अमजद ते गब्बर : अमजदखानचा त्याच्या पहिल्या भूमिकेत शिरतानाचा झालेला संघर्षमय प्रवास..

तो अमजदच्या आयुष्यातील शूटिंगचा पहिला दिवस होता. दहा वर्षं रंगभूमी गाजवल्यानंतर त्याचं चित्रपटात काम करण्याचं स्वप्न होतं. त्याचा आर्मी ड्रेस मुंबईच्या (कु) प्रसिद्ध चोरबाजारातून आणण्यात आला होता, तर त्याचे दात काळे करण्यात आले होते. तंबाखू मळत आणि चालत त्याला डायलॉग म्हणायचे होते. शूटिंग सुरु झाले पण रंगभूमीवरचा अमजदचा आत्मविश्वास काही दिसेना. त्याचे हात कडक वाटत होते, आवाज थरथरत होता आणि तो खूप नर्व्हस झाला होता. दोन दिवस आणि चाळीसेक रीटेकनंतर रमेश सिप्पी आणि द्वारका दिवेचा (कॅमेरामन) यांना कळून चुकले की या नवोदित कलाकाराला थोडा ब्रेक हवाय.

"तू अपने आपको सेटल कर ले" द्वारका अमजदला म्हणाले. त्या रात्री अमजद खूप रडला. त्याचे वडील- ज्येष्ठ चरित्र अभिनेता जयंत- कॅन्सरशी लढत होते आणि त्याचा मुलगा एक महिन्याचा होता. नाव आणि पैसा कमावणे अमजदसाठी अपरिहार्य होते. तो बायकोला पत्र लिहून, "मला थोडं अवघड जातंय... पण मी हे करीन." असे कळवत असे.  पण सगळी व्यथा सांगायला त्याला धजावत नसे.  तीन चमचे साखर घातलेले दिवसाला शंभर कटिंग चहा तो पीत असे. 

अमजद खानचे बाबा- जयंत. हकीकत, मेरा गांव, मेरा देश इत्यादी अनेक सिनेमांतून यांनी भूमिका केल्या. (चित्रस्रोत)

ज्यांनी त्याच नाव सुचवलं ते सलीम-जावेद सुद्धा रमेशला म्हणाले, "की तुला पसंत नसेल तर तू त्याला बदलू शकतो". हळूहळू सेटवर कुजबुज सुरू झाली. "अमजदची निवड चुकली","अशा नवख्या कलाकाराला एवढया महत्वाच्या भूमिकेसाठी घेऊन घोडचूक झाली" वगैरे वगैरे. पण रमेश ठाम होता. अमजदच गब्बरच्या भूमिकेला न्याय देऊ शकतो ही खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. दिवेचांनी अमजदला रोज सेटवर कॉस्च्युम घालून येऊन बसायचा आणि पडेल ते काम करायचा सल्ला दिला. हळूहळू पूर्ण कथानक त्याच्या डोक्यात घट्ट रुजले,सगळ्यांचे डायलॉग त्याला पाठ झाले. आत्मविश्वास परत आला. एक दिवस तोच सीन परत शूट करायला सुरुवात झाली-आणि पहिल्या टेकमध्येच तो ओके झाला.

स्रोत

रंगभूमीवरच्या कसलेल्या कलाकाराप्रमाणे अमजदने डायलॉग डिलिव्हरी केली होती. आणि "कितने आदमी थे" हा डायलॉग चिरकालासाठी अजरामर झाला होता-अमजद आणि गब्बर बरोबर!

 

लेखक-  नितीन श्रोत्री

सबस्क्राईब करा

* indicates required