computer

जवळपास सगळंच आयुष्य एका सिलिंडरमध्ये बंदिस्त असलेल्या पॉल अलेक्झांडरची जीवनकहाणी वाचाच!

अत्यंत कंटाळवाण्या अशा लॉकडाऊन नामक कालखंडाचा आपण सर्वांनी सामना केला आहे. त्या दिवसांच्या आठवणीदेखील आज नकोशा वाटतात. एरवी चैतन्याने ओथंबून वाहणारी महानगरं त्या काळात चिडीचूप होती. गावंच्या गावं आजारी असल्यागत वाटत होती. मोकळे निर्जन रस्ते, बंद दुकानं आणि सतत भीतीच्या दडपणाखाली वावरत असलेले चेहरे हे दृश्य आजही त्या काळातल्या कटू आठवणींना उजाळा देतं. इतिहासात अशा प्रकारची टाळेबंदी यापूर्वीही झालेली आहे. उदाहरणच द्यायचं तर अमेरिकेत १९५२ मध्ये ज्यावेळी पोलिओच्या साथीने थैमान घातलं होतं, त्यावेळी अशाच प्रकारचं चित्र दिसत होतं. स्विमिंग पूल बंद होते. सिनेमागृहं, बार हेही मूक होते. गल्लोगल्ली डीडीटीचे फवारे मारले जात होते. हेतू हा की पोलिओचं काही प्रमाणात का होईना उच्चाटन व्हावं. पण प्रत्यक्षात तसं होत नव्हतं. पोलिओची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन काहीतरी करत आहे हे दाखवण्यासाठी हा डीडीटी फवारणीचा उपद्व्याप सुरू होता. 

शतकभरापूर्वी पोलिओ हा अत्यंत घातक रोग समजला जायचा. या रोगामुळे रुग्ण मरण पावण्याचं प्रमाणही बऱ्यापैकी होतं. मज्जारज्जूमधील मोटर न्यूरॉन्स वर हल्ला करून पोलिओचा विषाणू माणसाला अपंग करायचा. अनेकदा श्वसनासाठी मदत करणारे स्नायू यामुळे श्वसन करू शकत नसत आणि रुग्णाचा मृत्यू होई. 

असाच एक दिवस पॉल अलेक्झांडर नावाचा सहा वर्षांचा मुलगा आजारी पडला. त्याची सगळी लक्षणं पोलिओचीच होती. पण त्यावेळी बहुतेक सगळ्या इस्पितळांमध्ये पोलिओचेच रुग्ण होते. अजून रुग्ण भरती करायला जागाच शिल्लक नव्हती. त्यामुळे अलेक्झांडरच्या फॅमिली डॉक्टरने त्याला काही औषधं घरीच घेण्यासाठी म्हणून लिहून दिली‌. पण त्याच्या परिस्थितीत फरक पडेना. उलट ती अधिकाधिक गंभीर होत गेली. त्याला हातात वस्तू उचलणं, अन्न गिळणं यासारख्या साध्या साध्या हालचाली देखील करता येईनात‌. शेवटी त्याच्या आईवडिलांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. केवळ श्वास घेत होता म्हणून जिवंत म्हणायचं अशीच त्याची परिस्थिती होती. सुदैवाने एका डॉक्टरने त्याला जीवदान दिलं. त्याच्या  श्वासनलिकेवर शस्त्रक्रिया करून त्यांनी फुफ्फुसाकडे जाणारा मार्ग थोडासा मोकळा करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याला श्वास घेणं सोपं जावं.

तीन दिवसांनी पॉल जागा झाला तेव्हा त्याचं शरीर सिलिंडरसारख्या दिसणाऱ्या एका  मशीनमध्ये बंदिस्त केलेलं होतं. असं मशीन, जे त्याला श्वासोच्छवास करायला मदत करेल. पण यामुळे त्याला ना हलता येत होतं न बोलता. नंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या आजूबाजूला अशा प्रकारे मशीन मध्ये बंदिस्त केलेली अनेक मुलं आहेत. हे मशीन म्हणजे एक प्रकारचं कृत्रिम फुफ्फुसच होतं. त्याला नावही तसंच होतं : आयर्न लंग.
पुढचं जवळपास दीड वर्ष अतिशय कठीण होतं. बोलायचं नाही, हलायचं नाही की कुशीवर वळायचं नाही. एकाच स्थितीत सतत फक्त झोपून राहायचं. अगदी स्वतःच्याच मलमूत्रामध्ये तासंतास पडून राहण्याची वेळही त्याच्यावर आली. कसेबसे हे दिवस पार पडले.

हळूहळू त्याचा सुरुवातीचा जंतुसंसर्ग कमी झाला. पण पोलिओने त्याला मानेपासून खाली अपंग बनवलं होतं. श्वासोच्छवास करण्याचं काम मात्र अजूनही त्याचं कृत्रिम फुफ्फुसच करत होतं. हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते हे साध तत्व वापरून बनवलेलं हे यंत्र त्या काळात अनेक रुग्णांसाठी वरदान ठरलं होतं. त्या यंत्राला जोडलेल्या चामड्याच्या भात्यांच्या मदतीने हवा सिलेंडरच्या बाहेर टाकली जायची आणि त्यामुळे सिलेंडरच्या आत ऋण दाबाची निर्मिती होऊन फुफ्फुसं प्रसरण पावत. त्यामुळे हवा आतमध्ये घेता येत असे. हवा आत मध्ये घेतली की परत एकदा दाबामध्ये बदल होऊन फुफुसांमधील हवा बाहेर पडत असे. अशाप्रकारे रुग्णाचा श्वासोच्छवास सुरू राहत असे.
पॉल देखील या यंत्रामुळेच जिवंत राहिला होता. कधीतरी कुणीतरी आजूबाजूला कुजबुजलेलं त्याच्या कानावर पडायचं. 'हा जगून तरी काय उपयोग आहे?', 'एक ना एक दिवस असाच मरणार आहे' अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकून त्याला स्वतःचा संताप व्हायचा आणि त्याचबरोबर जगण्याची ईर्षादेखील अधिकच प्रबळ व्हायची.

हळूहळू पॉल बेडकाप्रमाणे तोंडाच्या मदतीने श्वासोच्छवास करायला शिकला. त्यामुळे अगदी थोड्या काळासाठी का होईना तो आयर्न लंगच्या मदतीशिवाय श्वासोच्छवास करू लागला. त्याने जिद्द सोडली नव्हती. २१ व्या वर्षी तो अशा अवस्थेत असताना ग्रॅज्युएट होणारा पहिला मनुष्य ठरला. त्यानंतर त्याने लॉ स्कूल ला प्रवेश घेतला. पुढे त्याने काही काळ वकिलीची प्रॅक्टिस देखील केली. 

आज हा मनुष्य वयाच्या पंच्याहत्तरीत आहे. तब्येतीत सतत चढ उतार सुरू असतात. श्वसन करण्यातल्या अडचणी, हालचालीदरम्यान असलेलं अवघडलेपण हे तर नित्याचंच आहे, पण तरीही तो टिकून आहे.

या टिकण्यामध्ये दोन गोष्टींनी चांगलीच मदत केली आहे.. एक म्हणजे त्याची प्लास्टिकची काठी. साधारण एक फूट लांबी असलेली आणि टोकाला पेन अडकवलेली. ही काठी तोंडात पकडून तो तिला जोडलेल्या पेनच्या साहाय्याने लिहू शकतो, टाईप करू शकतो, तसंच फोनची बटनंदेखील दाबू शकतो.
दुसरं म्हणजे त्याचं आयर्न लंग. या सिलिंडरच्या आकारातील मशीनला धातूचे पाय आहेत आणि त्यांना रबरी चाकं बसवलेली आहेत. या सिलिंडरची उंची हवी तशी व हवी तेवढी ॲडजस्ट करता येते आणि त्याच्या माथ्यावर असलेल्या एका झडपेमधून आतमध्ये पाहता येतं. या मशीनच्या तोंडाला सील केलेलं आहे आणि आतमध्ये एक बेड आहे. मशीन उघडून त्यामधून रुग्णाला आत सरकवता येतं. एकंदर एखाद्या छोट्या सबमरीनप्रमाणे त्याचं स्वरूप आहे.

अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे पॉलने आठ वर्षं खपून स्वतःचं एक पुस्तक देखील प्रकाशित केलं आहे. 'थ्री मिनिट्स फॉर अ डॉग: माय लाईफ इन ॲन आयर्न लंग' असं त्याचं नाव. लहान असताना आपल्या फिजिओथेरपिस्ट बरोबर त्याने एक पैज लावली होती. त्यानुसार जर तीन मिनिटं तो आयर्न लंगच्या मदतीशिवाय  तोंडाने श्वासोच्छवास करू शकला असता, तर त्याची थेरपिस्ट त्याला कुत्र्याचं पिल्लू भेट देणार होती. इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर पॉल ती पैज जिंकला आणि त्याला कुत्र्याचं पिल्लू भेट म्हणून मिळालं. या घटनेवरूनच हे शीर्षक घेतलेलं आहे.

मुळात फक्त दोन आठवड्यांकरिताच वापर करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या आयर्न लंगच्या आधारावर पॉल अनेक वर्षं जगला. ते त्याच्या शरीराचाच एक हिस्सा बनलं. हे सगळं त्याने कसं निभावून नेलं हे त्याचं त्यालाच माहीत. पण प्रबळ इच्छाशक्ती म्हणजे काय हे त्याच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.


स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required