अंटार्टिका मोहिमेदरम्यान जहाज बुडाल्यावर त्यावरचे दर्यावर्दी कसे वाचले? त्यांना सुखरूप परत आणणाऱ्या अर्नेस्ट शॅकलटनची गोष्ट..
त्या जहाजावरील दर्यावर्दी हवालदिल झाले होते. कारणही तसंच होतं. वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे अशा ठिकाणी ते अडकून पडले होते. इथून आपण जिवंत, सुखरूप बाहेर पडू की नाही हेही त्यांना ठाऊक नव्हतं. अपेक्षेने ते त्यांच्या नायकाकडे बघत होते. पण सुटकेचा मार्ग दिसत नव्हता. दिवसेंदिवस संकट अधिकच गहिरं होत चाललं होतं.
१९१४ ते १७ या कालखंडामध्ये इम्पीरियल ट्रान्स-अंटार्क्टिका एक्सपेडिशन नावाची मोहीम राबवण्यात आली. अत्यंत साहसी, अविश्वसनीय आणि थरारक अशी मोहीम होती ही. अंटार्क्टिका खंडाच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत प्रवास करणं हा या तिचा हेतू होता. मोहिमेचा मार्ग दक्षिण ध्रुवावरून जाणार होता. पण प्रत्यक्षात घडलं ते विपरीतच.
या मोहिमेसाठी बरीच आधीपासून तयारी सुरू झाली होती. या मोहिमेचा प्रणेता होता सर अर्नेस्ट शॅकलटन नावाचा उत्साही आणि धाडसी एक्सप्लोअरर. याआधी १९०७ ते १९०९ दरम्यानही तो अंटार्क्टिकाच्या मोहिमेत सहभागी झाला होता. तिथून परत आल्याआल्या त्याने पुढच्या मोहिमेची तयारी सुरू केली. आधीच्या मोहिमेदरम्यान तो दक्षिण ध्रुवाच्या जवळपास जाऊन परत आला होता. यावेळी त्याला दक्षिण ध्रुव पार करण्याचे वेध लागले होते. आपल्याबरोबरच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हे साध्य करता येईल असा त्याला विश्वास होता. अंटार्क्टिकाच्या एका किनाऱ्याकडून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंतचं अंतर दक्षिण ध्रुवाच्या मार्गाने सुमारे १८०० मैल (२८९६ किमी) इतकं आहे.
त्याच्या या मोहिमेचा मार्ग पुढील प्रमाणे होता:
दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेला असलेला वेडेलचा सागरी प्रदेश - अंटार्क्टिकाचा पूर्णतः शोध न लागलेला प्रदेश - दक्षिण ध्रुव - आणि शेवटी रॉस सी/ न्यूझीलंडच्या दक्षिणेला असलेलं मॅकमर्डो क्षेत्र.
वेडेल समुद्राच्या प्रवासासाठी वापरलेलं जहाज नॉर्वेजियन शिपयार्ड मध्ये नव्याने बांधलं गेलं होतं. मुळात ते आर्क्टिक समुद्रात पर्यटनासाठी वापरण्यात येणार होतं. त्याचं नाव होतं एन्ड्युअरन्स. अजून एक जहाज- ऑरोरा - हेदेखील यापूर्वीच्या अंटार्क्टिका मोहिमेसाठी वापरलं गेलं होतं. जुलै १९१४ च्या अखेरीला मोहिमेसाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली. ८ ऑगस्ट १९१४ या दिवशी मोहिमेला सुरुवात झाली.
५ नोव्हेंबर १९१४ रोजी जहाज दक्षिण अमेरिकेच्या आग्नेय दिशेला असलेल्या दक्षिण जॉर्जिया येथे पोहोचलं. तिथे असलेल्या काही दर्यावर्दींकडून त्यांना दक्षिण जॉर्जिया आणि वेडेल समुद्रादरम्यानच्या वातावरणाबद्दल समजलं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावर्षी जास्त प्रमाणात हिमवर्षाव होण्याचा अंदाज होता. त्यामुळे मोहिमेसाठी आवश्यक ती काळजी घेणं आवश्यक होतं. असाही वेडेल समुद्र बर्फाने वेढलेला समुद्र म्हणूनच ओळखला जायचा. बर्फात दीर्घकाळ राहावं लागलं तर त्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी या चमूने बरोबर घेतली होती. सुरुवातीला तरी सर्वजण निर्धास्त होते.
दक्षिण जॉर्जियाचा किनारा सोडल्यापासून सहा आठवड्यांच्या कालावधीत एन्ड्युअरन्सने सुमारे १००० मैल बर्फातून प्रवास केला. जानेवारी १९१५ मध्ये जहाज वेडेल समुद्रात पोहोचलं. मात्र त्याठिकाणी असलेलं वातावरण आतापर्यंतचं सर्वात वाईट वातावरण होतं. बर्फामुळे एन्ड्युअरन्सची गती कमी व्हायला सुरुवात झाली. पुढे पुढे तर बर्फ इतकं वाढलं की जहाजाला पुढे जाता येईना. जहाज आणि जहाजावरील सर्व माणसं समुद्रात अडकून पडली. अखेरीस जहाजावरच्या या साहसी वीरांनी बर्फावर पाच छावण्या उभारल्या. जहाजावरचं शक्य तेवढं सामान यांनी या छावण्यांमध्ये हलवलं. यातून बाहेर पडण्याच्या दिशेनेही काही जणांनी हालचाली सुरू केल्या होत्या सोबत आणलेली अवजारे लोखंडी सळ्या यांच्या मदतीने बर्फ खोदून काही मार्ग काढता येत हो का? हे बघणं सुरू होतं पण आजूबाजूचा बर्फ अतिशय दाट आणि कठीण होता. त्यामुळे फारसा उपयोग होत नव्हता. काही दिवसांनी वसंत ऋतू सुरू झाल्यानंतर हळूहळू बर्फ वितळेल आणि जहाजाच्या प्रवासाचा मार्ग मोकळा होईल अशी त्यांना आशा होती.
ऑक्टोबर महिना सुरू झाला. एक दिवस बर्फाच्या आणि वादळी वाऱ्यांच्या तीव्र माऱ्यामुळे जहाजाच्या सांगाड्यालाच तडा गेला. बर्फ आणि वादळ यांच्या सततच्या झोडपण्याने जहाजाचं बरंच नुकसान झालं. अखेरीस २१ नोव्हेंबर १९१५ या दिवशी ते तुटलं आणि वेडेलच्या समुद्रात बर्फाखाली बुडायला लागलं. आता जहाज सोडून देण्यावाचून गत्यंतर नव्हतं. त्याचबरोबर जहाजावर असलेली स्लेज वाहून येणारी कुत्री आणि मिसेस चिट्टी नावाची मांजर हे आता निरुपयोगी ठरणार होते. नाईलाजास्तव त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. जहाजाबरोबर आणलेल्या तीन लाइफबोटींमधून जहाजावरचे साहसवीर पुढच्या प्रवासाला निघाले.
१५ एप्रिल रोजी ते एलिफंटा आयलंड नावाच्या निर्जन बेटापाशी पोहोचले. जवळपास एक वर्षाहून अधिक काळानंतर त्यांचा जमिनीशी संपर्क आला होता. अर्थात या बेटावर राहणं सुरक्षित नव्हतं. हे बेट अंधारं, उदासवाणं आणि जगापासून तुटलेलं होतं. शिवाय कुठल्याही सागरी मार्गापासून बरंच दूर होतं. त्यामुळे मुक्कामासाठी दुसरी चांगली जागा शोधणं गरजेचं होतं. त्यासाठी जहाजाचा कॅप्टन फ्रॅन्क वर्स्ले, शॅकलटन आणि इतर पाच जण जेम्स केयर्ड नावाच्या लाईफ बोटी मधून समुद्रात गेले आणि तिथून साडेसातशे मैल अंतरावर असलेल्या दक्षिण जॉर्जियाच्या स्ट्रोमनेस इथल्या एका व्हेलिंग स्टेशनकडे निघाले. व्हेलिंग स्टेशन ही अशी जागा आहे, जिथे शिकार करून आणलेले देवमासे ठेवले जातात. त्याचबरोबर देवमाशांची शिकार करणारे लोकही बऱ्याचदा इथे मुक्काम ठोकून असतात.
पंधरा दिवस सागरी प्रवास करत चक्रीवादळ आणि जोरदार वारे यांचा सामना करत त्यांची बोट दक्षिण जॉर्जियाला पोहोचली. या प्रवासादरम्यानही अनेक अडचणी होत्या. मधूनमधून बोटीवर आदळणाऱ्या लाटा स्लीपिंग बॅगसकट सर्व काही ओलं करून टाकत होत्या. थंडी कमी करण्यासाठी कुठलाही उपाय नव्हता. ओलाव्यामुळे रेनडियरच्या कातडीपासून बनवलेल्या स्लीपिंग बॅग्ज निरुपयोगी ठरत होत्या. त्या रेनडियरच्याच्या कातड्यावरचे केस या ओलाव्यामुळे झडत होते, आणि उब नाहीशी होत होती. व्हेलिंग स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यामध्ये आता फक्त दक्षिण जॉर्जियाच्या पर्वतरांगा होत्या. केवळ ४५ मीटर लांबीचा दोरखंड वापरून या लोकांनी छत्तीस तासांत हा पर्वत पार केला आणि २० मे १९१६ रोजी ते व्हेलिंग स्टेशनला पोहोचले.
बऱ्याच महिन्यांनी मनुष्य वस्ती असलेल्या ठिकाणाचे दर्शन झालं. पण एवढ्यावर थांबून चालणार नव्हतं. एलिफंट आयलंडवर माघारी राहिलेल्या आपल्या सहकाऱ्यांना त्यांना परत आणायचं होतं. त्यासाठी ३० ऑगस्ट रोजी शॅकलटन चिलीच्या महासागराकडे निघालेल्या एका छोट्या नौकेवरून एलिफंट आयलंडकडे परतला. आत्तापर्यंत त्याच्या माघारी राहिलेले त्याच्या चमूचे सदस्य पेंग्विन आणि सील यांचं मांस खाऊन जिवंत राहिले होते. विशेष म्हणजे २८ जणांच्या त्या गटामधला प्रत्येक माणूस सुखरूप होता. त्यांच्या सुटकेसरशी एक अंध:कारमय पर्व दूर झालं.
नंतरही शॅकलटन याने काही मोहिमांमध्ये भाग घेतला. अंटार्क्टिका अजूनही त्याला खुणावत होतं. प्रदीर्घ वाटाघाटी करून, आपल्या सहकाऱ्यांना पटवून तो परत एकदा अंटार्क्टिकाला प्रदक्षिणा घालण्याच्या उद्देशाने निघाला खरा, पण आताची परिस्थिती वेगळी होती. तो आता पूर्वीचा खंबीर, आत्मविश्वासू शॅकलटन राहिला नव्हता. त्याच्याऐवजी मनात साहसाची कितीही ऊर्मी असली तरी तब्येतीने साथ न दिल्याने काहीसा खचलेला मनुष्य होता. यापूर्वी येऊन गेलेल्या हृदय विकाराच्या झटक्याने त्याला कशाची शाश्वती वाटत नव्हती. पण तरीही साहसाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. दोन जानेवारीला आपल्या डायरीमध्ये त्याने आपण थकल्याचा उल्लेखही केला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. समुद्र कवेत घेऊ पाहणारं वादळ शांत झालं.
पण म्हणून त्याच्या मोहीमांचं, प्रसंगी त्याने दाखवलेल्या अतुलनीय धाडसाचं, प्रसंगावधानाचं, नेतृत्वगुणांचं महत्व कमी होत नाही. ते चिरंतन राहणार हे खरं.
स्मिता जोगळेकर