भेटा इतिहासाच्या पानांत हरवलेल्या कुष्ठरोगावर उपचार शोधणाऱ्या ही संशोधिकेला!! ॲलिस बॉल आहे तिचं नाव!!
अमेरिकेतल्या हवाई युनिव्हर्सिटीच्या पूर्व दिशेला २५ फुटांचं एक मोठं झाड आहे. लांब नाजूक पानं आणि तपकिरी रंगाची रेशमी फळं असलेल्या या झाडाचं नावही मोठं रंजक आहे, त्याला म्हणतात चौलमूगरा. हे झाड ॲलिस ऑगस्टा बॉल नावाच्या एका महिलेची आठवण करून देत आजही तिथे उभं आहे. ही स्त्री म्हणजे हवाई विद्यापीठातून मास्टर्स केलेली पहिली आफ्रिकन अमेरिकन विद्यार्थिनी होती.
१९३५ मध्ये हे झाड ॲलिसच्या सन्मानार्थ लावण्यात आलं. तिने याच झाडाचा वापर करून कुष्ठरोग या असाध्य रोगावर मूलभूत संशोधन केलं होतं. १९१० च्या सुमारास ती या विद्यापीठात केमिस्ट म्हणून काम करत असताना तिनेच सर्वात प्रथम कुष्ठरोगावरचे उपचार विकसित केले. त्यामध्ये या झाडाच्या फळातील बियांपासून तेल काढून ते इंजेक्शनच्या स्वरूपात रक्तप्रवाहात सोडण्याचा समावेश होता. कुष्ठरोगावरील उपचारांसाठी १९४० पासून अँटिबायोटिक्सचा वापर केला जाऊ लागला. परंतु त्याआधी मात्र ॲलिसचीच उपचारपद्धती प्रभावी ठरत होती.
कुष्ठरोगाचे जंतू मुख्यतः मज्जासंस्था आणि त्वचा यांच्यावर हल्ला करतात आणि त्यामुळे हातापायाची बोटं झडल्यासारखी दिसतात. ॲलिसच्या उपचारांमुळे यामध्ये बरीच सुधारणा दिसत असे. पण कित्येक दशकं ॲलिस पडद्यामागेच राहिली. आधी तिचं आयुष्यच उणंपुरं २४ वर्षांचं. त्यात संशोधनाच्या क्षेत्रात पुरुष आणि मुख्यतः गोरे यांच्याच वाट्याला काय तो सन्मान यायचा. त्यामुळे एवढं मूलभूत स्वरूपाचं संशोधन करूनही ॲलिसच्या नशिबी मात्र उपेक्षाच आली.
ॲलिसची गोष्ट इतरही अनेक बाबींवर प्रकाश पाडते. तिचा जन्म १८९२ मध्ये सिॲटलमध्ये एका कृष्णवर्णीय कुटुंबात झाला. तिचे वडील आणि आजोबा फोटोग्राफर होते. ती दहा वर्षांची असताना त्यांचं कुटुंब होनोलुलू येथे स्थलांतरित झालं. तिथलं उबदार हवामान तिच्या आजोबांच्या आर्थ्राइटिसवर उपयुक्त ठरेल, असा घरच्यांचा अंदाज होता. पुढे आजोबा गेल्यानंतर हे कुटुंब परत वॉशिंग्टनला आलं. लहानपणापासूनच ॲलिस अभ्यासात अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी होती. पुढे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थिनी असताना तिने चार वर्षांत दोन पदव्या मिळवल्या. फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि सायन्स ऑफ फार्मसी या विषयात तिने पदवीचं शिक्षण घेतलं. नंतर ती हवाईला परतली आणि हवाई युनिव्हर्सिटीमधून तिने मास्टर्स केलं. मास्टर्ससाठी तिने झाडांची रासायनिक संरचना या विषयावर संशोधन केलं.
हवाईमध्ये आढळणाऱ्या आवा या झाडाची मुळं अनेक रोगांवरच्या उपचारांसाठी वापरली जातात. यात निद्रानाश, डोकेदुखी, किडनीचे विकार या आजारांचा समावेश होतो. या झाडांमध्ये असलेल्या रसायनांचा अभ्यास करून ती उपचारांसाठी ही रसायनं शरीरात कशी सोडता येतील याची पद्धत शोधून काढणार होती. त्यादरम्यान हॉलमन नावाच्या एका डॉक्टरचं तिच्याकडे लक्ष गेलं. तो स्वतः कुष्ठरोगाच्या सौम्य स्वरूपाच्या केसेससाठी चौलमूगरा झाडाचं तेल वापरत असे. मुळात आशियाई लोकांमध्ये त्वचाविकारांसाठी अनेक शतकांपासून हे तेल वापरलं जात होतं. परंतु पाश्चात्य लोकांना मात्र ते अजूनही नीटपणे उलगडलं नव्हतं. अनेकदा हे औषध तोंडावाटे घेतल्यामुळे मळमळ, उलट्यांचा त्रास व्हायचा; तर इंजेक्शनवाटे दिल्यास त्या जागी वेदना आणि गळवांसारखे फोड यांचा त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळे हॉलमनने ॲलिसला आपल्याबरोबर कामाला घेतलं. हे तेल सहजगत्या रुग्णाच्या शरीरात टोचता येईल अशा प्रकारे तयार करायला त्याने ॲलिसला सांगितलं.
त्यावेळी हवाई बेटावर कुष्ठरोगाची साथ आली होती. अनेक लोक त्याला बळी पडत होते. त्या काळातही कुष्ठरोग हा तिरस्करणीय रोग होता. कुष्ठरुग्ण तर अस्पृश्यच मानले जायचे. त्यांच्या वेगळ्या वसाहती असायच्या. तिथे त्यांना विलगीकरणात ठेवलं जायचं. त्यांच्या या वसाहती मानवी वस्तीपासून बऱ्याच दूर, एकांतात, आणि सहजपणे पोहोचता येणार नाही अशा असायच्या. नंतर नंतर त्या वसाहती स्वयंभू बनू लागल्या. तेथे चर्चेस, थिएटर, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह, बार, दुकान अशा सोयी सुविधा निर्माण झाल्या. तिथल्याच काही लोकांना येथे नोकऱ्याही मिळाल्या. पण तरीही हे लोक आपल्या लोकांपासून वेगळेच पडलेले होते. हवाई बेटाची मूळ संस्कृती कुटुंबाला प्राधान्य देणारी. सगळ्यांनी एकत्र राहावं, या मताचा पुरस्कार करणारी. हे मात्र त्याच्या विपरीतच होतं, पण त्याला कुणाचाही इलाज नव्हता.
हॉलमनच्या बरोबर काम करायला लागल्यावर ॲलिसनेही प्रयोगशाळेमध्ये चौलमूगरा पाण्यामध्ये विरघळवण्यासाठी काय काय करता येईल या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात केली. एका वर्षात तिच्या प्रयत्नांना यश आलं. या कामासाठी वास्तविक तिला काहीही पैसा मिळणार नव्हता, पण तरीही तिने हे काम मनापासून केलं. या तेलामधली फॅटी ॲसिड्स गोठवण्यात ती यशस्वी ठरली. यामुळे तेलातली विशिष्ट रसायनं वेगळी करता येतात आणि नंतर ती पाण्यामध्ये विरघळवून हे द्रावण इंजेक्शनच्या स्वरूपात शरीरामध्ये सोडता येतं, हे तिने शोधून काढलं.
पुढेही तिने या तंत्रामध्ये सुधारणा करण्याचं काम सुरू ठेवलं. पण हा प्रयोग अल्पायुषी ठरला. १९१६ मध्ये गॅस मास्कचा वापर कसा करायचा हे दाखवत असताना तिच्याकडून क्लोरीन गॅस हुंगला गेला आणि ती प्रचंड आजारी पडली. त्यातून पुढे तिला क्षयरोगाची बाधा झाली, असं म्हटलं जातं. तिच्या आईने तिला परत सिॲटलला नेलं. तिथेच तिने शेवटचा श्वास घेतला.
तिच्या मृत्यूनंतर डीन नावाच्या तिच्या सहकाऱ्याने थोडेफार बदल करून तिचं संशोधन प्रकाशित केलं, आणि ते स्वतःचं असल्याचा दावा केला. या उपचाराला डीन मेथड असं नाव मिळालं आणि ही उपचारपद्धती बऱ्यापैकी प्रभावी आहे असे सिद्धही झालं. अनेक लोक यामुळे बरे झाले.
अनेक दशकं कुष्ठरोगावरच्या उपचारासाठी ॲलिसने दिलेलं योगदान दुर्लक्षित राहिलं. पण याला अपवाद ठरला तो हॉलमन. त्याने मात्र त्याच्या एका लेखामध्ये या शोधाचं श्रेय ॲलिसला दिलं आणि ती प्रकाशात आली. ॲलिसच्या कार्याच्या सन्मानार्थ सयामच्या राजा प्रजाधिपोक याने भेट दिलेलं चौलमूगराचं झाड आजही तेथे उभं आहे. आपलं काम करत राहणं आणि समाजाला शक्य तितकं देत राहणं या ॲलिसच्या गुणांची शिकवण ते देत आहे.
स्मिता जोगळेकर