computer

अतिहुशार 'युनाबॉम्बर'. पण त्याने १७ वर्षे बॉम्बस्फोट का केले? तो सापडला कसा ??

कल्पना करा, तुम्ही एखाद्या कुरिअरची अगदी आतुरतेने वाट बघत आहात एवढ्यात दारावरची बेल वाजते आणि तुम्ही ते स्वीकारता. तुम्ही ते कुरिअरचं पॅकिंग ओपन करताच एक स्फोट होतो आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊन जातं. विश्वास बसत नाही ना! पण दुर्दैवाने ही गोष्ट अमेरिकेत काही लोकांच्या बाबतीत अगदी खरी ठरली आहे आणि त्यांच्या बाबतीत हे सगळं घडवणारी व्यक्ती ही अतिशय बुद्धिमान आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे टेड कझिन्स्की.२२ मे १९४२ ला जन्मलेल्या या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तीने अमेरिकेत सतरा वर्षे बॉम्बस्फोट घडवून अमेरिकेसहित सगळ्या जगाला हादरवून सोडलं होतं.

कझिन्स्की हा शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार म्हणून नावाजला गेला. त्याची आय क्यू लेवल१६७ होती. (सर्वसामान्य माणसाची आय क्यू लेवल ही ८५ ते ११५ यादरम्यान असते.) या बेट्याने सोळाव्या वर्षीच हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेऊन १९६२ मध्ये त्याचं पदवीपूर्वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर १९६७ मध्ये त्याने गणित विषयातील डॉक्टरेटही मिळवली. त्याचा हा करिअरचा ग्राफ इतका उंचावला, की कॅलिफोर्निया विद्यापीठात त्याला सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीही मिळाली.
त्याचा स्वभाव मुळातच एकांतप्रिय होता. त्याचा बराचसा वेळ हा स्थानिक लायब्ररीतील पुस्तकं वाचण्यात जाई. तो एका जंगलात एखाद्या आदिमानवाप्रमाणे झोपडी बांधून राहात होता. ही गोष्ट आहे १९७१ सालातली. या काळात तो वीजेचा वापर न करता राहायला लागला. त्यावेळी या आधुनिक जीवनशैली आणि तंत्रज्ञानाची झालेली प्रगति याचे निसर्गावर भयानक परिणाम होत आहेत असे मत झाले. त्याचाच परिणाम म्हणजे तंत्रज्ञान आणि आधुनिक जीवनशैली याविषयी एक प्रकारचा तिरस्कार त्याच्या मनात निर्माण झाला आणि त्याने सतरा वर्षं औद्योगिक क्रांतीच्या विरोधात लोकांना मारण्याचे विघातक प्रयोग सुरू केले.

१९७८ मध्ये कझिन्स्की आपल्या भावाच्या कारखान्यात नोकरी करण्यासाठी म्हणून गेलेला असताना त्याने पहिला बॉम्ब तिथेच तयार केला. त्याचा सुरुवातीचा बॉम्ब हा नंतर तयार केलेल्या बॉम्बच्या तुलनेत फारच कच्चा होता आणि याचं पहिलं लक्ष्य होतं, नॉर्थ युनिव्हर्सिटीच्या अभियांत्रिकी शाखेतील एक प्राध्यापक. या बॉम्बस्फोटामध्ये फक्त एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्यानंतर त्याने अनेक बॉम्ब तयार केले. त्याचं लक्ष्य म्हणजे अमेरिकेतील विविध विद्यापीठं होती. याव्यतिरिक्त त्याने बाकी ठिकाणीही बॉम्बस्फोट घडवून आणले. तो कुरियरद्वारे त्याच्या सावजापर्यंत बॉम्ब पोहोचवत असे. १९७९ मध्ये त्याने अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाच्या कॉकपीटमध्ये बॉम्ब ठेवला. सुदैवाने तो बॉम्ब फुटला नाही. परिणामी मोठी जीवितहानी टळली. पण त्याची हिम्मत मात्र आणखीनच वाढली. ती इतकी, की त्याच्या पुढच्या वर्षी युनायटेड एअरलाइन्सच्या अध्यक्षाच्या घरी त्याने बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्याच्या या बाँबहल्ल्यांमध्ये एकूण ३ लोक मरण पावले, तर २३ हून अधिक लोक  जखमी झाले. त्याचे हे वाढत जाणारे हल्ले बघून अमेरिकेत एका टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन मीडियामधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेगवेगळ्या  पोस्टर्स मधून त्याचं 'द युनिबॉम्बर' असं नामकरण करण्यात आलं.

हा पठ्ठ्या इतक्या बेमालूमपणे हे सगळं असं काही करत असे, की त्याच्या विरोधात कोणताही पुरावा तपास यंत्रणांना मिळणार नाही. पण कितीही काळजी घेतली तरीही कधी ना कधीतरी गुन्हेगार हा गजाआड जातोच, हे सत्य कझिन्स्कीच्या बाबतीतही अगदी खरं ठरलं. एका माणसाने कझिन्स्कीला प्रत्यक्ष बघितलं होतं. त्याचं वर्णन त्या प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितलं. त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार कझिन्स्कीच्या डोळ्यांवर सनग्लासेस होती आणि त्याने स्वेट शर्ट घातला होता. पोलिसांकडून कझिन्स्कीच्या वर्णनाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात आली, नंतर काही काळाने अगदी अनपेक्षितपणे एप्रिल ९५ मध्ये अमेरिकेतील दोन प्रमुख वृत्तपत्रांनी अचानक एका व्यक्तीचं तंत्रज्ञानविरोधी मत प्रकाशित केलं. यात अमेरिकेत सुरू असलेली बॉम्बस्फोटांची मालिका कधी संपणार याबद्दलची भूमिका मांडण्यात आली होती. ही भूमिका मांडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कझिन्स्कीच होती.आधुनिक जीवनशैलीमुळे अमेरिकेतील लोक कमजोर होत आहेत असं मत यात मांडण्यात आलं होतं. हे पाहून यामध्ये आपला भाऊच असणार हे टेेड कझिन्स्कीचा भाऊ डेव्हिड कझिन्स्कीने ओळखलं. त्याने तपासयंत्रणांशी संपर्क साधून त्यांना टेडच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती दिली. डेव्हिडच्या मदतीनेच ३ एप्रिल ९६ ला पोलिसांनी टेडला अटक केली. त्यावेळी केलेल्या तपासात युनीबॉंबर हा टेडच असल्याची खात्री पोलिसांना झाली, ते त्यांना मिळालेल्या पुराव्यांमुळे. त्यांना मिळालेल्या पुराव्यांमध्ये बॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती देणारी मासिकं, काही सावजांबद्दलच्या नोंदी तसंच जाहीरनाम्याच्या हस्तलिखिताचे मसुदे पोलिसांना मिळाले.न्यायालयाने त्याला त्याने केलेल्या बॉम्बस्फोटांसाठी जबाबदार धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा भोगत असतानाच एक दिवस तो त्याच्या कोठडीत मृतावस्थेत आढळला.

 

त्याने केलेले बाँबस्फोट बघितल्यावर इतकी बुद्धीमत्ता असलेला माणूस हा अशाप्रकारे कसा वागू शकतो हा विचार मनात येणं साहजिक आहे. पण कोणतेही व्यक्तिमत्त्व घडताना त्याला मिळालेल्या अनुवंशाइतकच त्याच्याभोवताली असलेलं वातावरणही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही मला नुकतीच जन्मलेली १० मुलं आणून द्या आणि मी तुमच्या इच्छित क्षेत्रातील सर्वोच्च स्थानावर त्या मुलांना नेवून दाखवतो असं आवाहन एका प्रसिद्ध  मानसशास्त्रज्ञानाने केले होते. यावरून जर टेडला योग्य वातावरण मिळालं असतं तर त्यानी योग्य प्रकारे स्वत:चं मत प्रदर्शित केलं असतं नाही का?


-राधा परांजपे

सबस्क्राईब करा

* indicates required