विषकन्या ते हनी ट्रॅप : एक प्रवास (भाग -२)
जगभरातील गुप्तचर संस्थांचे प्रमुख हत्यार बनलेल्या हनी ट्रॅपचा विषय निघाला आणि माताहारीचे नाव आले नाही असे घडणेच शक्य नाही. अप्सरांना देखील लाजवेल असे अप्रतिम सौंदर्य, कामुकता तर ठासून भरलेली आणि जोडीला स्ट्रिप डान्स अर्थातशरीरावरील एकेक कपडा उतरवत केले जाणारे नृत्य करण्याचा बेधडकपणा अंगी असलेलीमाताहारी ही हनी ट्रॅपची राणी म्हणून जगभरात ओळखली जाते. या माताहारीपेक्षाही सरस म्हणावे अशी एक मदालसा म्हणजे एमी थॉर्प होय. ह्या एमी थॉर्पला ’द ओरिजनल हनी पॉट’ आणि ’दुसर्या महायुद्धाची अघोषित नायिका’ अशा विशेषणांनी गौरवण्यातआले आहे. यावरून तिच्या कारनाम्यांचा अंदाज यायला हवा.
एमीचा जन्म एका कर्नलच्या कुटुंबात झाला. एमीची आई पहिल्यापासून उच्चभ्रू वर्तुळात वावरणारी पण एमीचे तिच्यापेक्षा वडिलांशी जास्ती जमायचे. नामांकित शाळेत प्रवेश झाल्यावर एमीचा उच्चभ्रू लोकांमधील वावर आपोआप वाढला. काहीशी बंडखोर आणि बेफिकीर असलेल्या एमीमध्ये लैंगिक भावना जरा जास्तीच उसळ्या मारायच्या. अवघ्या १९ व्या वर्षी ती गरोदर राहिली. कहर म्हणजे हे मूल नक्की कोणाचे आहे हे एमीला देखीलठरवता येत नव्हते. समाजात हे उघड झाले तर आपली बदनामी होईल ह्या भितीपोटी पालकांनी तिचे लग्न तिच्या वयाच्या दुप्पट असलेल्या आर्थर पॅक ह्या ब्रिटिश राजनैतिक अधिकार्याशी करून दिले. एक तर आर्थर मुळात थंड प्रवृत्तीचा माणूस, त्यात त्याला कायम एमीविषयी शंका असायची, एमीचे मूल देखील आपले नसल्याची त्याला खात्री असल्याने, त्याने ते दत्तक द्यायला लावले होते. त्यामुळे एमीचा त्याच्यावर प्रचंड राग होता. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे एमीच्या स्वैर आयुष्याला पुन्हा झालेली सुरुवात.आपल्या सौंदर्याच्या जोरावर भल्याभल्या पुरुषांना मोहात पाडणे हा तिच्या डाव्या हाताचा मळ होता. एकदा तिच्या मिठीत शिरलेला पुरुष मग मनातले कोणतेही गुपित हे गुपित ठेवू शकायचा नाही. ह्याच जोरावर एमीने स्पेनमध्ये तुरुंगात असलेल्या आपल्या प्रियकराला सोडवले होते आणि जोडीला ब्रिटिश राजदूताच्या विनंतीवरून तिच्या प्रियकराच्या सोबत अटकेत असलेल्या इतर१७ ब्रिटिश वायुदलातील सैनिकांची देखील तिने सुटका केली. पोलंडमध्ये असताना तिचे पोलंडच्या परराष्ट्रमंत्रालयातील एका अधिकार्याशी सूत जुळले.एके दिवशी एमीच्या मिठीत भान हरपलेले असताना त्याने पोलंड गुप्तपणे जर्मनीला सामील असल्याचे गुपित उघड केले.जर्मनीची खल प्रवृत्ती चांगली ओळखून असलेल्या एमीने
तातडीने तेथील ब्रिटिश दूतावासाबरोबर संपर्क केला. काही काळात एमीचे धाडस, तिची हुशारी बघून ब्रिटिश इंटेलिजन्सचे प्रमुख जॉन शेले ह्यांनी तिला अधिकृतरीत्या ‘MI6’ ह्या गुप्तहेर संघटनेचे सदस्यत्व बहाल केले आणि तिला नवे कोडनेम दिले ’सिंथिया’.पुढे एमीने एकाहून एक सरस कामगिर्या पार पाडल्या. इटलीचे नेव्हील कोड बुक हस्तगत करणे, जर्मनीचा ’एनिग्मा कोड’ पोलिश लोकांनी सोडवण्यात यश मिळवल्याची माहितीदेखील तिच्यामुळेच ब्रिटनला मिळाली. येवढेच नाही तर जर्मनी येणार्या तीन वर्षात मध्य युरोपमध्ये कुठे कुठे हल्ले करणार आहे ह्याचे नकाशे देखील तिने आपल्या सौंदर्याच्या जादूने मिळवून दाखवले. तिच्या अचाट कामगिरीच्या जोरावर मित्र राष्ट्रांनी युद्धात विजय मिळवून आणला असे जाहीरपणे बोलले गेले. गुप्तहेर म्हणून काम करत असताना एमीने अनेक उच्चपदस्थ पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढले, त्यांच्याशी शरीरसंबंध देखील ठेवले.
तिच्या निवृत्तीनंतर एका मुलाखतीत तिला ह्या संदर्भात थेट प्रश्न विचारण्यात आला. बिनधास्त आणि बेफिकीर एमीने त्याचे उत्तर देखील रोखठोक दिले.
ती म्हणाली, ’ह्यामध्ये लाज वाटण्यासारखे काय आहे? सुख आणि देशसेवा एकाचवेळी करायला मिळणे हे रोमांचकारी नाही का? मुख्य म्हणजे माझ्या कामामुळे माझ्या देशाच्या आणि मित्र देशांच्या अगणित सैनिकांचे प्राण वाचत आहेत आणि पुढे देखील वाचणार असे माझे सीनियर्स मला कायम सांगायचे.तो एकच विचार मला कोणतेही काम बिनधास्त करण्यासाठी प्रेरणादायी होता.’
एमीच्या शब्दात सांगायचे तर
’‘My superiors
told me that the results of my work saved thousands of British and
American lives….It involved me in situations from which ‘respectable’
women draw back–but mine was total commitment. Wars are not won by
respectable methods.’
आधुनिक आणि इंटरनेटच्या ह्या काळात हनी ट्रॅप लावणे हे उंदरासाठी पिंजरा लावण्यायेवढे सोपे झाले आहे. पूर्वीच्या काळी हनी ट्रॅप हे अत्यंत अवघड काम असायचे. माणसाला प्रत्यक्ष भेटणे, त्याच्याशी संपर्क वाढवणे आणि त्याला जाळ्यात ओढणे असे प्रचंड कष्टाचे काम असायचे. मात्र कधी कधी हे हनी ट्रॅप प्रकरण अंगावर देखील उलटायचे. याचे एक रोचक उदाहरण म्हणजे, इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो होय.
रशियाच्या केजीबी ह्या गुप्तचर संस्थेने या सुकर्णोंना रशियात बोलावून हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचे ठरवले.ठरल्याप्रमाणे सुकर्णोंना मॉस्कोत बोलावण्यात आले आणि विविध प्रसंगात अनेक सुंदर तरुणी, आकर्षक मॉडेल्स आणि अभिनेत्रींसोबत त्यांची ओळख करून देण्यात आली. आता सौंदर्याचा असा गराडा पडल्यावर जे काही होते, तेच घडले. त्यातील काही सौंदर्यवतींबरोबर सुकर्णो साहेबांनी चांगलेच रंग उधळले. योजनेप्रमाणे केजीबीने हे सारे आपल्याकडील व्हिडिओ कॅमेर्यात रेकॉर्ड केले.
काही कालावधीनंतर सुकर्णोंकडून आपल्या मनासारखे काम करून घेण्यासाठी त्यांना ही टेप दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न रशियाने केला. पण झाले उलटेच, घाबरण्याऐवजी आपली ती टेप आणि त्यातले कारनामे बघून सुकर्णो साहेब आनंदाने नाचूच लागले. त्यांनीस्वतः ह्या टेपची एक कॉपी रशियाकडे मागितली. आपली ही टेप आणि त्यातले प्रसंग बघून इंडोनेशियन जनता प्रचंड खूश होईल आणि तिला गौरव वाटेल असा दावा त्यांनी रशियाकडेकेला. इतक्या मेहनती नंतर आणि केलेल्या प्रचंड खर्चा नंतर डोक्याला हात मारूनघेण्यापलीकडे कोणताही पर्याय केजीबीकडे उरला नव्हता.
उच्चपदस्थांबरोबर विविध वयोगटातील सामान्य लोकांना देखील आजकाल हनी ट्रॅपमध्ये कसे फसवले जात आहे. हनी ट्रॅप कसा ओळखावा, सोशल मीडियावर काय काळजी घ्यावी, चुकून अशा एखाद्या प्रसंगात अडकल्यास काय करावे हे अंतिम भागात.
(क्रमशः)
-प्रसाद ताम्हनकर