computer

बापरे.. या लोकांनी ३ मिनिटांत ७०० किलो दही खाल्लं..

काल १८ जानेवारीला कडाक्याच्या थंडीत पटनामधल्या लोकांनी अवघ्या तीन मिनिटांत चक्क ७०० किलो दही संपवलं. पाहा या आधुनिक गोकुळवासियांना, दही खाताना त्यांचं भान हरपून गेल्याचं दिसतंय.

दही खाओ, इनाम पाओ..

काल पटनामध्ये ’दही खाओ, इनाम पाओ’ स्पर्धा पार पडली आणि लोकांनी मोठ्या उत्साहानं त्यात भाग घेतला. आजकाल लोक फास्टफूडच्या खूप आहारी गेले आहेत आणि त्यांनी दुधापासून बनलेले पदार्थ खाऊन तंदुरूस्त बनावं म्हणून पटना डेअरी प्रोजेक्टतर्फे ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. 

या स्पर्धेत लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला होता. ज्योत्स्नाकुमारी या ३३ वर्षांच्या बाईंनी ३.५किलो दही खाऊन माहिला वर्गात पहिला नंबर मिळवला. त्यांच्यापाठोपाठ  ४४ वर्षांच्या पुष्पाकुमारींनी २.३८ किलो तर चक्क ४८वर्षांच्या प्रेमा तिवारींनी २.३४ किलो दही खाऊन दुसरा आणि तिसरा नंबर पटकावला.

पुरूषांचं खाणं बायकांच्या तुलनेत जास्त असतं हे इथंही पुन्हा सिद्ध झालं. ५६ वर्षांच्या प्रणय शंकर यांनी ज्योत्स्नाकुमारीपेक्षा जास्त म्हणजे ३.७९किलो दही खाल्लं. तर दुसरा आणि तिसरा नंबर मिळवलेल्या पुरूषांनी ३.१४ आणि ३.१०८किलो दही मटकावलं. 

या स्पर्धेदरम्यान साठीच्या वरच्या सिनियर सिटीझन्सना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. त्यांनी दोन किलोच्या आसपास दही खाल्लं होतं.

 

काही बातम्यांनुसार मुख्यमंत्री नितिश कुमारांनी या स्पर्धेचं कौतुक केलंय.  दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश वाढला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. एका अहवालानुसार  गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी  दुध आणि दुधापासून बनलेले पदार्थ अधिक खाल्ले गेले आहेत असंही दिसून आलं आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required