computer

जाणून घ्या १२ वर्षांनी झालेल्या इस्रायली सत्तापालटाची कारणे!! माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंची कारकीर्द नक्की कशी होती याचीही सोबत माहिती घ्या!!

जगात आजपर्यंत जी काही युद्धं झाली त्यापैकी एक म्हणजे अरब-इस्रायल संघर्ष. तसं हा एक मोठा विषय आहे. या संघर्षाचे बरेच पैलू आहेत. जेरुसलेम या अरब आणि ज्यू दोघांसाठीही पवित्र असलेल्या शहरावर कुणाचं नियंत्रण असावं आणि वेस्ट बँक, गाझा पट्टी अशा वादग्रस्त भागांवर कुणाचा ताबा असावा यातून या दोन गटांत सातत्याने चकमकी होत आल्या आहेत. जोडीला पॅलेस्टिनी विस्थपितांना इस्रायलमध्ये आसरा देण्यात यावा अशी पॅलेस्टाईनची मागणीही भांडणाचं कारण ठरत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायल चांगलाच पाय रोवून उभा आहे. याचं श्रेय मोठ्या प्रमाणावर तिथल्या कणखर नेतृत्वाला जातं. मात्र आता हे चित्र बदलेल का? बदललं तर कुणाचं पारडं जड होईल? असे काही प्रश्न निर्माण झालेत. याचं कारण म्हणजे नुकताच इस्रायलमध्ये झालेला सत्ताबदल. 

तब्बल १२ वर्षांनंतर इस्रायलमध्ये सत्तापालट झाला. माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना संसदेत बहुमत सिद्ध करता न आल्याने नेतान्याहू यांचे सरकार जाऊन त्या जागी यामिना नावाच्या पक्षाचे नफ्ताली बेनेट पंतप्रधान बनले. अर्थात बेनेट यांचा विजय अगदी निसटता मानला जातो. नेतान्याहू यांच्या विरोधात ६० आणि समर्थनात ५९ मते आहेत.  

(नफ्ताली बेनेट आणि बेंजामिन नेतन्याहू)

नफ्ताली बेनेट एक कोट्याधीश उद्योजक आहेत. तंत्रज्ञानातील व्यापारानंतर ते राजकारणात शिरले. नवीन पंतप्रधान बेनेट हे स्वतः कट्टर उजव्या विचारसरणीचे असले तरी त्यांच्या या नवीन सरकारमध्ये उजवे, मध्यममार्गी आणि डावे अशी सरमिसळ आहे. विशेष म्हणजे इस्रायलमधील अरब समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा 'राम' हा पक्षही सरकारचा घटक आहे. चार वर्षांचा कार्यकाळ असलेल्या या खिचडी सरकारमध्ये पंतप्रधानपदाचं विभाजन झालं आहे. पहिली दोन वर्षं बेनेट आणि पुढची दोन वर्षं येश अतिद या मध्यममार्गी विचारसरणीच्या पक्षाचे येर लॅपिड अशी ही विभागणी आहे. 

नेतान्याहू हे सध्या जरी विरोधी बाकावर बसलेले असले तरी त्याआधी बराच काळ ते सत्तेत होते. त्याचीच सवय म्हणा किंवा सत्ता सोडण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी झालेली नाही म्हणा, मतदानाच्या निकालानंतर सगळं चित्र स्पष्ट झाल्यावरही नेतान्याहू क्नेसेट चेंबरमधील पंतप्रधानांच्या खुर्चीत जाऊन बसले होते! हे नकळत झालं की मुद्दाम केलं कळायला मार्ग नसला तरी माध्यमांसाठी तो चर्चेचा विषय बनला. वास्तविक आजच्या इस्रायलला आकार देणारा हा मुत्सद्दी नेता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्खलित इंग्रजीत इस्रायलची बाजू मांडताना या 'इस्रायलच्या राजा'ने आपला देश आकाराने लहान असला तरी त्याचं महत्त्व कायम राहील, अमेरिका, रशिया, चीन यांसारख्या बलाढ्य देशांपुढेही आपला प्रभाव थोडाही फिका पडणार नाही याची सतत काळजी घेतली. प्रखर राष्ट्रवाद काय असतो हे जगाला आपल्या कृतीतून दाखवून दिलं. विशेषतः पॅलेस्टिनी अतिरेक्यांविरुद्ध त्यांनी घेतलेली भूमिका ही नेहमीच इस्रायली जनतेसाठी कौतुकाचा, अभिमानाचा विषय ठरली. मग नक्की काय झालं असावं, ज्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली? 

प्रसारमाध्यमं, राजकीय विश्लेषक यांनी आपापल्या परीने याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे काही शक्यता आहेत. एक म्हणजे नेतान्याहू यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप. आपल्या धनाढ्य मित्रांकडून महागड्या गिफ्ट्स घेतल्याचा, त्यांची पॉझिटिव्ह इमेज निर्माण करण्याच्या बदल्यात मीडियाला विविध प्रकारे मदत केल्याचा आणि लाचखोरीचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. त्यांनी हे आरोप सपशेल नाकारले असले तरी त्यामुळे कुठेतरी त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला आहे. दुसरं म्हणजे कोविड महामारीची परिस्थिती त्यांना नीट हाताळता आली नाही असंही काही लोकांचं मत आहे.  मध्यंतरी याविरोधात लोकांनी निदर्शनंही करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यातूनही जनमताचा कौल त्यांच्या विरोधात गेला असावा असा अंदाज आहे.

त्यांचं वय हाही एक महत्त्वाचा घटक आहे असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. सत्तरी ओलांडलेले नेतान्याहू आणि जेमतेम पन्नाशीत असलेले बेनेट यांच्यात तुलना केली तर तरुण असलेले बेनेट जास्त स्थिर सरकार देऊ शकतात असा एक मतप्रवाह आहे. शिवाय आघाडीतल्या तीन पक्षांनी केवळ नेतान्याहू यांना सत्तेवरून खाली खेचणं हाच अजेंडा ठेवत निवडणुकीसाठी आघाडी केल्याने त्याचाही फायदा त्यांना झालेला असू शकतो. 

कारण काय असेल ते असो, आधुनिक इस्रायलचा हा निर्माता आता पायउतार झाला आहे. नवीन येणारे सरकार कितपत स्थिर असेल याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. सरकारमधला 'राम' हा पक्ष पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांचे अधिकार मिळावेत या मताचा असल्याने इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आता काय वळण घेतो हे कुतूहल कायम असणार आहे.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required