'मंडला आर्ट': नाव जरी नवं वाटलं तरी हा कलाप्रकार फार प्राचीन आहे !
अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांच्या पलीकडे माणसाच्या आयुष्याची मोठी गरज असते ती म्हणजे जीवन जगण्याच्या आनंदाची ! आनंदानं आयुष्य जगायला मदत करणारी एक गोष्ट म्हणजे कला !! या कला साधनेच्या जोरावर माणूस स्वतःचे जीवन कुठल्याही परिस्थितीत स्थिर ठेवू शकतो.अशाच एका प्रसिद्ध कलाकृतीच्या प्रकाराबद्दल आज आपण माहिती वाचणार आणि बघणार आहोत. आज घरोघरी-दारोदारी पोहचलेला हा कलाकृतीचा प्रकार म्हणजे मंडला आर्ट..!
डोळ्यांना आकर्षक आणि सुरेख दिसणारे हे मंडला आर्ट म्हणजे नेमके काय? मंडला आर्ट मधील मंडल हा शब्द सर्वप्रथम संस्कृतमध्ये ऋग्वेदात आढळतो. मंडल म्हणजे वर्तुळ.हे एक भूमितीय चिन्ह !. मंडल खासकरून ध्यानासाठी उपयुक्त ठरते. मंडलाचे हिंदू आणि बौध्द धर्मात विशेष आध्यात्मिक महत्व आहे. बौध्द धर्माचे प्रवर्तक गौतमबुध्द यांच्या अनुयायांनी सर्व प्रथम मंडला आर्ट ची निर्मिती केली.ते ज्या ज्या ठिकाणी जात त्या प्रत्येक ठिकाणी ते या मंडला आर्टचे चित्र रेखाटून त्याला रंग देत असे यामुळे संपूर्ण विश्वात या कलेचा प्रचार व प्रसार झाला. तिबेट, जपान, चायना या देशात मंडला आर्टचा प्रार्थनेसाठी तसेच ध्यानधारणेसाठीसाठी उपयोग होऊ लागला.वेदोत्तर काळानंतर कट्टर नास्तिक असलेल्या चार्वाकाने मंडलाचे ४ भागात वर्गीकरण केले. ज्यात अग्नी, वायू,जल, पृथ्वी यांचा समावेश होता त्यामुळे प्रत्येक भागातून एक नैसर्गिक शक्ती बाहेर पडत होती.यामुळे या मंडलाचा सकारात्मक ऊर्जेसाठी वापर केला जाऊ लागला.
मंडलात काढल्या जाणाऱ्या प्रत्येक चिन्हाचा विशिष्ट असा अर्थ आहे १ ) सूर्य- यातून संपूर्ण विश्वाचे महत्व आणि जीवन जगण्याची ऊर्जा मिळते २) कमळ- ध्येयपूर्तीसाठी आणि आयुष्य स्थिर ठेवण्यासाठी मिळणारी मदत ३) त्रिकोण - नैराश्यातून बाहेर काढण्यास हे चिन्ह उपयोगी ठरते.अशा वेगवेगळ्या चिह्नातून वेगवेगळ्या सकारात्मक ऊर्जा मिळतात.तसेच या चिन्हांमध्ये जे रंग आपण भरू त्याचे सुद्धा महत्व आहेत. उदा. लाल रंग हा शक्ती, सामर्थ्य तर नारंगी मधे आनंद, गौरव आणि ऊर्जेचे प्रतिक आहे. प्रत्येक रंगाचे एक वैशिष्टय़ आहे आणि त्यातून सकारात्कता मिळणार म्हणून आपल्या आवडीनुसार आपण आपल्या मंडला आर्ट मध्ये रंग भरू शकतो.
या कलाप्रकाराचे वेगवेगळे प्रकार देखीलआहेत त्यातील मुख्य तीन प्रकार म्हणजे
1) Healing मंडला- मेडिटेशन,मानसिक शांती आणि स्वलक्ष केंद्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो
२) Teaching मंडला- यातील प्रत्येक रेषा,आकार, रंगातून सकारात्मकता मिळते. यात आपल्या आवडीनुसार रचना करू शकतो
३) Sand मंडला- बौद्ध अनुयायी या मंडलाचा वापर करीत ज्यातून त्यांची परंपरा दिसून येई
या आर्टचे वेगवेगळे प्रकार असले तरी उद्देश मात्र एकच दिसतो तो म्हणजे जीवनाला आध्यात्मिक आणि मानसिक दृष्ट्या सशक्त बनविणे. म्हणूनच या कलाप्रकाराचा उपयोग आज वैयक्तीक तसेच व्यावसायिक स्तरावर होताना दिसतोय.अध्यात्मिक केंद्र, योगा केंद्र, समुपदेशन केंद्र, थेरपी उपचार केंद्र यामध्ये सकारात्मक शांतीपूर्ण वातावरण ठेवण्यासाठी मंडला आर्ट वापर केला जातो.
तरुणांसाठी मंडलाची रचानात्मक चित्रे हे ताण कमी करायला मदत करते. हॉस्पिटल मध्ये मंडला आर्ट रुग्णाचे मन शांत ठेवण्यास मदत करते. आता तुम्ही म्हणाल की या आर्ट मुळे मन कसे शांत राहू शकेल बुवा? तर ते असे की या मंडला च्या बिंदू कडे जर आपण लक्ष केंद्रित केले तर आपोआप त्या सर्व मंडलाचा प्रभाव आपल्या मनावर होऊन लक्ष केंद्रित होते आणि मन आपोआप ध्यानावस्थेत जाते.यासाठी डोळे बंद करून धारणा करायची गरज भासत नाही. घरातील भिंतींवर सुद्धा वॉल आर्ट म्हणून हे मंडला प्रसिद्ध झाले आहे जेणेकरून घरातील वातावरण ऊर्जदायी आणि प्रसन्न राहू शकेल.
अशा या मंडला आर्टला अत्यंत प्राचीन परंपरा लाभली आहे आणि आज त्याला जगात प्रत्येक ठिकाणी अत्यंत महत्व आहे. या जुन्या पण प्रगत आर्ट शैली मुळे नैराश्यात जाणाऱ्या सर्वांना मनाने स्थिर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी नक्कीच मदत होतेय असे दिसते आहे.कोवीडच्या बंदीस्त काळात अनेकांनी मंडला आर्टचा वापर करून मनःशांती मिळवल्याचे उल्लेख ऐकण्यात आले आहेत.
आता बऱ्याच लोकांनी हा 'आर्ट फॉर्म' व्यवसाय म्हणून निवडेला आहे जे ग्राहकाच्या आवडी नुसार मंडल आकृती तयार करून विकतात.गणेश गायतोंडेची सेक्रेड गेम्स सिरिज तुम्ही बघितली असेलच. या सिरिजच्या प्रत्येक एपिसोडची सुरुवात मंडला आर्ट सदृश चित्रांनी केली आहे. या मंडला आकृतीसाठी काही कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.बघा,जर तुम्हालाही या मंडला आर्टचे विश्व अनुभवायचे असेल तर घरच्या घरी कागदावर साधे सोप्पे मंडल काढायला सुरवात करा आणि आयुष्य अधिक सकारात्मक बनते आहे का याचा अनुभव घ्या !
लेखिका : वैष्णवी घोटकर सहस्रबुद्धे.