घरातले मसाले खराब झाले हे कसे ओळखाल? ते कसे साठवाल? त्यासाठी हा लेख नक्की वाचा..
स्वयंपाक ही एक कला आहे. हे वाक्य भारतीय पदार्थांसाठी लागू आहे असं वाटते. कारण कुठलाही पदार्थ ज्या आवडीने आणि कष्टाने बनवला जातो त्याला तोड नाही. आपल्याकडे पदार्थांच्या चवीचे महत्व खूप आहे. एकच घटकपदार्थ वेगवगेळे मसाले वापरून वेगळ्या चवीचा आणि निराळ्याच ढंगाचा बनवता येते. त्यामुळे आपल्याकडे मसाल्याचे विशेष महत्व आहे. मग तो मसाला वनस्पतीच्या रूपात असो किंवा पावडरच्या रूपात, दोन्ही पदार्थाची चव वाढवण्यास मदत करतात. गरम मसाले विविध वनस्पतीपासून बनवले जातात त्यांना खडा मसाला असेही म्हणतात. आज आपण पाहूयात हे मसाले किती दिवस टिकतात? ते किती काळाने खराब होता?
तुम्ही स्वयंपाकाचे तज्ञ असाल किंवा नवशिक्या, मसाल्यांमुळे पदार्थांना सुगंध, चव तर येतेच. पण औषधी वनस्पतींचे आरोग्यदायी फायदे आहेत. हे नैसर्गिक संरक्षक म्हणून काम करून आजारांना प्रतिबंध करतात. जळजळ कमी करण्यास, वेदना बरे करण्यास मदत करतात. तसेच, आहारात मसाले आणि औषधी वनस्पतींचा समावेश केल्याने चयापचय वाढते. श्वसन सुधारू शकते आणि हृदय निरोगी राहते. पण हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हे सर्वा प्रमाणात असावे. नेहमी मसाले आणि औषधी वनस्पती कमी प्रमाणात घालण्याचा सल्ला दिला जातो कारण आयुर्वेदानुसार मसाल्यांचा अतिरेक शरीरात पित्त दोष वाढवू शकतो. जास्त प्रमाणामुळे अनेक पचन समस्यादेखील वाढू शकतात.
स्वयंपाकघरात वाळलेल्या औषधी वनस्पती किंवा मसाल्यांचा साठा सर्वजण करतात. पण जुने मसाले आणि औषधी वनस्पती किती दिवस वापरायच्या किंवा फेकून द्यायच्या हा एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे हे समजून घ्या की वाळलेल्या औषधी वनस्पती आणि मसाले सामान्यत: कालबाह्य होत नाहीत. मसाल्याचा प्रकार किंवा औषधी वनस्पती यांचे शेल्फ लाइफ साधारणपणे १-४ वर्षे असते.
हे मसाले केवळ तेव्हाच वापरासाठी अयोग्य मानले जातात जेव्हा त्यांचा सुगंध किंवा चव जाते. कधी कधी ओलाव्याच्या संपर्कात आल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने साठवल्याने त्यावर परिणाम होऊ शकतो. परंतु अश्या मसाले आणि औषधी वनस्पतींचे सेवन केल्याने आरोग्यावर परिणाम होत नाही किंवा तुम्ही आजारी पडत नाही. मसाले आणि औषधी वनस्पती फक्त सुगंध, चव बदलतात. या दोन गोष्टी बदलल्यास जुने मसाले बदलायलाच हवेत.
खड्या मसाल्याचा ताजेपणा तपासण्यासाठी, आपल्या हातात थोडासा चुरा किंवा घासून घ्या आणि जर सुगंध येत नसेल किंवा त्याचा पोत बदललेला दिसला तर तो बदलण्याची वेळ नक्कीच आली आहे. मसाल्याच्या बॉक्स वर expiry date दिली असते. ती होऊन गेली असेल तर मसाला बदलावा, कारण त्याची चव कमी होते. हवा तो रंग, गंध पदार्थांना येत नाही.
मग दीर्घकाळ टिकण्यासाठी ते कसे साठवायचे, तर याचे उत्तर सोपे आहे. जर तुमच्याकडे पावडर मसाले असतील तर ते रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. त्यांना कधीही उघड्यावर सोडू नका. पाण्याचा संपर्क टाळा. मसाले थंड, कोरड्या जागी साठवा. वनस्पती मसाले साठवण्यासाठीही चांगले हवाबंद कंटेनर वापरा.
खूप वेळा केवळ चुकीच्या साठवणुकीमुळे पदार्थ खराब होऊ शकतात. त्यामुळे याची माहिती होणे गरजेचे आहे. लेख आवडल्यास जरूर शेअर करा.
शीतल दरंदळे