computer

अंतहीन झूम होणारा हा व्हिडिओ पाह्यलात का? ही कलाकारी अचंबित करणारी आहे..

सध्याच्या डिजिटल युगात जगात रोजनव्या भन्नाट गोष्टी समोर येत आहेत. डिजिटल नसलेल्या गोष्टीही आता 'डिजिटली' आधीपेक्षा भन्नाट होऊन समोर येत आहेत. पेंटिंग किंवा इतरही अनेक कलेचे प्रकार हे इंटरनेटवरील अनेक साधनांच्या साहाय्याने अफलातून पद्धतीने आपल्या समोर मांडले जाताना दिसतात.

एका अशाच कलाकाराची एक कलाकारी लोकांना डोळे विस्फारून पाहण्यासाठी भाग पाडत आहे. काहीतरी वेगळं, काहीतरी किमया ओतून तयार केलेलं असंकाही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला वेळ लागत नाही. या आर्टवर्कबद्दल देखील असेच काही झाले आहे.

@thefigen नावाच्या ट्विटर हँडलवरून एक अवघा १.२३ मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. Vaskange नावाच्या कलाकाराने हा व्हिडिओ शेअर केला आहे. जगभरातील कोट्यवधी लोक हा व्हिडिओ बघून अवाक झाले आहेत. अशी कुठली भन्नाट कलाकारी यात आहे असा प्रश्न आता तुम्हाला नक्कीच पडला असेल.

आपण रोज हजारो फोटो बघतो, यातले कित्येक आपण झूम करून बघतो पण दोन तीन वेळेस झूम केले की पिक्सल ब्लर व्हायला लागतात. हा व्हिडिओ बघत असताना दर वेळेस झूम केल्यावर एक वेगळेच चित्र समोर येते. असे कितीही वेळा झूम केले तरी हे चित्र काय संपत नाही. जसे आपण स्वप्नात एकेक करत वेगळ्या जगात मुशाफिरी करतो सेम तोच अनुभव यातून मिळतो.

हा व्हिडीओ बघितल्यावर एकाच वेळी आश्चर्य आणि आनंद दोन्ही वाटतो. आश्चर्य यासाठी की एका छोट्या फोटोतून अगणित फोटो कसे सादर होऊ शकतात. तर आनंद यासाठी जसजसे झूम करतो तसे नवनवे गोष्टी समोर येत जातात. ही कलाकारी शेअर करणाऱ्या कलाकाराने कॅप्शनमध्ये "हा माझ्या कलाकारीचा ओरिजिनल व्हिडिओ आहे, आणि नव्या कलाकारीसाठी वाट पाहा" असे म्हणत आता असेच अजून भन्नाट गोष्टी तो घेऊन येईल हे सूचित केले आहे.

शेवटच्या सेकंदापर्यंत पिक्सलची क्वालिटी जराही खराब होताना दिसत नाही. तसेच प्रत्येक स्लाईडगणिक या अवलिया कलाकाराच्या दृष्टीकोणाची सुद्धा माणूस दाद दिल्याशिवाय राहत नाही. या डिजिटल युगाचे हे एक मोठे वरदान आहे. मनातल्या संकल्पना अशा वेगळ्या पद्धतीने मांडता येतात आणि त्या चुटकीसरशी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत देखील असतात.

आता हा vaskange काय नविन भन्नाट कलाकारी घेऊन येतो याची प्रतिक्षा करायला हवी...

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required