नंद साम्राज्याची गोदातीरावरची उपराजधानी नवनंदडेहरा म्हणजेच नांदेड !
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा हा जसे एकमेकांशी सारखेपणा राखून आहे तसेच येथील प्रत्येक जिल्ह्याची काही वेगळी विशेषता आहे. आज आपण अशाच एका जिल्ह्याची ओळख करून घेणार आहोत. आजच्या लेखाचा विषय हा नांदेड जिल्हा आहे. राज्याच्या दक्षिण टोकाला तेलंगणाला लागून असलेला नांदेड जिल्हा अनेकार्थाने समृद्ध आहे.
नांदेडचा इतिहास बघायचा झाला तर नांदेड हे जुने आणि ऐतिहासिक केंद्र आहे. नांदेडची नोंद १२ व्या च्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिल्या गेलेल्या लीळा चरित्रातही सापडते. भरताच्या आजी-आजोबांचे स्थान असा महाभारतातही उल्लेख आहे. इसवी सन पूर्व ५व्या आणि चौथ्या शतकात नांदेडवर नंद घराण्याचे राज्य होते. इसवी सन पूर्व तिसर्या शतकात म्हणजेच सुमारे ईसवीसनपूर्व २७२ ते २३१ हा अशोकाच्या अधीन मौर्य साम्राज्याचा भाग होता.
इसवीसनाच्या पहिल्या शतकात या भागातील सत्ता आंध्रभृत्य आणि सातवाहनांकडे होती. १६३६ पासून नांदेड हे निजाम राज्याचे केंद्र होते, यात सध्याचे तेलंगणा आणि कर्नाटक समाविष्ट होते आणि मुघल बादशाह (सम्राट) शाहजहानचाही हा शाही प्रांत होता. १६५७ मध्ये नांदेडचे बिदाह सुबहात विलीनीकरण झाले. १७२५ साली हा भाग निजामाच्या अधिपत्याखाली हैदराबाद संस्थानाचा भाग झाला. मराठवाडा मुक्तीसंग्रामात भारत सरकारने कारवाई करून निझामाचे संस्थान ताब्यात घेतल्यावर नांदेड इतर जिल्ह्यांप्रमाणे भारत आणि नंतर महाराष्ट्रात सामील झाले.
नांदेड नाव या गावाला कसे पडले याबद्दल असलेली आख्यायिका म्हणजे नंदीने गोदावरी नदीच्या तटावर इथे तपस्या केली होती. म्हणून नंदीतट या शब्दापासून उत्पत्ती होत हे गाव नांदेड असे ओळखले जाऊ लागले. नांदेड हळूहळू प्रगतिशील होत गेले. या शहराने झपाट्याने प्रगती करत महानगरपालिका होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.
जिल्ह्याचा भौगोलिक भाग अभ्यासायचा झाल्यास उत्तर आणि ईशान्य भाग हा मुद्खेडच्या टेकड्या आणि सातमाळाच्या डोंगरांनी, तर दक्षिणेचा भाग हा बालाघाटच्या डोंगराने व्यापला आहे. किनवट तालुक्यात असणाऱ्या डोंगरांमध्ये साग आणि बांबूची झाडे मुबलक प्रमाणात दिसतात.
जिल्ह्यातील मध्य भागातून गोदावरी नदी वाहते. जिल्ह्यातली ही सर्वात प्रमुख नदी आहे. परभणी जिल्ह्यातून प्रवास करत गोदावरी नंतर थेट आंध्रात प्रवेश करते. पैणगंगा नदी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. मांजरा ही अजून एक महत्वाची नदी नांदेडच्या पूर्व भागातून वाहते. तसेच सीता, कयाधु, लेंडी, आसना, सरस्वती या इतर महत्वाच्या नद्या आहेत. यांच्याबरोबर इतरही अनेक नद्या जिल्ह्यात अस्तित्वात आहेत.
जिल्ह्यात एकचतुर्थांश भागात कापूस घेतला जातो. किनवट आणि हदगाव हे दोन तालुके ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जातात. मागील काही वर्षांपासून नांदेड आणि कंधार या दोन तालुक्यांमध्ये उसाची लागवड केली जात आहे. सोबतच केळी, द्राक्ष इत्यादी बागायती पिकेही काही भागात घेतली जात आहेत.
गोदावरी नदीवर नांदेडजवळच असरजन येथे असलेला शंकरराव चव्हाण उपसा जलसिंचन प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प समजला जातो. येथील जलशयास शंकरसागर असे म्हटले जाते. याचबरोबर मन्याड नदीवर मन्याड, लेंडीनदीवर महालिंगी, देगलूर तालुक्यात करजखेड अशी इतर अनेक धरणे आहेत.
नांदेड जिल्ह्याची मोठी विशेषता म्हणजे येथील गुरुद्वारा. हा जगभरात राहणाऱ्या शीखबांधवांसाठी एक मोठे श्रद्धास्थान आहे. शीखधर्मियांचे गुरू गोविंद सिंग महाराज यांनी आपला देह १९०५ साली नांदेड येथेच ठेवला होता. गुरुगोविंदसिंगजी यांच्या नावाने अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालय याठिकाणी आहे.
नांदेड हे काही महत्त्वाच्या शीख गुरूंशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, गुरु नानक श्रीलंकेला जाताना नांदेडमधून गेले. गुरू गोविंद सिंग १७०७ मध्ये ऑगस्टच्या अखेरीस मुघल सम्राट बहादूर शाह पहिला सोबत नांदेडला आले. बहादूर जेव्हा गोवळकोंडा येथे गेला तेव्हा गुरु गोविंद सिंग नांदेडमध्येच राहिले. गुरु गोविंद सिंग यांनी घोषित केले की ते शेवटचे (दहावे) जिवंत गुरू आहेत आणि पवित्र ग्रंथ, गुरु ग्रंथ साहिब हा शाश्वत "जिवंत" नेता म्हणून स्थापित केला. गुरु गोविंद सिंग हे त्यांच्या चार पुत्रांच्या हौतात्म्यामुळे वंशज नसताना मरण पावले.
भारतातील शीख धर्मियांच्या प्रमुख ५ गुरुद्वारांपैकी एक गुरुद्वारा नांदेडला आहे. याठिकाणी पटनासाहिब यांच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. येथे आशियातील दुसरा सर्वात मोठा लेजर शो दाखवला जातो. सर्व १० गुरूंचा थोडक्यात जीवनपट या लेजर शोच्या माध्यमातून दाखवला जात असतो.
साधारण १८३५ मध्ये महाराजा रणजित सिंग यांनी हैदराबादचा तिसरा निजाम सिकंदर जाह यांच्या आर्थिक सहाय्याने नांदेड येथे गुरुद्वाराचे बांधकाम केले. ते गुरु गोविंद सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर बांधले गेले. गुरुद्वारा हा हजूर साहिबचा भाग आहे
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील प्रमुख व्यक्तिमत्त्व आणि मराठवाड्यासहित संपूर्ण देशाला आदर असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने झालेले विद्यापीठ नांदेड येथे आहे. नांदेड हे संतकवी विष्णूपंत, रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख विचारवंत नरहर कुरुंदकर यांची कारकीर्द नांदेडमध्येच बहरली होती.
नांदेड तालुक्यातील किनवट येथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण शक्तीपीठ असलेल्या माहुरच्या रेणुका मातेचे हे स्थान आहे. रेणुका मातेचे भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. माहूरगडावरील रेणुका मातेचे हे मंदिर नांदेडपासून १३० किमी आहे. देवीचे हे मंदिर यादवकाळात बांधले गेल्याचे सांगितले जाते.
सहस्त्रकुंड धबधबा हा निसर्गप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरावी इतका सुंदर आहे. तब्बल ४० फूट उंचीवरून पडणारे पाणी डोळ्यांचे पारणे फेडते. यवतमाळ पासून १५० किमी दूर असलेला हा धबधबा मराठवाडा विदर्भ सीमेवरच आहे. धबधब्याच्या इकडचा भाग नांदेडमध्ये तर तिकडचा भाग यवतमाळमध्ये येतो. म्हणजेच फक्त दोन जिल्हे नाहीत, तर दोन विभाग या धबधब्याने जोडले आहेत.
तर असा आहे हा नांदेड जिल्हा. यातली कोणती माहिती तुम्हांला आवडली हे कळवा आणि काही उणीव राहिली असेल तर तीही आवर्जून सांगा.
उदय पाटील