computer

नॉर्थ मॅसिडोनिया: एक देश म्हणतो नाव आमचं आहे, दुसरा म्हणतो भाषा आमची आहे. या सुंदर देशासोबत आणखी किती, कोणते आणि का वाद आहेत?

आपल्याला जर कुणी विचारलं जगभ्रमंती करायची असल्यास तुम्ही कुठल्या देशाची निवड कराल? तर हमखास येणार उत्तर असतं, कॅनडा, थायलंड, इंग्लंड, अमेरिका आणि यांसारखे मोठे देश. कारण साहजिक आहे, लहान देशांचं अस्तित्वच आपल्याला ठाऊक नसतं. त्या देशांबद्दल पुरेशी माहिती, त्यांचा इतिहास, तेथील ठिकाण आणि त्यांची संस्कृती तुम्हाला अवगत व्हावी ह्यासाठी बोभाटा खास तुमच्यासाठी घेऊन येतोय "लहान, पण महान देशांची नवीन मालिका”. या मालिकेत तुम्हाला, जगाच्या नकाशावर असलेले आणि नजरे पासून लपलेले लहान लहान देश भ्रमण करावयास मिळतील!

चला तर सुरुवात करुया युरोपपासून...

जगज्जेता अलेक्झांडर द ग्रेट सर्वांनाच ज्ञात आहे, पण त्याचे जन्मस्थळ मॅसिडोन किती लोकांना ठाऊक आहे? ग्रीसचा मॅसिडोनिआ आणि युगोस्लाव्हियाचा मॅसिडोनिआ ही नेमकी काय भानगड आहे? अलेक्झांडर आणि मदर तेरेसा यांच्या जन्मस्थळावरुन जुंपलेला वा काय आहे? मॅसिडोनिआबद्दल काही रोचक घडामोडी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे स्टेटस, त्यांचे तंत्रज्ञानातील थक्क करणारे योगदान, पर्यटन स्थळं, अर्थव्यसस्था, तोंडाला पाणी सुटेल अशा मॅसिडोनिअन पाककृती आणि काही सुरस-रंजक गोष्टी.. हे सर्व या लेखात इत्यंभूत आहे.

तर आजच्या ह्या भागात आम्ही तुम्हाला ह्या दोन्ही मॅसिडोनिआबद्दल सांगणार आहोत. युरोपात ग्रीस नावाचा देश आहे आणि त्याच्या वरच्या सीमेलगत एक चित्तवेधक आणि मनोरंजक असा एक देश आहे - मॅसिडोनिआ. त्यालाच मकदूनिया असंही म्हटलं जातं. नकाशामध्ये पाह्यलं तर त्याखाली (FYROM) म्हणजेच फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅसिडोनिआ असं लिहिलेलं दिसतं. त्यामागचं कारण असं की ८ सप्टेंबर १९९१ मध्ये हा देश युगोस्लाव्हियापासून तुटला आणि स्वतंत्र झाला. रक्ताचा एकही थेंब न सांडता स्वतंत्र झालेला जगातला एकमेव देश म्हणूनही मॅसिडोनिआचा उल्लेख केला जातो.

या देशाचे त्याच्या नावावरुन ग्रीससोबत खूप मोठे वाद आहेत. मॅसिडोनिआने आपलं नाव बदलून रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅसिडोनिआ केलं आहे. खरंतर युरोपियन राष्ट्रे नाव बदलायच्या भानगडीत क्वचितच पडताना दिसतात. ग्रीसमध्ये आधीच मॅसिडोनिआ नावाचं एक राज्य आहे आणि या ग्रीसच्या पेल्ला नावाच्या प्राचीन शहरात महान जगज्जेता अलेक्झांडरचा जन्म झाला होता. आता समजा भूतानने आपले नाव बदलून "प्राचीन भारत" ठेवले तर भविष्य काळात भारताचा इतिहास समजून घेताना लोकांना किती गैरसमज होतील आणि ह्याचा प्रभाव हा पर्यटकांवर आणि त्या प्रदेशाच्या संस्कृतीवर देखील पडेल. म्हणूनच ग्रीसने एक अट ठेवली होती, मॅसिडोनिआने आपले नाव बदलावे अन्यथा ग्रीस मॅसिडोनिआला NATO आणि युरोपियन युनियनचे सदस्य होऊ देणार नाही.
अखेर प्रेस्पा कराराअंतर्गत जून २०१८ मध्ये मॅसिडोनिआचे नाव बदलून रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅसिडोनिआ असे ठेवण्यात आले. ग्रीसमधल्या मॅसिडोनिआला अंतर्गत व्यवहारात “केन्द्रीकी मॅकेडोनिआ” असं म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा उल्लेख मॅसिडोनिआ असा केला जातो. .

अलेक्झांडर द ग्रेट प्रमाणेच मदर तेरेसांचे जन्मस्थळसुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसून येते. कुणी म्हणे कलकत्ता, कुणी अल्बेनिया, कुणी मॅसिडोनिआ!! नोबेल पुरस्कार विजेत्या विख्यात मदर तेरेसांनी आपलं जीवन भारतातल्या कलकत्ता (आताच कोलकाता ) मध्ये व्यतित केलं, पण त्यांचा जन्म हा नॉर्थ मॅसिडोनिआमधल्या स्कोपे (skojpe) येथे झाला आहे. स्कोपे हे शहर नॉर्थ मॅसिडोनिआची राजधानी आहे. इथली लोकसंख्या कमी आहे, फक्त २० लाख. इतकी लोकसंख्या आपल्या नागालँडची आहे. आणि क्षेत्रफळाचं म्हणावं तर आपल्या मेघालय राज्याएवढाच काय तो देश आहे. जवळपास २५००० चौ. किमी याचं क्षेत्रफळ आहे. मॅसिडोनियन दिनार ह्या देशाचे चलन आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत त्याची किंमत आहे १.४३ रुपया. ह्या देशातील लोकांकडे त्यांची स्वतःची भाषा आहे, तिचं नाव आहे मॅसिडोनियन. त्याचबरोबर इंग्लिश भाषासुद्धा इथे प्रचलित आहे.

हा देश हायटेक प्रोजेक्टसच्या संदर्भात नेहमीच अग्रेसर आहे. इथल्या लोकांना टेक्नोलॉजीमध्ये बराच रस रुची आहे आणि हेच कारण आहे, आजच्या युगात हा देश युरोपियन देशांपेक्षा खुप पुढे निघून गेला आहे. २००६ सालीच वायरलेस ब्रॉडबँड कनेक्शन (WIFI) संपूर्ण देशात पसरवणारा नॉर्थ मॅसिडोनिआ हा जगातील पहिला देश आहे. म्हणून तर म्हटलं जातं की टेक्नोलॉजीच्या बाबतीत या देशाची फार प्रगती झाली आहे.

युरोप फिरुन पाहण्यासारखा आहे, मग मॅसिडोनिआ कसा त्याला अपवाद असेल? इथे बघण्यासाठी आणि फिरण्यासाठी खूप स्थळं आहेत. स्थापत्य कलेचे उत्तम ननुने असलेल्या वास्तू, सरोवरे, खिंडी, इतिहास आणि संस्कृतीचे जतन करुन ठेवलेली संग्रहालये, जगभरातील प्रसिद्ध मस्जिदपैकी एक रंगीबेरंगी कलाकारी असलेले मस्जिद, चर्च, किल्ले, पठार, नॅशनल पार्कस्, धबधबा आणि बरंच काही इथे पाहण्यासारखं आहे.

मॅसिडोनिआमध्ये कोकीनो (Kokino) नावाच्या शहरात एक वेधशाळा आहे. इथे १९ व्या शतकापासूनच NASA रिसर्च करत आहे. हिला जगातील सर्वात जुनी वेधशाळा मानलं जातं.
आणखीन एक रोचक गोष्ट म्हणजे नार्थ मॅसिडोनिआमध्ये एकमात्र जगा अशी आहे जी UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे आणि ती म्हणजे ओहरिड (Ohrid)!! या शहराजवळ जगातील सुंदर सरोवरांपैकी एक सरोवर आहे. पर्यटकांसाठी हे एक 'मस्ट व्हिझिट' ठिकाण आहे. या देशाला लँड ऑफ पिकॉकसुद्धा म्हटलं जातं..

हा देश भूपरिवेष्टित म्हणजेच सर्व बाजूने इतर देशांनी वेढलेला आहे आणि याला कसलाच समुद्रकिनारा नाही. बाल्कन प्रदेशातून तुटलेला हा एक देश. इथली
“मटका कॅन्यन” ही खिंड प्रसिद्ध आहे.
युरोपातल्या इतर देशांसारखाच हाही कलासक्त देश आहे. मॅसिडोनियामध्ये मोठ्या शहरांच्या भिंतींवर अनेक कलाकृती सादर केलेल्या तुम्हाला दिसतील.
अस म्हटलं जातं की राजधानी स्कोपेचा इतिहास है ७००० वर्षे जुना आहे आणि तुम्ही कधी भेट दिलीच तर तिथल्या वास्तू पाहून तुम्हाला लगेच कळून येईल. इथले प्राचीन स्थापत्यशास्त्राचे उत्तम नमुने आणि कोरीव शैली खरंच नयनरम्य आहे. आजसुद्धा मोठे मोठे पुरातत्वशास्त्रज्ञ ह्या देशाची माहिती काढण्यासाठी इथे खोदकाम करत असतात.

मॅसिडोनियाबद्दल आता काही रंजक-सुरस आणि रोचक गोष्टी:इथल्या पिकांबद्दल बोलायचं तर इथे अर्थव्यवस्थेचा ३० % भाग हा शेतीमधून येतो. मॅसिडोनियामध्ये तंबाखूची शेती फार मोठ्या प्रमाणात केली जाते आणि अमेरिकेसारख्या मोठ्या देशांना ती विकली जाते. त्याचबरोबर हा देश सफरचंदांसाठी देखील प्रसिद्ध आहे. इथे वेगवेगळ्या जातीची आणि रंगांची सफरचंदं पाहायला मिळतात. ही फळेदेखील अमेरिकेला निर्यात केली जातात.
मॅसिडोनिआत कोबी ही आवडती भाजी आहे म्हणायला हरकत नाही. सरमा (Sarma) नावाचा इथला राष्ट्रीय खाद्यपदार्थ कोबीच्या आवरणात सारण भरून बनवला जातो.

 मॅसिडोनियामध्ये उत्तम दर्जाची अफू पिकवली जाते. तिला जगभरातील दर्जेदार अफू मानले जाते. या यादीत अफू गुणवत्तेमध्ये पाकिस्तानचा दुसरा क्रमांक लागतो. असे असूनसुद्धा अफगाणिस्तान हा अफूच्या अर्थव्यवस्थेचा राजा आहे, कारण मॅसेडोनियामध्ये नैसर्गिक संसाधने आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (intellectual property) कायद्यांचा अभाव आहे. याचा इतर अनेक युरोपियन राष्ट्रे सहजपणे फायदा घेऊ शकतात.

२. नावावरून विवाद
ग्रीसचा दावा आहे की मॅसिडोनियाला हे नाव वापरण्याचा अधिकार नाही. हे नाव मॅसेडोनच्या प्राचीन राज्यावरून आले आहे, जे ग्रीस आणि आधुनिक मॅसेडोनिया या दोन्ही देशांत अस्तित्वात होते. परंतु त्यातला बहुतांश प्रदेश आधुनिक ग्रीसमध्ये आहे आणि त्या प्रदेशातील बरेच ग्रीक स्वतःला वांशिक दृष्ट्या मॅसिडोनियन समजतात. परंतु ते आता नावाने दुसर्‍या राष्ट्राशी जोडले गेल्याचा त्यांना राग आहे आणि म्हणून ग्रीसने मॅसिडोनियाला नाव बदलण्यास भाग पाडले.

३. द मिस्ट्री मास ग्रेव्ह
अली अहमेती हे मॅसिडोनियन राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या कौटुंबिक घराच्या अंगणात अलीकडेच एक सामूहिक कबर सापडली. ही सामूहिक कबर म्हणजे एक खोलगट विहिर आहे, तीमध्ये अनेक मृतदेह असल्याचा अंदाज वर्तवला जातो. असंही म्हटलं जातं की १९१३ मधल्या दुसऱ्या बाल्कन युद्धाच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे हे अवशेष असावेत.

४. शेजारील देशांसह गंभीर समस्या
बल्गेरिया मॅसिडोनियन भाषेचे अस्तित्व नाकारतात. त्यांचं अधिकृत म्हणणं असं आहे की मॅसिडोनियन ही फक्त बल्गेरियाची बोली आहे. दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक वादही आहेत, प्रत्येकाने ऐतिहासिक स्वातंत्र्यसैनिक आपल्या राष्ट्राचे असल्याचा दावा केला आहे. ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचे अनुसरण करणार्‍या इतर देशांशीही मॅसिडोनियाचा धार्मिक संघर्ष देखील आहे.

५. राष्ट्रध्वजावरुन वाद
१९९२ ते १९९५ मध्ये मॅसिडोनियाच्या राष्ट्रध्वजावर एक सूर्य होता. त्या नंतर ग्रीसने मॅसिडोनियासोबत वाद सुरु केले आणि आरोप केले की तो सूर्य ग्रीसच्या प्राचीन इतिहासाचं प्रतिक आहे. हा सूर्यचिन्हाला "व्हर्जिना सन" नावाने ओळखले जाते. हे एक प्राचीन ग्रीक चिन्ह आहे. खरंतर हे चिन्ह प्राचीन मॅसेडॉन आणि आधुनिक जग यांच्यातील दुवा म्हणून पाहिले जात होते. हा व्हर्जिना सन वाद इतका विकोपाला गेला की अखेर मॅसिडोनियाने आपला राष्ट्रध्वज बदलण्याचा विचार केला आणि अंततः १९९५मध्ये या सूर्यचिन्हाचा आकार मोठा करत राष्ट्रध्वज बदलला.

आहे न खरंच सुरस, रंजक आणि काहीशी चमत्कारिक अशी मॅसिडोनियाची गोष्ट!! कशी वाटली हे आम्हांला नक्की कळवा. तुम्ही मॅसिडोनियाला भेट दिली असेल तर तुमचे अनुभवही शेअर करा

प्रियांका रोडगे

सबस्क्राईब करा

* indicates required