ऑपरेशन कॅक्टस आणि भारताचे उपकार विसरणारे मालदीव!!
मालदीव हे हिंदी महासागरातील एक छोटेसे राष्ट्र ! पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले, हनिमून कपल्ससाठी स्वर्ग अशी ख्याती असलेले वगैरे वगैरे.... सध्या आपल्या राजकीय भूमिकेमुळे हा देश वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. चीनचा पुरस्कार आणि भारताचा तिरस्कार यामुळे अनेक भारतीयांनी मनोमन बहिष्कृत केलेला असला, तरी कोणी एकेकाळी आपण या देशाच्या हाकेला ओ देऊन त्यांना मदत केलेली आहे.
ही गोष्ट आहे सुमारे तीन दशकांपूर्वीची. नेमकं सांगायचं १९८८ मधली. त्यावेळी मैमून अब्दुल गयूम हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष होते. नोव्हेंबर १९८७ मध्ये तिथल्याच काही भाडोत्री सैनिकांनी त्यांची सत्ता उलथून टाकून सत्ताबदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता.
अब्दुल्ला लुथूफी नावाच्या बंडखोराने श्रीलंकेतील दहशतवादी संघटना असलेल्या पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ इलमच्या काही बंडखोरांना हाताशी धरून ही राजकीय उलथापालथ घडवून आणली होती. या संघटनेचे सुमारे ८० बंडखोर बोटीने मालदीवची राजधानी 'माले' येथे दाखल झाले. त्याच्या आधी तेवढेच बंडखोर मालदीवमध्ये पर्यटक म्हणून वावरत होते. संपूर्ण योजना तयार होती. या बंडखोरांनी 'माले' येथे पोहोचताच महत्त्वाच्या सरकारी इमारती, विमानतळ, बंदरे, रेडिओ स्टेशन्स, दूरचित्रवाणी यांचा ताबा घेतला. विद्रोहींचे थवे हातात शस्त्रास्त्रे आणि बंदूक घेऊन सर्वत्र फिरताना दिसू लागले. बंडखोरांचे मनसुबे जाहीर होताच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मैमुन अब्दुल गयूम हे राहत्या घरातून निसटले. त्यामुळे त्यांना बंदी बनवण्याचा बंडखोरांचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. त्यानंतर मात्र या गयुम यांनी एक केले. त्यांनी ताबडतोब भारत, ब्रिटन या देशांकडे मदत मागितली.
त्यावेळी आपले पंतप्रधान होते श्री. राजीव गांधी. त्यांनी ताबडतोब मालदीवच्या मदतीसाठी तिकडे भारतीय सैन्याच्या तुकड्या पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सुरु झाले ऑपरेशन कॅक्टस !!
३ नोव्हेंबर १९८८ ची रात्र.भारताच्या या मोहिमेची म्हणजेच ऑपरेशन कॅक्टस ची सुरुवात झाली. भारतीय हवाई दलाच्या आय एल ७६ या एअरलिफ्टर मधून भारतीय लष्कराच्या पॅराशुट ब्रिगेड, पॅराशुट रेजिमेंट, आणि पॅराशुट फिल्ड रेजिमेंट या तुकड्या मालदीवकडे रवाना झाल्या.
तीन तुकड्यांमध्ये मिळून एकूण सोळाशे जवान होते. जवळपास दोन हजार किलोमीटरचे अंतर कुठेही थांबा न घेता सलग कापत नऊ तासांच्या आत भारतीय लष्कर मालदीवच्या भूमीवर दाखल झाले. मालदीवच्या 'हुलहूले' या विमानतळावर उतरून तिथून बोटीने माले येथे भारतीय पॅराट्रूपर्स पोहोचले. सगळ्यात आधी त्यांनी बंडखोरांकडून विमानतळाचा ताबा घेतला. भारताकडून मदत आली आहे आणि आपले बंड फसले आहे हे लक्षात येताच त्यापैकी काही बंडखोरांनी एम व्ही प्रोग्रेस लाईट या बोटीतून श्रीलंकेच्या दिशेने पलायन केले. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांनी काही लोकांना ओलीस म्हणून ठेवले होते, त्यात मालदीवच्या सरकारमधील एका मंत्र्यांचाही समावेश होता.
ऑपरेशन कॅक्टसचा खऱ्या अर्थाने आव्हानात्मक भाग आता सुरू झाला. एकीकडे समुद्रातून या बंडखोरांचा पाठलाग करणे आणि दुसरीकडे शक्य तितक्या लोकांना पकडून मालदीवच्या सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात देणे अशी कसरत सुरू झाली. पाच-सहा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर एम व्ही प्रोग्रेस लाईट ला भारतीय सैन्याने अखेरचा इशारा दिला, पण तरीदेखील बंडखोरांनी त्याला न जुमानता आपला प्रवास तसाच सुरू ठेवला.
शेवटी गोदावरी आणि बेटवा या युद्धनौकांवरून शस्त्रास्त्रांचा मारा करण्यात आला. यामुळे बंडखोरांच्या बोटीलाच आग लागली. या संपूर्ण मोहिमेदरम्यान १९ जण ठार झाले. यात सतरा बंडखोर आणि दोन अपहृत यांचा समावेश होता.भारतीय नौदलाच्या बेटवा आणि गोदावरी या युद्धनौकांनी श्रीलंकेजवळ बंडखोरांची बोट पकडली आणि त्यांना ताब्यात घेतले.केवळ काही तासांच्या आत बंडखोरांचे बंड मोडून काढण्यात मालदीव सरकारला यश आले ते केवळ भारतीय लष्कराच्या मदतीमुळे. बंडखोरी मोडून काढत भारतीय लष्कराने गयूम यांच्या सरकारची पुनर्स्थापना केली.
या मोहिमेचे जगभरातून कौतुक करण्यात आले पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेमुळे भारत आणि मालदीव यांच्यातले संरक्षण क्षेत्रातील संबंध सुधारले. मालदीवियन नॅशनल डिफेन्स फोर्स च्या हजारो सैनिकांना भारताने नंतर प्रशिक्षित केले. आजही ही मोहीम मालदीवच्या इतिहासात अजरामर ठरली आहे.
भलेही आज मालदीव हे उपकार विसरून कृतघ्नपणे चीनच्या पाठीशी उभे राहत असेल, पण एकेकाळी भारताने केलेल्या मदतीची इतिहासाच्या पानांमध्ये झालेली नोंद त्यांना कधीही पुसून टाकता येणार नाही.
स्मिता जोगळेकर