computer

ज्याला देवमाणूस समजलो तो निघाला सैतान -विधवेचा खून करणार्‍या डॉ. लागूची सत्यकथा

डॉक्टरी वेशात लपलेल्या एका नराधमाची ही सत्यकथा आहे असे म्हटले जाते. ज्या डॉक्टरांवर आपण देवासारखाच किंबहुना त्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतो तेच डॉक्टर पैशाच्या मोहापायी रुग्णांचा जीव घेतात तेव्हा आपसूकच हादरून जायला होते. साताऱ्यातील संतोष पोळ नावाच्या डॉक्टरने पैशासाठी आपल्या सहा रुग्णांचा खून केला होता. या घटनेने तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. तुम्हाला माहिती नसेल पण अशाप्रकारे पैशासाठी रुग्णांचा खून करणारा डॉ. पोळ हा काही महाराष्ट्रातील पहिलाच डॉक्टर नव्हता. याच्याही आधी १९५७ मध्ये पुण्यातील डॉ. लागू याने आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून त्याची पेशंट लक्ष्मीबाई कर्वे यांची हत्या केली होती. लक्ष्मीबाई या ४५ वर्षांच्या अतिश्रीमंत विधवा होत्या. त्यांच्या नावावरील ही संपत्ती हडपण्यासाठी डॉ. लागूने अत्यंत थंड डोक्याने लक्ष्मीबाईचा खून केला. देवमाणूसची ही पहिली आवृत्ती होती म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एका डॉक्टरने पैशाच्या लोभापायी आणि ज्या नियोजनबद्धरित्या हा खून घडवून आणला होता तो पाहता संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरून गेला होता. कोण होता हा डॉक्टर आणि याने कसा आपला डाव साधला?

त्या दिवशी पहाटे पुण्याहून मुंबईला जाणारी पॅसेंजर ट्रेन व्हिक्टोरिया स्टेशनवर थांबली. पुण्याचे एक डॉक्टर अनंत चिंतामण लागू या ट्रेनमधून प्रवास करत होते आणि त्यांच्याच डब्यातून प्रवास करणारी एक मध्यमवयीन स्त्री अचानकच बेशुद्ध झाली होती. डॉक्टरांनी त्या महिलेला जी. टी. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले.
लागूनी डॉक्टरांना सांगितले की, “ट्रेन मधून प्रवास करताना या बाई अचानकच बेशुद्ध झाल्या. त्यांची माझी अजिबात ओळख नाही. ट्रेनमधील प्रवासात ज्या काही गप्पा झाल्या त्यावूरून एवढेच समजले की यांचे नाव इंदुमती पोंक्षे आहे आणि त्यांचा एक भाऊ डॉक्टर आहे पण तो कलकत्त्याला राहतो. अचानकच बोलता बोलता या बाईंची शुद्ध हरपली. त्यांच्यासोबत कुणीच नव्हते म्हणून मीच त्यांना इथे आणले. त्यांचे कुणी नातेवाईक पुण्यात किंवा मुंबईत राहतात की नाही हे देखील मला माहीत नाही.”

 

डॉक्टरांनी त्या बाईंवर उपचार सुरू केले, पण त्या बाई उपचाराला प्रतिसादच देत नव्हत्या. पहाटे सहाच्या दरम्यान बेशुद्धावस्थेत दवाखान्यात आणलेल्या त्या बाईंचा सकाळी साडे अकराच्या दरम्यान मृत्यू झाला. तिच्या अंगावरील कपड्याशिवाय तिच्यासोबत काहीही सामान किंवा दागिने, पैसे असा किंमती ऐवजही तिच्यासोबत नव्हता. मुंबईच्या त्या हॉस्पिटलमध्ये तिचे कुणीही नातेवाईक फिरकले नाहीत. डॉक्टरांना वाटले कदाचित तिचे या जगात कुणीच नसावे. म्हणून तिचे प्रेत शवागारात टाकून दिले.

त्या दिवशी सकाळी डॉ. वैरवा यांनी जेव्हा त्या बाईंची तपासणी केली होती तेव्हाच त्यांना शंका आली होती. तिचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी त्या वॉर्डच्या लेडी इन्चार्ज डॉ.आहुजा यांना बॉडीचे पोस्टमार्टम करण्यास सांगितले. पण त्यांची ड्युटीची वेळ संपली होती म्हणून डॉ. आहुजांनी ही केस आरओएम (निवासी डॉक्टर) डॉ. म्हापुस्कर यांच्याकडे सुपूर्द केली. डॉ. म्हापूसकरांनी डॉ वैरवा यांची सूचना फेटाळून बॉडीचे पोस्टमार्टम करणे गरजेचे नसल्याचे सांगितले.

दुसऱ्या दिवशी दुपारी डॉ. म्हापुसकरांनी डॉ. लागूंना टेलिग्राम पाठवला, “इंदुमती मेली. तिचे शव न्या.” लागू परत आले नाहीत, पण दुसऱ्या दिवशी त्यांचे डॉ. म्हापूसकरांना पत्र आले, ११ नोव्हेंबर १९५६ रोजी पहाटे सहा ॲडमिट केलेल्या त्या स्त्रीचा त्याच दिवशी सकाळी ११ वाजता मृत्यू झालेला आहे. मी त्यांच्या कलकत्ता येथे राहणाऱ्या भावाला पत्रामार्फत कळवले आहे. ते उद्या सकाळपर्यंत तिचे पोहोचतील. त्यांचे नाव जी. व्ही. देशपांडे असे आहे – श्री. देशपांडे त्या बाईंचे प्रेत ताब्यात घेतील.”

दुसऱ्या दिवशी दुपारी डॉ. म्हापुसकरांनी डॉ. लागूंना टेलिग्राम पाठवला, “इंदुमती मेली. तिचे शव न्या.” लागू परत आले नाहीत, पण दुसऱ्या दिवशी त्यांचे डॉ. म्हापूसकरांना पत्र आले, ११ नोव्हेंबर १९५६ रोजी पहाटे सहा ॲडमिट केलेल्या त्या स्त्रीचा त्याच दिवशी सकाळी ११ वाजता मृत्यू झालेला आहे. मी त्यांच्या कलकत्ता येथे राहणाऱ्या भावाला पत्रामार्फत कळवले आहे. ते उद्या सकाळपर्यंत तिचे पोहोचतील. त्यांचे नाव जी. व्ही. देशपांडे असे आहे – श्री. देशपांडे त्या बाईंचे प्रेत ताब्यात घेतील.”

पण दुसऱ्या दिवशी कुणीच ते प्रेत न्यायला आले नाही. सरकारी नियमानुसार अशी बेवारस प्रेते मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पाठवली जातात. या नियमानुसार इंदुमतीचे प्रेत मेडिकल कॉलेजमध्ये नेले जात असताना त्या कर्मचाऱ्याला त्या प्रेताच्या गळ्यावर काही मारहाणीच्या खुणा दिसल्या आणि त्याने ते प्रेत पुन्हा तिथेच ठेवले. पुन्हा एकदा त्या प्रेताचे पोस्टमार्टम करण्याचे आदेश देण्यात आले.

तोपार्यंत १९ नोव्हेंबर १९५७ ही तारीख उजाडली होती. पोलीस खात्यातील सर्जननी बॉडीचे पोस्टमार्टम केले. पण त्यामध्ये मृत्यूचे कुठलेही अनैसर्गिक कारण सापडले नाही. तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विष आढळून आले नाही. शेवटी सगळे काही आलबेल असल्याचे समजून २४ नोव्हेंबर रोजी एका सामाजिक संघटनेने मुंबईत त्या प्रेताचा दफनविधी घेतला.

इकडे ११ नोव्हेंबर रोजी पुण्याहून मुंबईला डॉक्टरांची भेट घेण्यासाठी म्हणून गेलेल्या लक्ष्मीबाई कर्वे अजून घरी परतल्या नव्हत्या आणि उलट त्यांच्या नावाने दररोज एक पत्र मिळत होते ज्यात त्यांनी वारंवार मी दुसरे लग्न केले असून माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचा मजकूर लिहिला होता. लक्ष्मीबाई कर्वे यांचा मुलगा आणि नातेवाईक सगळेच चिंतेत पडले होते. कारण अचानक उठून लक्ष्मीबाई असे काही पाऊल उचलतील यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यांच्या मुलाचा तर यावर अजिबातच विश्वास नव्हता. कुठे तरी काही तरी चुकतंय याची सर्वांनाच जाणीव होत होती. पण नेमकं काय हे कुणाच्याच लक्षात येत नव्हते. शेवटी नातेवाईकांनी पोलिसात जाणेच योग्य समजले आणि लक्ष्मीबाई कर्वे हरवल्या असल्याचीतक्रार पोलिसात नोंद केली.

लक्ष्मीबाई कर्वे श्रीमंत होत्या. पुण्यात त्यांचे स्वतःचे घर होते. त्यांचाकडे सोन्याचांदीचे भरपूर दागिने होते. अनेक कंपन्यामध्ये शेअर्स आणि कर्जरोखे होते. बँकेत भरपूर रोख पैसे जमा होते.
डॉ. लागू हा लक्ष्मीबाईंचा फॅमिली डॉक्टर होता. लक्ष्मीबाईंच्या पतींचे निधन झाल्यावर तोच त्यांचा आर्थिक सल्लागारही बनला. लक्ष्मीबाईंची आर्थिक स्थिती भक्कम आहे हे डॉ. लागूला चांगलेच माहीत होते. त्याने हळूहळू लक्ष्मीबाईंचा विश्वास संपादन केला. लक्ष्मीबाईंचे त्यांच्या मुलांशी पटत नसल्याने त्यांची मुले त्यांच्या आर्थिक व्यवहारात फारशी ढवळाढवळ करत नसत. डॉ. लागूने या सगळ्याचा फायदा उचलत एक पद्धतशीर योजना आखली आणि ती अंमलात आणली. खरे तर त्या दिवशी जेव्हा लक्ष्मीबाई पुण्याहून मुंबईला निघाल्या तेव्हाच त्यांनी डॉक्टरच्या सांगण्यानुसार त्यांना काही रकमेचे चेक साईन करून दिले होते. त्यांनी स्वतः सही केलेली काही कागदपत्रेही त्याच्याकडे सुपूर्द केली होती. त्यांना क्षयरोगाचा त्रास होता आणि त्याचेच उपचार घेण्यासाठी म्हणून त्या डॉक्टरसोबत मुंबईला निघाल्या होत्या. टीबी आणि मधुमेह याचा त्यांना खूप वर्षापासून त्रास होता. त्यांना आरोग्याच्या अनेक गुंतागुंतीच्या समस्या होत्या आणि या सगळ्यात त्यांना एकमेव आधार वाटत होता तो डॉ. लागूचा. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ लागूने त्यांच्या सहीचा वापर करून त्याच्या खात्यातील रक्कम लंपास केली. त्याने लक्ष्मीबाईच्या नावाने ज्या ज्या कंपनीत त्यांचे शेअर्स आणि कर्ज रोखे होते तिथून ही ते माघारी घेत असल्याचे पत्र पाठवले. यासाठी त्याने लक्ष्मीबाईंच्या खोट्या सह्या केल्या.

लक्ष्मीबाईच्या नावाने स्वतःच त्यांच्या नातेवाईकांना पत्रे पाठवून रोज वेगवेगळ्या कहाण्या ऐकवू लागला. पोलिसांनी जेव्हा ही पत्रे नेमकी कुठून येतात याचा शोध घेतला तेव्हा यामागचा खरा सूत्रधार डॉ. लागूच असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस विभागाच्या सर्जननेही लक्ष्मीबाईच्या मृत्यू नैसर्गिक नसल्याचा म्हटले, मात्र नेमका कशामुळे त्याच्या मृत्यू झाला हेही ठामपणे सांगता येणार नाही असेही म्हटले. ज्यादिवशी त्यांच्या मृत्यू झाला त्याच दिवशी जर त्याचे शवविच्छेदन केले गेले असते तर नक्कीच कोणत्या विषामुळे त्याच्या मृत्यू झाला हे कळले असते. पोस्टमार्टम वेळेत का गेले नाही? याची चौकशी केली असता ज्या डॉक्टरने पोस्टमार्टमची गरज नसल्याचा निर्वाळा दिला तो डॉक्टर म्हापूसकर हा डॉ. लागूचा मित्र असल्याचे तपासात उघड झाले. मित्राच्या सांगण्यावरून डॉ. म्हापुसकरांनी पोस्टमार्टमला उशीर लावला ज्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शोधच लागणार नाही.

प्रकरण कोर्टात गेले तेव्हा संशयाची सुई आपसूकच डॉ. लागूकडे वळत होती. त्याचा हवाला देत स्थानिक कोर्टाने डॉ. लागूला दोषी करार देत फाशीची शिक्षा सुनावली. डॉ. लागूने मग उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही त्याची फाशीची शिक्षा कायम राहिली. मग तो सर्वोच्च न्यायालयात गेला. डॉ लागूने पद्धतशीरपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याच्या संशयास्पद हालचालींनीच त्याचा गुन्हा सिद्ध केला होता.

खरे तर ११ नोव्हेंबर १९५७च्या त्या दिवशी डॉ. लागू, लक्ष्मीबाईंच्या सोबतच पुण्याहून मुंबईला निघाला होता. लक्ष्मीबाईच्या टीबीसाठी डॉ. लागूचे मुंबईतील एक डॉक्टर मित्र त्यांच्यावर उपचार करत होते. घरातून निघताना लक्ष्मीबाईंनी आपले सगळे सोन्याचे, मोत्याचे दागिनेही अंगावर घातले होते. डॉ. लागूने सांगितल्याप्रमाणे त्याने तयार केलेल्या कागदपत्रावर सांगितलेल्या ठिकाणी लक्ष्मीबाईंनी सह्या केल्या होत्या. एकाच ट्रेनने प्रवासाला निघाल्यानंतर ट्रेन मुंबईच्या जवळ येताच पहाटेच्या वेळच्या शांततेत डॉ. लागूने शांतपणे लक्ष्मीबाईला कसले तरी इंजेक्शन दिले आणि त्यांनतर त्या बेशुद्ध पडल्या. थोड्या वेळात तिचा मृत्यू होणार हेही डॉ. लागूला माहीत होते. पण जोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत नाही तोपर्यंत तो दवाखान्यातच घुटमळत राहिला. त्याने दवाखान्यात तिचे नावही चुकीचे दिले होते. तिचे इंदुमती पोंक्षे हे माहेरचे नाव सांगितल्याने कुणालाच काही सुगावा लागला नाही. डॉ. म्हापूसकरने पोस्टमार्टमसाठी उशीर लावल्याने मृत्यू नेमका कशाने झाला हेच स्पष्ट झाले नाही. अशा अनेक त्रुटीं असल्या तरी डॉ. लागूच्या हालचाली त्याला निर्दोष सिद्ध करत नव्हत्या. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयातही त्याची फाशीची शिक्षा कायम राहिली.

भक्कम पुरावे नसतानाही फक्त परिस्थितीच्या आधारे डॉ. लागूला दोषी मानण्यात आले. भारतीय दंड विधान क्षेत्रातील हा पहिला असा खटला होता ज्यात प्रत्यक्ष साक्षीदार नसतानाही घडलेल्या घटनाक्रमामुळे आरोपी पिंजऱ्यात अडकला. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर लगेचच डॉ. लागूला फासावर लटकावण्यात आले.

देवमाणूस असाही असू शकतो याची प्रचिती देणारी महाराष्ट्रातील ही पहिली घटना होती. त्यानंतर डॉ. संतोष पोळने तर डॉक्टरी पेशाचा अडून जे काही केले त्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरून गेला. आता तोच देवमाणूस पुन्हा एकदा टीव्हीच्या पडद्यावर धुमाकूळ घालतोय.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required