computer

शिक्षकांशिवाय असलेली आणि पूर्णपणे विद्यार्थ्यांनी चालवलेली उत्तरप्रदेशातली शाळा!! हे काम कसं चालतं हे तरी पाहा!!

आपल्याकडे शाळा म्हणलं की तिथले शिक्षक कसे आहेत, मुख्याध्यापक कोण आहेत असे प्रश्न पडतात. कारण शिक्षकांवरूनच शाळेची ओळख असते. वर्षानुवर्षे विद्यार्थी शिक्षकांना विसरत नाहीत. त्यामुळे शाळेचीही आठवण कायम मनात घर करून राहते. पण तुम्ही अशी कुठली शाळा ऐकली आहे का जिथे शिक्षकच नाहीत! होय, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. पण अशी शाळा खरोखरच अस्तित्वात आहे. आपल्या भारतात, उत्तर प्रदेशातील महोबामध्ये अशी एक शाळा आहे जिथे विद्यार्थी शिक्षकांशिवाय शिक्षण घेतात. शिक्षकच नाही, तर त्या शाळेत मुख्याध्यापकही नाहीत. आज पाहूयात या शाळेविषयी आणि तिथले विद्यार्थी शिक्षकांशिवाय कसे अभ्यास करतात.

ही कहाणी आहे महोबाच्या नदीकाठी वसलेल्या तीरथ सागर शाळेतल्या विद्यार्थ्यांची. इथे विद्यार्थी सकाळी येतात आणि संध्याकाळपर्यंत कोणत्याही शिक्षकाशिवाय अभ्यास करतात. एका स्टडी क्लबच्या माध्यमातून ही मुले एकत्र येतात आणि एकमेकांबरोबर अभ्यास करतात. जेव्हा अडचण येते तेव्हा विद्यार्थी एकमेकांना शिकवतात. म्हणजे जो मुलगा एखाद्या विषयात हुशार असेल तो विद्यार्थी तोच विषय इतरांना शिकवतो. गणितात हुशार असलेला मुलगा गणितात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्याला शिकवण्याची जबाबदारी घेतो. प्रत्येक विद्यर्थ्यात काहीतरी विशेष गुण असतातच याचा फायदा इतरांना ते करून देतात. इथे मुलांनी स्वतःच नियम बनवले आहेत आणि कोणाच्याही सक्तीशिवाय सर्वजण ते नियम पाळतात.

येथील विद्यार्थी स्वत: च्या इच्छेने दररोज एक विषय निवडतात आणि नंतर ते विषय एकत्र सोडवतात. ज्या विद्यार्थ्यांना हे विषय अवघड वाटतात, त्यांनाही याचा फायदा होतो. फक्त अभ्यासच नाही, तर इथे सर्व विषयांवर चर्चा होते. अगदी निवडणुकीपासून ते जगात होणाऱ्या घडामोडी यावर चर्चा होते. त्यामुळे मुलांचे सामान्य ज्ञानही वाढते. आत्तापर्यंतच्या रिपोर्टनुसार इथल्या प्रत्येक मुलामध्ये काहीतरी खास आहे. त्यामुळेच या तीरथ सागर शाळेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी देशातील मोठ्या पदांवर पोहोचले आहेत. इथे बरेच विद्यार्थी सरकारी नोकऱ्या आणि प्रशासकीय सेवांसाठीही तयारी करतात.

या विशेष शाळेत ग्रामीण आणि शहरी भागातून विद्यार्थी येतात. जी मुले आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि खासगी कोचिंगवर खर्च करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होतो. ज्ञान मिळवण्यासाठी मोठमोठे ब्रांड, महागडे क्लास, पैसे खर्च करावे लागतात असेच काही नाही. शिकायची तळमळ असेल तर मार्ग सापडतोच हेच या विद्यर्थ्यांनी दाखवून दिले आहे

शीतल दरंदळे

 

सबस्क्राईब करा

* indicates required