computer

सिरपयुक्त आईस्क्रीमला संडे आईस्क्रीम का नाव पडले याच्या सुरस आणि रंजक कथा!

आता उन्हाळ्याचे चटके हळूहळू जाणवू लागले आहेत. उन्हाळा म्हणलं की थंडपेय, रसदार फळ आणि महत्वाचे म्हणजे आइस्क्रीम! खरतर उन्हाळाच नाही कुठल्याही ऋतूत आपल्याला आइस्क्रीम आवडतेच. यात अनेक फ्लेवर्स ही आहेत त्यामुळे कुल्फी पासून बर्फाचा गोळा म्हणा किंवा कॉर्नेटो, कसाटा, स्कूप या कुठल्याही स्वरुपात मिळणारे आइस्क्रीम मनाला आनंदच देते. या प्रकारात संडे आईसक्रीम ही आहेच. मोठ्या काचेच्या बाउलमध्ये रंगेबिरंगी रंगात सजलेले संडे आईसक्रीम अगदी आकर्षक असतात. आज आपण पाहूयात की या प्रकाराला संडे आईसक्रीम हे नाव का पडले आणि याचा इतिहास काय आहे ?

खरेतर संडे आईसक्रीमच्या शोधाबद्दल अनेक वाद आहेत. यात बऱ्याच जणांनी हे शोधले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यातल्या तीन लोकप्रिय कहाण्या आज आपण पाहूयात.

कहाणी एक - १८९० इव्हान्स्टन, इलिनॉय!
१८९० च्या सुमारास अमेरिकेच्या इव्हान्स्टन, इलिनॉय या शहरी भागात एक कायदा करण्यात आला होता. तिथल्या प्रशासनाने दर रविवारी सोडा +आइसक्रीम   विकण्याची मनाई करण्यात आली होती. रविवार हा प्रार्थनेचा वार असल्याने त्या दिवशी पवित्र कामे करायची, यासाठी हा विचित्र कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे तिथले विक्रेते पर्याय म्हणून सोडा वजा आईस्क्रीम विकू लागले. यात फक्त आईस्क्रीम आणि सिरप शिल्लक राहिले. त्यामुळे चवीसाठी यात विविध फळे घालण्यात आली आणि संडे रेसिपी बनली .

कहाणी दोन –१८८१ एड बर्नर्स , विस्कॉन्सिन!

या कहाणीनुसार सोडा फाउंटनचे मालक, एड बर्नर्स यांनी १८८१ साली संडे आईस्क्रीमचा शोध लावला असे म्हणतात. त्यांच्या ग्राहकाने एकदा त्यांना एक वेगळी आइस्क्रीमची डिश द्यावी अशी विनंती केली. बर्नर्सने तेव्हा सोडासाठी वापरल्या जाणार्‍या सिरपसह आइस्क्रीम डिश बनवली. ही सगळ्यांना तुफान आवडली. ती डिश रोजच्या मेनूमध्येही सर्व्ह केली जाऊ लागली आणि ती खूप लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांचा स्पर्धक जॉर्ज गिफी यांना वाटले की आपणही एड बर्नर्ससारखेच सिरपयुक्त आईस्क्रीम बनवावे. त्यांनीही तसेच आईस्क्रीम बनवले आणि फक्त रविवारी विक्रीस ठेवले. "Ice Cream Sunday” हे नाव बदलून त्यांनी Ice Cream Sundae असे नाव ठेवले आणि मेन्यू मध्ये समाविष्ट केले. हळूहळू त्याची लोकप्रियता खूप वाढली आणि ती डिश रोज सर्व्ह केली जाऊ लागली.

कहाणी तीन – १८९३ इथाका, न्यूयॉर्क!

१८९३ मध्ये प्लॅट अँड कोल्टच्या औषध दुकानाचे मालक चेस्टर प्लॅट यांनी आइस्क्रीम संडेचा शोध लावला असेही म्हणतात . प्लॅटने एका रविवारी रेव्हरंड जॉन स्कॉटसाठी व्हॅनिला आइस्क्रीमची डिश तयार केली. चेस्टर प्लॅटने चेरी सिरप आणि कँडीड चेरीसह आइस्क्रीमला आणखी रुचकर बनवले. त्यांनी ही डिश रविवारी शोधून काढली म्हणून या डिशला रविवार या दिवसाचे नाव दिले. तसेच त्याने आपल्या दुकानात "चेरी संडे" अशी त्या आइस्क्रीमची जाहिरातही लावली होती. त्याची कागदपत्रेही सापडली आहेत. त्यामुळे ही कहाणी खरी मानतात.

खरेतर कोणीही दाव्याने सांगू शकत नाही की संडे आईसक्रीमचा शोध कोणी लावला. पण हे आईस्क्रीम फार चवदार असते हे नक्की. यात आता अनेक फ्लेवर्स मिळतात, पण मूळ किंवा क्लासिक संडेमध्ये व्हॅनिला आइस्क्रीमचा समावेश असतो. त्यामध्ये फ्लेवर्ड सॉस किंवा सिरप, व्हीप्ड क्रीम आणि माराशिनो चेरी असते. क्लासिक संडेचे नाव सामान्यतः पाककृतींमध्ये वापरल्या जाणार्‍या फ्लेवर सिरपच्या नावावरुन ठेवले जाते. चेरी संडे, चॉकलेट संडे, स्ट्रॉबेरी संडे, रास्पबेरी संडे इ. नावे तर तुम्ही ऐकली असतीलच. आता यात ड्रायफ्रुटचा समावेश ही करण्यात येतो.

तुम्हालाही संडे आइस्क्रीम आवडते ना? ही माहिती आवडल्यास जरूर शेयर करा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required