जगभरात बंदी असलेले हे १० पदार्थ आपण रोज खातो? यातील कोणते पदार्थ तुम्ही खाल्ले आहेत??
परदेशात फिरायला गेल्यावर तिथली निसर्गसंपन्न, ऐतिहासिक, प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासोबतच तिथल्या विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्यातही न्यारी मजा असते. बऱ्याचशा सहलींचे नियोजन करण्यामागे खरे तर डोळ्यांचे आणि जिभेचे चोचले पुरवणे हाच एक उद्देश असतो. समजा एखाद्या देशातील मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्ही एखाद्या पदार्थाची ऑर्डर दिली आणि तिथे नेमक्या त्याच पदार्थावर बंदी असली तर...? हो जशी भारतात काही पदार्थांवर बंदी आणण्यात आली आहे, तशाच पद्धतीने विविध देशात विविध पदार्थांवर बंदी आणण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया कुठल्या देशात नेमका कुठला पदार्थ निषिद्ध आहे.
१) अमेरिका - किंडर जॉय
किंडर जॉयवर बंदी? हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल. कारण आपल्याकडे तर लहान मुले किती कौतुकाने हे किंडर जॉय खातात, पण अमेरिकेत मात्र यावर बंदी आहे. कारण या किंडरजॉय मधील चॉकलेटसोबत जे छोटेसे खेळणे दिले जाते अनेकदा मुले चॉकलेट समजून ते खेळणेच गिळतात आणि हे खेळणे मुलांच्या घशात अडकते. यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अमेरिकेने या चॉकलेटवर बंदी घातली आहे.
२) कॅनडा - कच्चे दूध
ताज्या कच्च्या दुधात जंतू असतात, म्हणून दूध वापरण्यापूर्वी ते निर्जंतुक केले जाते. अशा निर्जंतुक केलेल्या दुधाला पाश्चराइज्ड मिल्क म्हणतात. अनेकदा दुधाच्या पाकीटावर तुम्ही हे वाचले असेल. अनपाश्चराइज्ड दूध हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते म्हणून कॅनडात अशा प्रकारच्या दुधावर बंदी घालण्यात आली आहे.
३) सिंगापूर – च्युईंगम
च्युईंगम घशात अडकल्याने गुदमरून मृत्यू होण्याची शक्यता असते. आपल्याकडेही अशा अनेक घटना घडल्या आहेत. शिवाय, च्युईंगम चघळून नंतर ते कुठेही फेकून दिले जाते. ज्यामुळे स्वच्छतेचाही प्रश्न उद्भवतो. तर या दोन्ही समस्या टाळण्यासाठी सिंगापूरने थेट च्युईंगमवरच बंदी आणली आहे.
४) युरोपियन युनियन – जेली चॉकलेट
किंडर जॉय प्रमाणेच आपल्या मुलांना आणखी एक आवडणारा पदार्थ म्हणजे जेली चॉकलेट. लहान मुलेच नाही तर आपल्याकडे मोठ्या व्यक्तीसुद्धा हे चॉकलेट आवडीने खातात, पण युरोपात मात्र या चॉकलेटवर बंदी घालण्यात आली आहे. जेलीला वेगवेगळा आकार देण्यासाठी तिला थोडा घट्टपणा आणला जातो आणि यासाठी त्यात कोंजॅक ग्ल्युकोमॅनन नावाचा घटक मिसळला जातो. या थिकनिंग एजंटमुळे लहान मुलांचा श्वास गुदमरला जाण्याची शक्यता असते म्हणून तिथे या जेली चॉकलेटवरच बंदी आणण्यात आली आहे.
५) फ्रान्स – केचअप
तुम्हाला आठवते का तुम्ही शेवटचे केचअप कधी खाल्ले असेल. हो, अगदी काल किंवा परवा. कारण केचअप हा आपल्या आहारातला एक सामान्य घटक पदार्थ बनला आहे. लहान मुलांच्या खाण्यात तर हा पदार्थ असतोच. अगदी डब्यातील पोळीभाजीची जागा या केचअप रोलने कधी घेतली हेही समजले नाही, इतका तो मुलांच्या आवडीचा बनला आहे. अगदी याच कारणाने फ्रान्सने मुलांच्या डब्यात केचअप देण्यास बंदी घातली आहे. केचअपमुळे मुले पारंपरिक फ्रेंच खाणे विसरतील अशी भीती फ्रेंच लोकांना वाटते आहे. त्यांना फक्त आठवड्यातून एकदाच फ्रेंच फ्राईजसोबत केचअप खाण्याची परवानगी आहे. आणि हो, फ्रेंच फ्राईज हा फ्रेंच टोस्टसारखाच फ्रेंच पदार्थ बिल्कुल नाही बरं!!
६) सोमालिया – समोसा
सामोसा? आता यात काय आहे बंदी घालण्यासारखं? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, पण आता कुणाला कशात काय वावगं दिसेल हे सांगता येत नाही. तसच सोमालियातील कट्टर इस्लामपंथी अतिरेक्यांना समोस्याचा आकार हा ख्रिश्चन लोकांच्या पवित्र ट्रिनीटी देवतेसारखा वाटतो. म्हणजे ट्रिनीटी देवता हा त्रिमुखी असतो आणि समोसा त्रिकोणी असतो ना म्हणून! त्रिकोणी आकाराचा हा समोसा त्यांना इस्लाम विरोधी वाटतो म्हणून तिथे समोशावर बंदी घालण्यात आली आहे.
७) युरोप - माउंटन ड्यू
माउंटन ड्यू आणि तत्सम सायट्रस सोड्याच्या सर्व पेयांवर युरोपात बंदी घालण्यात आली आहे. या पेयांमध्ये ब्रोमानायटेड व्हेजिटेबल ऑईल (BVO) असते आणि या BVOच्या अतिरिक्त सेवनामुळे थकवा, थायारॉईड, वर्तन विषयक समस्या निर्माण होतात असे तिथल्या तज्ञांचे मत आहे. म्हणूनच युरोपमध्ये याच नाही तर याप्रकारच्या इतर शंभर पेयांवरही बंदी घालण्यात आली आहे.
८) कॅलिफोर्निया – कच्चे बदाम
कच्चे बदाम खाल्ल्याने सल्मोनेल्ला नावाचा आजार होतो. म्हणून कॅलिफोर्नियामध्ये बदाम खाण्यापूर्वी ते पाश्चराइज्ड म्हणजे निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. म्हणून तिथे कच्चे बदाम विकण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.
९) अमेरिका – हॅगीस
हॅगीस हा एक स्कॉटिश पदार्थ आहे. हा पदार्थ बकरीचे काळीज, लिव्हर आणि फुफ्फुसापासून बनवला जातो. त्याला कांदा, ओटमिल आणि इतर मसाले टाकून आणखी चविष्ट केले जाते. १९७१ पासून अमेरिकेत या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या नियमानुसार कोणत्याही जिवंत प्राण्याचे फुफ्फुस काढणे हे बेकायदा कृत्य मानले जाते म्हणूनच या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे.
१०) फ्रान्स आणि युरोप - ऑर्टोलॉन
ऑर्टोलॉन हा एक छोटा पक्षी आहे. याच्या शिकार करण्याच्या क्रूर पद्धतीमुळे फ्रान्सने या पक्ष्यापासून बनवल्या जाणाऱ्या डिशवर बंदी घातली आहे. फक्त २८ ग्रॅम वजनाचा हा पक्षी आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत मावेल एवढा छोटा असतो. हा पक्षी अंधारात ठेवल्यास तो फक्त खातच राहतो म्हणून त्याला एका बॉक्समध्ये ठेवले जाते. त्यांनी पुरेसे खाणे खाल्ल्यावर त्यांना आर्मगनॅक ब्रँडीत बुडवून मारले जाते आणि ते तसेच खाणाऱ्याच्या टेबलवर सर्व्ह केले जाते. या पक्ष्याचे पाय सोडल्यास त्याला असाच अक्खा खाल्ला जातो. त्यांना मारण्याच्या या क्रूर पद्धतीमुळेच यावर बंदी घालण्यात आली आहे.
तर हे आहेत ते पदार्थ जे काही देशांत निषिद्ध मानले जातात. आपल्याकडे मात्र यातील काही पदार्थ अगदी सहज उपलब्ध होतात. इतर काही देशांतील असेच निषिद्ध पदार्थ जर तुम्हाला माहीत असतील तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी