घोड्याच्या बदल्यात मुलाला सोडवून त्यांनी जगाच्या शेतीचा इतिहास कसा बदलला ?
इतिहासात कितीतरी महान व्यक्ती होऊन गेल्या आहेत. यातील कुणाचे काम जास्त चांगले? कुणाचे काम जास्त प्रभावी? अशी आपण तुलना करूच शकत नाही. कारण, प्रत्येकानेच आपापल्या क्षेत्रात आपापल्या परीने प्रामाणिक योगदान दिले आहे. ज्याची फळे आज आपण सर्वचजण चाखत आहोत. सामन्यातील सामान्य व्यक्तीच्या रोजच्या कामामुळेही काही ना काही परिणाम घडून येत असतोच, फक्त आपल्याला त्याची कधी जाणीव होत नाही.
डायमंड मिसुरी येथील मोझेस आणि सुझॅन वॉशिंग्टन या दांपत्याने त्यांच्या घोड्याच्या बदल्यात त्यांच्याकडे मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या मेरीचे कृश मुल वाचवले. त्याकाळी कृष्णवर्णीय हे गोऱ्यांची गुलामी करण्यासाठीच जन्मलेले असतात असा गैरसमज मोठ्या प्रमाणात रूढ होता. सुझॅन आणि मोझेस यांनी त्या मुलाचा जीव तर वाचवलाच पण त्याला चांगले शिक्षण मिळेल याचीही सोय केली. एका कृष्णवर्णीय मुलासाठी जे काही करता येईल ते त्यांनी केले. त्याला स्वतःचे नावही दिले.
तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नाही तर शेतीमधील नवनव्या संशोधन पद्धतींना जन्म देणारा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर. खरे सुझॅन आणि मोझेस यांनी एका मुलाचा जीव वाचवला पण या मुलाने पुढे लक्षावधी लोकांचा जीव वाचेल असे काम केले. इतरांना त्यासाठी प्रेरणा दिली.
जॉर्ज कार्व्हरने शेंगदाणे आणि रताळी या दोन पिकांवर भरपूर प्रयोग केले. त्यांचे उत्पादन वाढवून त्यावर प्रक्रिया करून नफा कसा कमवायचा याचेही तंत्र शोधले. यासाठी कार्व्हरचे तर आभार मानलेच पाहिजेत पण त्याआधी आणखी एका व्यक्तीचे आभार मानले पाहिजे. ते म्हणजे इट्टा मे बड, ज्यांनी कायदेशीररित्या वंशभेद संपुष्टात आणला. कारण, त्यांच्या या कामामुळेच कार्व्हरला आपले संशोधन पुढे रेटणे शक्य झाले.
(जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर)
कार्व्हरला लहानपणापासूनच वनस्पतींबद्दल प्रेम होते. झाडाच्या वाढीला काय पोषक ठरेल, काय घातक ठरेल याची उपजत समज त्याच्याकडे होती. त्याने आपले हे ज्ञान आपल्यापुरतेच मर्यादित ठेवले नाही. त्याने आणखी एका मुलाला अशाच पद्धतीने झाडांची भाषा समजून घेण्यास मदत केली. आपला हा वारसा त्याने हेन्री वॅलेसकडे हस्तांतरित केला.
वॅलेसने पुढे हा वारसा आणखी समृद्ध केला. तो अमेरिकेचा कृषी सचिव आणि एफडीआरचा उपाध्यक्ष झाला. एकदा मेक्सिकोच्या दौऱ्यावर असताना त्याने पहिले की मका हे मेक्सिकोतील लोकांचे प्रमुख अन्न आहे, पण पुरेशा उत्पादनाअभावी त्यांना या धान्याची टंचाई जाणवत आहे. मेक्सिकोतील लोकांना पुरेसे धान्य पिकवता यावे यासाठी त्याने या मक्याचे हायब्रीड उत्पादन घ्यायचे ठरवले. कोरड्या वातावरणात मका आणि गव्हाचे उत्पादन घेता यावे म्हणून त्यांनी तिथेच एक प्रयोगशाळा उभी केली.
या प्रकल्पाची धुरा त्याने नॉर्मन बर्लो या तरुण संशोधकाकडे सोपविली. बर्लोने लवकरच मका आणि गव्हाचे असे हायब्रीड पिक शोधले जे अधिक उत्पादन देईल, ज्यावर कुठल्या रोगाचा फारसा प्रादुर्भाव होणार नाही आणि कोरड्या हवामानातही हे पिक चांगले उगवेल. नॉर्मनचे हे संशोधन फक्त मेक्सिको पुरतेच मर्यादित राहिले नाही. ज्या ज्या देशात अन्नधान्याची टंचाई जाणवत होती, त्या त्या देशांत हे पिक घेऊन अन्नधान्याच्या टंचाईवर मात केली जाऊ लागली.
नॉर्मनच्या या संशोधनामुळे जगभरातील लाखो लोकांची होणारी उपासमार टळली. म्हणूनच त्याला हरितक्रांतीचा जनक म्हटले गेले. नॉर्मनच्या या संशोधनाचा फायदा भारतालाही झाला. भारतातही नेहमीच अन्नधान्याची टंचाई जाणवत होती. नॉर्मनने जी भरपूर उत्पन्न देणारी संकरित गव्हाच्या जातीची निर्मिती केली त्यामुळेच भारतही गव्हाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.
जॉर्ज कार्व्हरने फिरती कृषी विद्यापीठे स्थापन केली ज्यामुळे शेतीतील विविध प्रयोगांना चालना मिळाली. त्याच्या शिष्याने हेन्री वॅलेस त्याच्याही पुढे जात अधिक उत्पन्न देणारी बियाणे उत्पादित करण्याचा प्रयोग सुरू केला आणि नॉर्मन बर्लोने हा प्रयोग आणखी विस्तारित करून अन्नधान्याच्याबाबतीत मागास देशांनाही आत्मनिर्भर बनवले.
डायमंडच्या मिसुरीयेथील त्या सुझॅन दांपत्याने खरे तर फक्त एका मुलाचाच जीव वाचवला नाही, तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा जीव वाचवला होता. एक छोटीशी सकारात्मक कृती पुढे जाऊन किती व्यापक रूप धारण करते याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.