श्रीमंतीतही २०हून अधिक गुरं न पाळणारा आणि पहिली कमाई हवेत उधळून देणारा अभिनेता!! काय प्रकरण आहे हे?
कल्पना करा, एक माणूस मिळालेला पैसा हवेत उधळतोय. असातसा मिळालेला पैसा नाही तो. अगदी त्याच्या कष्टाचा, भल्या मार्गाने मिळालेला पैसा. वार्याबरोबर त्या नोटा कागदाच्या क्षुद्र कपट्यांप्रमाणे इतस्तत: विखुरल्या जात आहेत. आणि नंतर चक्क कोल्हे, तरस त्या नोटांची विल्हेवाट लावत आहेत. तुम्ही या कृतीला काय म्हणाल? मूर्खपणा? वेड? उन्माद? माज? की आणखी काही...
खरंतर अशी विक्षिप्त गोष्ट प्रत्यक्षात घडली होती. ती घडली होती ती आफ्रिका खंडातल्या नामिबिया नावाच्या देशात, अन त्यामागचं कारण होतं निव्वळ अज्ञान! तुमच्यापैकी ज्यांनी ‘द गॉड्स मस्ट बी क्रेझी’ या मालिकेतले सिनेमे बघितले असतील तर त्यांना त्यातला कलहारी बुशमन नक्कीच आठवत असेल. तोच तो - पार्ट १ मधला झिझो. कमरेला केवळ लंगोटी बांधून जंगलात हिंडणारा, तीरकमठा वापरून शिकार करणारा, बारीक डोळ्यांचा, चपट्या नाकाचा आणि कुटुंबवत्सल तोंडवळ्याचा. हे काम त्यानेच केलं होतं आणि तेही कुठल्या सिनेमात नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात. त्याचं खरं नाव होतं नेक्साऊ टोमा. नामिबियामधल्या त्सुमक्वे गावात त्याचा जन्म झाला आणि त्याचं बहुतेक सगळं आयुष्यही तिथेच गेलं. तो प्रत्यक्षातही बुशमनच होता. आज जाणून घेऊ त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी-
१. तसा प्रत्यक्ष सिनेमात काम करण्यापूर्वी त्याचा सिनेमाशी काहीही संबंध नव्हता. त्याला बाहेरच्या जगाचीही काहीच माहिती नव्हती.
२. त्याच्या पहिल्या सिनेमासाठी त्याला मिळालेलं मानधन होतं ३०० डॉलर्स. त्यावेळी त्याला या पैशाची किंमत माहिती नव्हती. त्यामुळेच त्याने त्या नोटा भिरकावून दिल्या होत्या. बुशमन संस्कृतीत पैसा, चलन या गोष्टींचा तोवर प्रवेशच झाला नव्हता.
३. त्याला २० पर्यंतच आकडे मोजता येत. त्यामुळे त्याच्याकडे नंतरही कितीही पैसे आले तरी त्याच्या घरच्या एका कळपात एकावेळी जास्तीत जास्त २०च गुरं असत.
४. ‘द गॉड्स मस्ट बी क्रेझी - १’ च्या वेळी दिग्दर्शक जेमी उइसनेच त्याला शोधून काढलं आणि भूमिका दिली. शूटिंगदरम्यानही कित्येकदा तो दिग्दर्शकाच्या सूचनांकडे सरळ दुर्लक्ष करत स्वत:च्या मनाने अभिनय करायचा. अर्थातच, त्याची भूमिका खूप उत्स्फूर्त आणि जिवंत वठली.
(जेमी उइस)
५. द गॉड्स मस्ट बी क्रेझी-२ च्या वेळी तो चांगलाच प्रसिद्ध झाला होता आणि त्यावेळचं त्याचं मानधन होतं तब्बल ५,००,००० डॉलर्स. या पैशांतून त्याने आपल्या कुटुंबासाठी विटांचं घर आणि वीज यांची तजवीज केली.
६. मात्र पैशाचं मॅनेजमेंट त्याला अजिबात जमलं नाही. एवढंच काय, सिनेमातून आपल्याला नक्की किती पैसे मिळतात हेही त्याला सांगता यायचं नाही, असं म्हटलं जातं. त्याचे सगळे आर्थिक व्यवहार फिल्म कंपनीच्या माध्यमातून होत आणि त्याला त्याच्या चर्चकडून पैसे मिळत.
७. ‘द गॉड्स मस्ट बी क्रेझी’ करण्याआधी त्याने फक्त ३ गोरे लोक पाहिले होते. दिग्दर्शक जेमी उइस हा चौथा.
८. बर्यापैकी कमाई झाल्यावर त्याने शेवर्ले एफ २५० ही गाडी घेतली आणि दरमहा १५० रँड(दक्षिण आफ्रिकेचं चलन) पगारावर एक ड्रायव्हरही ठेवला. मात्र नंतर त्याने ती विकली आणि गुरे खरेदी केली.
९. त्याची ज्ञात संपत्ती म्हणजे २१ गुरं, ११ मेंढ्या, २ घोडे, २ सायकली, २ कुदळी, २ दाताळी आणि ५ कुर्हाडी. यांतल्या दोन कुऱ्हाडी तर त्यानेच बनवल्या होत्या.
१०. घर घेतल्यावर काही वर्षांनी त्याने घरातलं फर्निचर, चीजवस्तू एकेक करत विकायला सुरुवात केली. सुरुवातीला गुरांची वगैरे खरेदी करण्यासाठी आणि नंतर चक्क दारूसाठी.
११. भरपूर पैसा मिळवूनही नेक्साऊ साधाच राहत असे. त्याची मुख्य कारणं दोन होती. एक म्हणजे बुशमन लोकांची दुनियाच मुळी ऐहिक सुखसोयी, पैसाअडका, चैन, आर्थिक व्यवहार यांपासून पूर्णपणे अलिप्त होती आणि दुसरं म्हणजे आपल्या संपत्तीचं जगाला प्रदर्शन केल्यास लोक आपली संपत्ती मिळवण्यासाठी चेटूक करतील अशीही त्याला भीती वाटत असे. त्यामुळे तो आपल्या मुळांपासून कधीही दूर गेला नाही.
१२. त्याचा मृत्यू २००३ मध्ये झाला. मृत्यूचं अधिकृत कारण होतं टीबी. मात्र त्या दिवशी त्याची दिनचर्या नेहमीप्रमाणेच होती. सकाळी ६ वाजता उठून सरपण गोळा करून त्याने आपल्या सासर्यांबरोबर चहा घेतला आणि शिकारीला निघाला. मात्र त्यादिवशी तो परतला नाही. दुसर्या दिवशी त्याच्या सासर्यांना त्याचा माग सापडला. नंतर काही वेळातच त्याचा पत्ता लागला. मात्र तोवर फार उशीर झाला होता.
आज नामिबियात नेक्साऊ टोमा आख्यायिका बनून राहिला आहे. एरवी सतत प्रगतीची चाकं लावून दौडताना आपण सहजता, संवेदनशीलता आणि उत्स्फूर्तता हरवून बसलो आहोत. ते पाहता आधुनिकतेचा स्पर्शही न झालेली ही अनागर बेटं पाहून बरं वाटतं. तुमचं काय मत आहे?
लेखिका : स्मिता जोगळेकर