीयन म्हणजे १०० कोटी डॉलरचा आकडा गाठते तेव्हा त्याला युनिकॉर्न म्हटले जाते. झोमॅटो ही शेअरबाजारात येणारी आणि नोंद होणारी पहिली युनिकॉर्न कंपनी असेल. युनिकॉर्न म्हणजे १०० कोटी त्या कंपनीत जमा असतात असे नाही. त्या कंपनीच्या सुरुवातीच्या काळात पैसे गुंतवणारे आणि त्यानंतरच्या टप्प्यात येणार्या गुंतवणूकदारांच्या मूल्यमापनाप्रमाणे ही युनिकॉर्न कंपनी ठरते. हे मूल्यमापन म्हणजे त्यांच्या नजरेत येणारे कंपनीचे भविष्यकालीन चित्र असते. आता आयपीओनंतर झोमॅटो खर्या अर्थाने ९००० कोटी रुपयांचे भांडवल गाठीशी बांधून आपण समजतो त्या पारंपारिक अर्थाने झोमॅटो युनिकॉर्न कंपनी होणार आहे. *युनिकॉर्न ही एक संकल्पना आहे. या संकल्पनेचा पहिला वापर एलीन ली या गुंतवणूकदाराने २०१३ साली केला होता.
२. झोमॅटो ही अॅग्रीगेटर स्वरुपाची कंपनी आहे. आता अॅग्रीकेटर म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आपण ओला किंवा उबर या कंपन्यांचे उदाहरण घेऊया. ओला -उबरच्या गाड्या त्यांच्या मालकीच्या नसतात, पण त्या गाड्यांना भाडी मिळवून देण्याचे काम म्हणजे ग्राहक आणि सेवादाता यांना जोडण्याचे काम फक्त ओला -उबर करत असतात. झोमॅटोचे स्वतःचे एकही रेस्टॉरंट नाही, पण अन्न पुरवठा करण्याचे काम ते करत असतात.
प्रश्न असा पडतो की ओला-उबर आणि झोमॅटोकडे त्यांचे स्वतःचे काय आहे? त्याचे उत्तर असे की त्यांच्याकडे ग्राहक आहेत आणि हे ग्राहक सगळ्यांनाच हवे असतात. ग्राहकाला सोय हवी आहे जी त्यांना या कंपन्या देत असतात. ही सोय देणारे तंत्र आणि त्याची रचना ऍग्रीगेटर कंपन्यांच्या मालकीची असते.
हे आणखी सोपे करून सांगायचे झाले तर आणखी एक उदाहरण घेऊ या. आपल्या घरात महाराष्ट्र विद्युत मंडळाची वीज येत असते. ही वीज MSEDC तर्फे वितरीत केली जाते. सध्या ते फक्त एकाच कंपनीची म्हणजे बोर्डाची वीज वाटतात म्हणून ती डिस्ट्रीब्यूशन कंपनी म्हणवली जाते. भविष्यकाळात हीच कंपनी बोर्डासोबत- टाटा- बेस्ट- अदाणी -रिलायन्स या सर्वच कंपन्यांची वीज ग्राहकाच्या मागणीप्रमाणे पुरवायला लागली की ती 'इलेक्ट्रीसीटी अॅग्रीगेटर कंपनी' म्हणवली जाईल.
३. आता पुन्हा झोमॅटोच्या शेअरचा विचार करूया. सामान्य गुंतवणूकदाराला हे समजणे आवश्यक आहे की ही कंपनी सध्या तोट्यातच चालते आहे आणि येणार्या काही वर्षांत ती तोट्यातच चालण्याची शक्यता आहे. तर मग अशी गुंतवणूक का केली जाते? अशी गुंतवणूक केवळ भविष्यात ती जोरात चालेल या अंदाजावर आणि कंपनीच्या बिझनेस मॉडेलच्या जोरावर केली जाते. जर तुम्ही या कंपनीतून नजिकच्या काळात डिव्हीडंडची अपेक्षा करत असाल तर ते शक्यच नाही. सोप्प्या शब्दात सांगायचं तर "पोरगं लईच हुशार आहे -वकीलीच्या परीक्षेत चारदा नापास झालंय, पण एकादा पास झालं की राम जेठमलानी झाल्याशिवाय थांबणार नाही बघा! आणि हे समजत असलं तर पोरगी द्या -बार उडवू या!!!"
पण हे असं घडतं का? हे समजण्यासाठी आता एक उदाहरण घेऊया अॅमेझॉनचे! कंपनीचा आयपीओ १९९७ साली आला तेव्हा ती तोट्यात चालणारी कंपनी होती -पब्लिक इश्यूनंतरही तोट्यातच होती. कंपनीने पहिला नफा कमावला २००३ साली आणि आज एका शेअरची किंमत आहे ३५०० डॉलर! तर मग ज्यांनी कंपनी तोट्यात आहे या एका कारणासाठी अॅमेझॉनचे शेअर्स घेतले नसतील ते आज हळहळतच असतील. ज्यांना कंपनीच्या भविष्यकाळाचा भरवसा वाटत होता ते आज आनंदात असतील. कारण १९९७ साली केलेली १००० डॉलरची गुंतवणूक आज २० लाख डॉलर झाली आहे.
थोडक्यात सांगायचे तर, या नव्या युगातल्या कंपन्या पारंपारिक गुंतवणूकीच्या गणिताला छेद देणार्या आहेत. जर तुम्ही पारंपारिक पध्दतीने चालणारे गुंतवणूकदार असाल तर झोमॅटाचा आयपीओ तुमच्यासाठी नाहीच नाही. पण झोमॅटोच्या बिझनेस मॉडेलवर तुमचा विश्वास असेल तर या आयपीओकडे तुम्ही सुवर्णसंधी म्हणूनच बघायला हवे!
आता बिझनेस मॉडेल हा शब्द चार वेळा वापरल्यावर झोमॅटोचे बिझनेस मॉडेल काय आहे ते समजावून सांगणे भाग आहे. त्याच्या सात पायर्या आहेत.
१. झोमॅटो त्यांच्या अॅपवर खाण्यापिण्याच्या ऑर्डर जमा करते.
२. त्या ऑर्डर ज्या ज्या हॉटेलच्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवते.
३. हॉटेलमधून पार्सल तुमच्यापर्यंत घरी आणून देते.
४. पैसे जमा करून घेते.
५. हॉटेलचा हिस्सा त्यांना देते.
६. उरलेल्या पैशातून खर्च भागवते.
७. त्यातून जे पैसे उरतात तो कंपनीचा ऑपरेशनल प्रॉफीट असतो.
आतापर्यंत त्यांचा व्यवसाय ६ व्या पायरीपर्यंत व्यवस्थित चालतो आहे. ७ व्या पायरीची सगळीच गडबड आहे. हातात पैसे उरत नाहीत आणि तोटा काही संपत नाही. मग धंदा चालवायचा खर्च कोण करतंय? तर पैसे जमा झालेल्या भांडवलातूनच खर्च होत आहेत. म्हणजे मुद्दलात खोट वाढते आहे. अशी खोट किती दिवस सहन करणार? जोपर्यंत 'मिनीमम ऑर्डर व्हॅल्यू' वाढत नाही तोपर्यंत!!
सुरवातीला झोमॅटोच्या अॅपचा वापर करणार्यांची संख्या कमी होती. एकटे राहणारे विद्यार्थी- लग्न न झालेली, पण कमावती मुलंमुली- आणि अर्थातच उत्साही खाणारे खवय्ये! या काळात झोमॅटोकडे येणार्या ऑर्डरची सरासरी किंमत कमी होती. त्यानंतर लॉकडाऊनचे दिवस आले आणि घरातील बाल- तरुण -वृध्द सगळेच झोमॅटोच्या माध्यमातून पार्सल मागवायला लागले. २०१९ च्या सुरुवातीला सरासरी एक ऑर्डर २६४ रुपयांची होती आणि आता २०२०च्या शेवटापर्यंत सरासरी ४०० पर्यंत पोहचली आहे. आता दुसरा लॉकडाऊन आला पुन्हा त्यात भर पडली. म्हणजेच कंपनीचा नफा पण वाढत गेला. म्हणजे असाच आकडा फुगत गेला तर नफाही त्याच प्रमाणात वाढत जाईल. हाच तर्क पुढे चालवला तर असा अर्थ निघतो की लॉकडाऊन संपल्यावर सरासरी ऑर्डर कमी होईल का? सुरुवातीला कदाचित होय, कारण लोक बाहेर फिरायला लागतील पण नंतर पुन्हा ती वाढेल कारण या अॅपची उपयुक्ततता आता सगळ्यांना कळली आहे. हे समजण्यासाठी हे आकडे वाचा!
एका वर्षात २३.८२ ऑर्डरच्या माध्यमातून ९४८२ कोटी रुपयांची पार्सलं १६९८०२ डिलीव्हरी बॉइज ने-आण करत असतात. ३.२ कोटी ग्राहक या ऑर्डर्स करत असतात.
कंपनी आता तोट्यात आहे, पुढची काही वर्षे तोट्यातच असेल तर आयपीओत अर्ज करायचा का?
हा निर्णय तुम्ही टेक्नॉलॉजी हा विषय किती सहज समजता आणि जोखीम घेण्याची तुमची किती मानसिक तयारी आहे त्यावर अवलंबून आहे. तोट्याचं म्हणाल तर तोट्यात चालणार्या अनेक कंपन्या बाजारात असतात. त्यांच्या शेअरमध्ये लोकं पैसे गुंतवतात, कारण बाजारात येणारे लोक डिव्हीडंडकडे नाही, तर 'ट्रेडींग ऑपॉच्यूनिटी' कडे बघत असतात. कंपनी नफ्यात असो वा तोट्यात, भाव सतत वरखाली होतात आणि पैसे कमावण्याची संधी मिळते हेच बाजारात बघितले जाते. अशी 'ट्रेडींग ऑपॉच्यूनिटी' या शेअरमध्ये मिळेल का?? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. ९००० कोटींच्या आयपीओमध्ये ७५% हिस्सा Qualified institutional buyer (QIB) म्हणजे LIC सारख्या मोठ्या संस्थांकडे असेल. हे संस्थात्मक गुंतवणूकदार 'लाँग टर्म' गुंतवणूकदार असतात. त्यामुळे उरलेले २५% शेअर ट्रेडींगसाठी उपलब्ध असतील त्या २५% पैकी फारच कमी शेअरमध्ये उलाढाल होत राहील आणि त्यामुळे भाव वरखाली होत राहतील.
आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा! जर हा आयपीओ यशस्वी झाला तर येत्या काळात अनेक स्टार्ट-अप बाजारात येतील आणि स्टार्ट-अप शेअर्मध्ये गुंतवणारा एक नवा जथ्था तयार होईल! तेव्हा आयपीओत पैसे गुंतवायचे अथवा नाही हा निर्णय घेण्यापूर्वी हे आकडे वाचा!
एका वर्षात ऑर्डर २३.९
उलाढाल ९,४८२ कोटी रुपये
डिलीव्हरी बॉइज १,६९,८०२
नियमित ग्राहक ३.२ कोटी
एकूण हॉटेल ३,८९,९३२
आता हे आकडे वाचल्यावर तुम्हीच अंदाज करा की झोमॅटो या पाठीराख्यांच्या संख्याबळावर भविष्यात काय करू शकते!!