नेपाळच्या राजघराण्यातलं हत्याकांड, ९ शक्यता वर्तवल्या जातात, पण अद्याप सत्य कुणालाच माहित नाही!!
राग, हेवा, मत्सर या भावनांपासून कोणाचीही सुटका झालेली नाही. मग तो राजा असो किंवा रंक. फक्त काहीजणांना या भावनांवर नियंत्रण ठेवणं जमतं, काहींना नाही. अशा अनियंत्रित नकारात्मक भावना विनाशालाच आमंत्रण देतात. नेपाळचे राजे वीरेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत असंच काहीसं घडलं. घरातील सगळे सदस्य एका कार्यक्रमासाठी जमलेले असताना एका गोळीबाराने क्षणार्धात अख्खं शाही कुटुंब होत्याचं नव्हतं झालं.
तो दिवस होता १ जून २००१. या दिवशी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने 'नारायणहिती पॅलेस' या शाही निवासस्थानी घरातील सदस्य जमले होते. त्यांच्यावर युवराज दीपेंद्रने अंदाधुंद गोळीबार केला. आपले वडील राजे वीरेंद्र, आई राणी ऐश्वर्या, भाऊ युवराज निरंजन, बहीण युवराज्ञी श्रुती, काका युवराज धीरेंद्र, दोन्ही आत्या, एका आत्याचे पती, आणि आपल्या वडिलांची चुलत बहीण एवढ्या लोकांना त्याने ठार केलं. यावेळी गोळीबारात घरातील अन्य सदस्य जखमी झाले. त्यानंतर दीपेंद्रने स्वतःच्या डोक्यातही गोळी मारून घेतली. पण नेमकं काय घडलं होतं ज्याचा परिणाम म्हणून तो सगळ्या घरादाराच्या मुळावरच उठला होता?
या घटनेमागे वेगवेगळी कारणं दिली जातात. काहीजणांच्या मते युवराज दीपेंद्रचं प्रेमप्रकरण हे यामागचं कारण आहे, तर काहीजणांच्या मते यामध्ये परकीय शक्तींचा हात होता. अजून एका सिद्धांतानुसार नेपाळमधल्याच काही लोकांनी हा कट रचला होता.
सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दीपेंद्रचं प्रेमप्रकरण आणि त्याला असलेला शाही कुटुंबाचा विरोध. दीपेंद्रला भारतातली राजकुमारी देवयानी राणा हिच्याशी लग्न करायचं होतं. त्या दोघांची भेट इंग्लंडमध्ये झाली होती. त्यादरम्यान त्यांच्यात प्रेम फुललं होतं. पण या दोघांच्या लग्नात एक मोठा अडथळा होता. देवयानीची आई भारतातील निम्न दर्जाच्या शाही परिवारातून आलेली होती. हे घराणं म्हणजे ग्वाल्हेरचं सिंदिया घराणं. पूर्वी सिंदिया हे पेशव्यांच्या दरबारी चाकरी करत. म्हणून दीपेंद्रच्या आईचा म्हणजेच राणी ऐश्वर्याचा या लग्नाला विरोध होता. वास्तविक सिंदिया नेपाळच्या राजघराण्यापेक्षा जास्त श्रीमंत होते. पण प्रश्न इभ्रतीचा होता. शिवाय त्या दोघांचं लग्न झाल्यास भारताचं महत्त्व वाढेल हा किंतुही राज परिवाराला सतावत होता. त्यामुळेही राज परिवाराचा या लग्नाला विरोध होता. या विरोधासाठी अजूनही एक कारण दिलं जातं. ते म्हणजे एका ज्योतिषाच्या भविष्यानुसार जर युवराज दीपेंद्र यांना ३५ वर्षाचे व्हायच्या आधी मूलबाळ झालं तर ते महाराजांसाठी अपशकुनी ठरणार होतं. त्यामुळे राणी ऐश्वर्या हिचा विरोध अजूनच प्रखर झाला. यावरून मायलेकांमध्ये अनेकदा खटके उडायला लागले.
त्या दिवशी जेव्हा नारायणहिती पॅलेसमध्ये संपूर्ण कुटुंब जेवणासाठी एकत्र जमलं होतं तेव्हा संध्याकाळपासूनच दीपेंद्रने दारू प्यायला सुरुवात केली होती. मध्ये एकदा पाहुणे जमलेल्या खोलीत जाऊन तो आई-वडिलांना शिवीगाळही करून आला होता. त्यावेळी काही नातेवाईक त्याला त्याच्या खोलीत सोडून आले. तिथे गेल्यानंतर त्याने देवयानीला फोन करून मी आता झोपायला जात आहे असं सांगितलं होतं आणि त्यानंतर थोड्याच वेळात हे हत्याकांड घडून आलं.
पण इथे मामला केवळ या राजघराण्याच्या सामूहिक हत्याकांडाचा नव्हता, तर ते ज्या रहस्यमय पद्धतीने घडून आलं त्याचा होता. आजही या संदर्भात वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या जातात, त्यापैकी काही प्रसिद्ध थिअरीज पुढील प्रमाणे आहेत.
१. राजपुत्र दीपेंद्र जेव्हा त्याच्या खोलीबाहेर पडला तेव्हा त्याच्याकडे बंदूक आणि इतर हत्यारं होती आणि सैन्यातील जवानासारखा आवेश त्याच्या चालण्यात होता. तो आपल्या खोलीतून बाहेर पडून तडक भोजनकक्षात आला आणि तिथे आल्यावर त्याने गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. या हत्याकांडाची बातमी कळल्यानंतर देवयानीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने लगोलग दुसऱ्या दिवशी नेपाळ सोडला आणि ती भारतात निघून आली.
२. या घटनेनंतर आठ वर्षांनी म्हणजेच २००९ मध्ये तुल बहादुर शेरचन नावाच्या व्यक्तीने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली. एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत नाट्यमय प्रकारे आणि संशयास्पद रितीने त्याने हा खुलासा केला. हेही गूढच आहे.
३. त्यावेळच्या नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हे हत्याकांड एका पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ शाही घराण्यालाच नाही, तर पंतप्रधान गिरिजाप्रसाद कोईराला यांनाही ठार मारण्याची योजना होती. त्यांच्या गाडीवर हल्लाही करण्यात आला होता.
४. कृष्णा अबिरल नावाच्या पत्रकाराने या घटनेवरून 'रक्त कुंड ' नावाची कादंबरी लिहिली आहे. त्याआधी त्याने राणीच्या एका दासीची भेट घेतली होती. या दासीच्या म्हणण्यानुसार त्यादिवशी दीपेंद्रसारखा पोषाख केलेले दोन बुरखाधारी इसम त्या खोलीत शिरले होते आणि त्यांनीच गोळीबार केला होता. हे दोघंजण कोण होते याबाबत अजूनपर्यंत काहीही माहिती मिळालेली नाही.
५. या हत्याकांडामध्ये युवराज ज्ञानेंद्र यांच्यासह त्यांचे सर्व नातेवाईक सहीसलामत बचावले. यावरून एक अंदाज असाही केला जातो की सत्तेच्या लालसेने युवराज ज्ञानेंद्र यांनीच या सगळ्यांचा काटा आपल्या मार्गातून कायमचा दूर केला. युवराज दीपेंद्र आणि निरंजन यांच्यानंतर युवराज ज्ञानेंद्र यांच्याकडे गादी येणार होती. त्यामुळे त्यांना मार्गातून दूर करण्यासाठीच हे हत्याकांड घडवून आणलं गेलं.
६. नेपाळमधील काही लष्करी अधिकारी आणि नेते यांच्या मते या हत्याकांडा मागे भारताचा, मुख्यतः रॉ (रिसर्च अँड अनालिसिस विंग - Research and Analysis Wing) चा, हात होता.
७. राजवाड्याच्या बाहेर तैनात केलेले सुरक्षा रक्षक तसंच डॉक्टर्स यांच्यावरही संशय घेतला गेला आहे.
८. या हल्ल्यातून कुठे ओरखडाही न उमटता सहीसलामत बचावलेला युवराज पारस हाही एक संशयित आहे. त्याचा भूतकाळ आणि त्याचे एकंदरीत कारनामे यामुळे त्याच्यावरच्या संशयाला बळकटी मिळाली होती.
९. अजून एक थिअरी म्हणजे या हल्ल्यादरम्यान मानवी बॉम्बचा वापर केला गेला होता.
कुटुंबातील अन्य वारसदार मृत झाल्यामुळे कोमात असतानाही दीपेंद्रकडे राजगादी सोपवण्यात आली. पण स्वतःवर गोळी घालून घेतल्यावर कोमात गेलेल्या दीपेंद्रचा तीन दिवसांनी मृत्यू झाला.
प्रश्न तर खूप आहेत, पण समाधानकारक उत्तर कशाचंच नाही असं हे प्रकरण. कुणास ठाऊक यातील सत्य कधी बाहेर येईल...
स्मिता जोगळेकर