computer

फोटो: २० वर्षांनी कासिनी उपग्रहाने काल घेतली शनी ग्रहावर कायमची झोप.. पाहा उपग्रहाची २० वर्षांतली कामगिरी..

नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इटालियन स्पेस एजन्सी या तीन संस्थांनी मिळून  १५ सप्टेंबर १९९७ला कासिनी हा उपग्रह शनिच्या दिशेने सोडला होता.  याचं मुख्य काम होतं ते शनी ग्रह आणि त्याची एकूण प्रणाली, त्याचे उपग्रह आणि शनीचा कडांचा अभ्यास करणं..

२० वर्षांनंतर १५ सप्टेंबर २०१७ ला उपग्रहावरचं इंधन संपल्यानं त्याला शनीच्या पृष्ठभागावर कोसळवून नष्ट करण्यात आलं.

अशी घेतली शेवटची झेप..

कासिनीची या वीस वर्षांतली कामगिरी-

-- याने शनिभोवती ३४० करोड किलोमीटर अंतर कापले.
-- शनिभोवती २९४ फेऱ्या मारल्या.
-- ४,५३,०४८ फोटोज काढले.
-- ६३५ जीबी इतकी महिती पृथ्वीवरच्या संशोधन केंद्राला पाठवली.
-- शनिचे ६ नवीन उपग्रह शोधले.
-- Enceladus  या शनिच्या सहाव्या क्रमांकाच्या मोठ्या उपग्रहावरती द्रवरूप पाण्याचा प्रचंड मोठा साठा आहे याचा शोध लावला. म्हणजेच तिथं जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते. 
-- २० वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पात ५००० शास्त्रज्ञांनी भाग घेतला. 

कासिनीने १९ जुलै २०१३ला घेतलेला फोटो. शनी आणि तो छोटासा दिसणारा ठिपका म्हणजे पृथ्वी आहे.

२० वर्षांनंतर या उपग्रहावरचं इंधन संपल्यानंतर त्याचं एकच काम राहिलं होतं.. शनिच्या पृष्ठभागावर सूर मारून आयुष्य संपवण्याचं.

ताशी १,२३,९१९ किलोमीटरच्या वेगानं कासिनी शनिकडे झेपावलं आणि कॅलिफोर्नियामध्ये पहाटेचे ३:३० वाजले असताना त्यानं चिरसमाधी घेतली. मात्र कोसळतानाही उपग्रहाचा अँटेना पृथ्वीकडे रोखलेला  होता, त्यामुळं शक्य तितक्या शेवटच्या क्षणांपर्यंतही कासिनी पृथ्वीकडे माहिती पाठवत राहिला. 

टायटन या शनीच्या सर्वात मोठ्या उपग्रहावरचा खडकाळ पृष्ठभाग- कासिनीने घेतलेला फोटो..

खरंतर हा उपग्रह इंधन संपल्यानंतरही शनिभोवती फिरू शकला असता, परंतु त्यायोगे तो टायटन या शनिच्या सर्वात मोठ्या उपग्रहासोबत किंवा Enceladus  या उपग्रहासोबत त्याची टक्कर होण्याचा धोका संभवत होता.

कासिनी भस्मसात झाल्यानंतर आकाशात दूरवर शास्त्रज्ञांना एक छोटीशी लुकलुक दिसली होती. परंतु आपल्यापासून शनि इतका दूर आहे, की कासिनी नष्ट झाल्यानंतर ही लुकलुक तब्बल ८३ मिनिटांनी दिसली. 
 

Enceladus च्या पृष्ठभागावरून निघणाऱ्या पाण्याच्या वाफा- कासिनीने घेतलेला फोटो..

इतक्या वर्षांनंतरही शास्त्रज्ञांना काही प्रश्नांची उत्तरं मात्र अजून  मिळाली नाहीयेत.. 
१. शनिवरचा दिवस किती मोठा असतो? 
२. शनिवरच्या चुंबकिय क्षेत्राचे  वेगवेगळे गुणधर्म अजून अनाकलनीय आहेत.
३. Enceladus  इथं जीवसृष्टी असू शकते, परंतु तिथं खरोखरी काही जीव राहतात का?

 

कासिनीने घेतलेल्या असंख्य फोटोंमुळे आपल्याला शनीबद्दल काय-काय माहिती मिळाली आहे, याची काही क्षणचित्रे..

टायटन शनीभोवती प्रदक्षिणा घालताना - कासिनीने घेतलेला फोटो..

शनीच्या उत्तर ध्रुवावरचे ढग षटकोनी आकार धारण करतात - कासिनीने घेतलेला फोटो..

आणि या षटकोनी आकाराच्या मध्यभागी गुलाबाच्या फुललेल्या पाकळ्यांसारखा आकार बनतो.

शनीभोवतीच्या कड्यांचा हा आहे सर्वाधिक रिझोल्यूशनचा फोटो..- कासिनीने घेतलेला फोटो..

या कडा म्हणे शनीच्या खूप छोट्या-छोट्या उपग्रहांच्या परिभ्रमणामुळे दिसतात..

अंधाराच्या पार्श्वभूमीवर शनी - कासिनीने घेतलेला फोटो..

पॅन नावाचा वेड्यावाकड्या आकाराचा शनीचा उपग्रह - कासिनीने घेतलेला फोटो..

आता शनीवर पुढचा उपग्रह कधी जाणार ते माहित नाही. आपण तोवर आणखी एखाद्या उपग्रहाने पाठवलेली छायाचित्रे नासाने प्रकाशित करण्याची वाट पाहू.. हो ना?

सबस्क्राईब करा

* indicates required