computer

महिलांचा सहभाग, अमेरिकेचा बहिष्कार ते म्युनिकचा दहशतवादी हल्ला....या १३ घटनांनी ऑलिंपिक स्पर्धेत इतिहास रचला!!

क्रिडाजगतात ऑलिंपिक स्पर्धेचे महत्त्व सर्वात जास्त आहे. जगभरातील सर्वात जास्त खेळ या स्पर्धेत खेळले जातात. तसेच या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवणारा देश हा क्रिडा महासत्ता म्हणून ओळखला जातो. प्रचंड जुना इतिहास असलेली ही स्पर्धा अनेक कारणांनी दरवेळी लक्षात राहते. पण आज आम्ही ऑलिंपिकच्या इतिहासातून काही महत्त्वाच्या घटना घेऊन आलो आहोत. या घटनांनी ऑलिंपिकमध्ये इतिहास घडवला. 

१) १९०० साली पॅरिस ऑलिंपिकपासून महिलांचा प्रवेश.

१९०० पूर्वी महिलांना ऑलिंपिकमध्ये स्थान नव्हते. १९०० च्या पॅरिसला खेळवण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये लॉन टेनिस आणि गोल्फ या खेळांमध्ये महिलांना सामील करून घेण्यात आले. २०१२ साली महिलांना इतर खेळांबरोबर बॉक्सिंगमध्ये पण समाविष्ट करून घेण्यात आले.

२) १९३६ ओवेनने तोडलेले सर्व विक्रम

या ऑलिंपिकमध्ये हिटलरने आपल्या देशातून आपला वंश कसा सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी खेळाडू पाठवले होते. पण हिटलरच्या अपेक्षांवर पाणी फिरवत ॲफ्रो-अमेरिकन खेळाडू जेसी ओवेनने बहुतांश पदके मिळवत विक्रम केला होता. या स्पर्धेत ओवेनने आपल्या नाझी स्पर्धकांसोबत मैत्री करत द्वेषापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे याचे उदाहरण समोर ठेवले होते.

३) १९४८: पॅरालिम्पिक गेम्सचा उदय

१९४८ साली लंडन येथे झालेल्या स्पर्धेत इंग्लिश डॉक्टर लुडविग गटमॅन यांनी दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेल्या लोकांना धीर देण्यासाठी इंटरनॅशनल व्हिलचेयर गेम्सची स्थापना केली होती. स्पोर्ट्स थेरपीच्या माध्यमातून अपंग झालेल्या लोकांना स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. पुढे जाऊन त्यांचे स्वतंत्र ऑलिंपिक भरवण्यात येऊ लागले.

४) रोम १९६०: पहिल्यांदा टिव्हीवर प्रकाशन 

१९६० साली बदलत्या जगबरोबर चालत ऑलिंपिक स्पर्धा टीव्हीवर दाखवण्यात आल्या होत्या, तसेच खेळाडूंना जाहिराती पण करता आल्या होत्या. पण याचबरोबर डोपिंग नावाची काळी बाजू या स्पर्धेत पुढे आली होती. डोपिंग म्हणजे खेळाडूंसाठी निषिद्ध ठरवलेली औषधं घेणं. यात अंमलीपदार्थांचा समावेश होतो. जगात जवळजवळ सर्वच खेळांमध्ये ही समस्या आढळून येते. १९६० साली ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा डोपिंग प्रकरण घडलं होतं.

५) मेक्सिको १९६८: कृष्णवर्णीयांचे आंदोलन

१९६८ साली मेक्सिकोत स्पर्धा होत असताना अमेरिकेत कृष्णवर्णीयांचे आंदोलन सुरू होते. यावेळी कृष्णवर्णीयांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकावा अशी मागणी होत होती. पण त्याऐवजी जॉन कार्लोस आणि टॉम स्मिथ या दोन खेळाडूंनी स्पर्धेत सामील होत पदक जिंकल्यावर होणाऱ्या राष्ट्रगीतावेळी आपली मूठ हवेत वर करत आपले म्हणणे जगापुढे मांडले होते. पण यामुळे त्यांना ऑलिंपिकमधून निलंबित करण्यात आले होते.

६) १९७२ म्युनिक: दहशतवादी हल्ला

१९७२ चे म्युनिक ऑलिंपिक हे दहशतवादी हल्ल्यासाठी ओळखले जाते. काही पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी ११ इस्रायली खेळाडूंचं अपहरण करून त्यांची हत्या घडवून आणली होती. पण या घटनेनंतरही स्पर्धा थांबली नाही. सुरक्षा वाढवून स्पर्धा घेण्यात आली होती. या संपूर्ण घटनेवर आलेला म्युनिक नावाचा सिनेमा जगप्रसिद्ध आहे.

७) १९७६ मॉंट्रीयल: आफ्रिकन देशांचा बहिष्कार

या स्पर्धेत तब्बल २२ आफ्रिकन देशांनी बहिष्काराचे अस्त्र काढले होते. न्यूझीलँड या देशाने दक्षिण आफ्रिकेत रग्बी स्पर्धेसाठी पाठवलेला संघ हा वर्णद्वेषी होता आणि या ऑलिंपिकमध्ये न्यूझीलँड हा देश पण सहभागी होत असल्याने हा बहिष्कार टाकण्यात आला होता.

८) १९८० मॉस्को: अमेरिकेचा बहिष्कार

रशियात होत असणाऱ्या या स्पर्धेत रशियाने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमेरिकन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी सहभागी न होता ऑलिंपिकला पर्यायी स्पर्धा भरवली होती. सहभागी न झालेल्या सर्व देशांनी मिळून फिलाडेल्फिया येथे लिबर्टी बेल क्लासिक स्पर्धा भरावली होती.

९) १९९२ बार्सिलोना: दिग्गजांनी गाजवलेली स्पर्धा

१९९२ सालच्या स्पर्धेत अमेरिकन बास्केटबॉल टीम ड्रीम टीम म्हणून ओळखली जात होती. याला कारण पण तसेच होते. या टीममध्ये मायकल जॉर्डन, चार्ल्स बर्कले, पॅट्रिक इविंग या दिग्गजांचा भरणा होता. अपेक्षेप्रमाणे सर्वांनी स्पर्धा गाजवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अमेरिकेत आजही या लोकांनी मिळवलेला विजय साजरा केला जातो.

१०) १९९६ ऍटलांटा: मोहम्मद अलीने पेटवलेली मशाल.

पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त असूनही मोहम्मद अलीने १९९६ च्या ऍटलांटा ऑलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात मशाल पेटवली होती. तो क्षण सर्वांसाठी अत्यंत खास होता.

११) २००० सिडनी: दक्षिण आणि उत्तर कोरियाचे मिलन

दक्षिण आणि उत्तर कोरिया हे दोन देश भारत पाकिस्तानसारखेच शत्रू देश आहेत. पण २००० साली झालेल्या ऑलिंपिकच्या उद्घाटन समारंभात दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांच्या हातात हात घालून चालले होते.

१२) २००४ ऍथेन्स: पदकाची डिझाईन बदलली

या स्पर्धेपासून नव्या धाटणीचे पदक विजेत्या खेळाडूंना दिले जाऊ लागले. ऑलिंपिक पदकावर आता ऍथेन्सच्या पॅनाथीनायको स्टेडियमचे चित्र असलेले पदक दिले जाते. हे स्टेडियम जगातले सर्वात जुने स्टेडियम समजले जाते. तसेच १८९६ साली पहिले ऑलिंपिक याच ठिकाणी भरवण्यात आले होते.

१३) २००८ बीजिंग: मायकेल फ्लेप्सने मिळवलेली सर्वाधिक पदके

२००८ साली चीनमधील बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारताकडून अभिनव बिंद्रा याने पहिले सुवर्णपदक मिळवले होते. याच स्पर्धेत मायकेल फेल्प्स याने एकाच स्पर्धेत पोहण्याच्या प्रकारात तब्बल ८ सुवर्णपदके मिळवण्याचा विक्रम केला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required