भारतातील अशा जागा जिथे बाहेरचे लोक जागा घेऊ शकत नाहीत!
आपल्यापैकी प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. दोन पैसे गाठीशी जमा झाले तर निसर्गरम्य परिसरात जागा घेण्याचीही अनेकांची इच्छा असते. पण कोण कुठे जागा खरेदी करू शकतो याचेही कायदेकानून आहेत. काही विशिष्ट ठिकाणी त्या भागातील लोक सोडले तर बाहेरच्या लोकांना जागा घेण्याची परवानगी नाही.
१) शिलॉंग
डोंगरदऱ्या बघाव्यात, त्यांची सुंदरता, शांतता अनुभवावी असे वाटणे स्वाभाविक आहे. पूर्वेतली राज्ये बऱ्यापैकी अशीच आहेत. कमी लोकसंख्या, निसर्गरम्य वातावरण यामुळे इथे जागा घेऊन राहण्याची अनेकजण इच्छा व्यक्त करतात. पण शिलॉंगमध्ये कुणालाही जागा विकत घेता येत नाही. परवानगीसाठी प्रयत्न करूनही लोकांना यश मिळत नाही. येथील स्थानिक लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अशाप्रकारे नियम करण्यात आला आहे.
२) सिक्कीम
बर्फाळ डोंगर, शांत आणि थंडगार वातावरण म्हणून सिक्कीम फिरायला जावे असे अनेकांना वाटते. पण सिक्कीम फिरावे, तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यावा आणि परत यावे हेच करता येणे शक्य आहे. कारण तिथे बाहेरून जाणाऱ्या लोकांना प्रॉपर्टी खरेदी करता येत नाही.
३) हिमाचल प्रदेश
पिकनिकसाठी महत्वाचे ठिकाण म्हणजे हिमाचल!! नावातच हिमाचे आंचल म्हटले आहे म्हणजे पूर्ण प्रदेश सुंदर असेल यात शंकाच नाही. येथील धरमशाला तसेच इतर अनेक शहरे हे सुंदरतेचे प्रतीक आहेत. या प्रदेशात देखील बाहेरून येणाऱ्या लोकांना जागा विकत घेण्यासाठी नो एंट्री आहे.
४) अरुणाचल प्रदेश
पूर्व भारतात चीनला लागून असलेला हा प्रदेश तिथल्या परंपरा, भाषा, संस्कृती यामुळे वेगळेपण टिकवून आहे. याच वेगळेपणाला टिकवून ठेवण्यासाठी या प्रदेशात दुसऱ्या राज्यातील लोकांना जागा खरेदी करण्याची अनुमती नाही.
या यादीत २०१९ पूर्वी जम्मूकाश्मीर या राज्याचा पण समावेश होता. पण कलम ३७० हटविल्यानंतर हा नियम देखील आपोआप रद्द झाला आहे. याबरोबर अनेक राज्ये आहेत जिथे त्या राज्यातील काही भागांत त्या राज्यातील नागरिकालाही त्या भागातील नसल्यामुळे एखाद्याला जमिन विकत घेता येत नाही.
भारतातील अनेक राज्यांत असे नियम आहेत. यामागील कारण असे की, त्या त्या भागातील लोकांची विशिष्ट संस्कृती असते, ती जपली जायला हवी, त्याला धक्का लागू नये. बाहेरील लोकांचे सातत्याने एखाद्या भागात स्थलांतर होत राहिले तर तिथल्या मूळच्या संस्कृतीला धक्का लागू शकतो. यासाठी काही गोष्टी कायदेशीर बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत.
उदय पाटील