२-४ डॉलर्ससाठी चार मुलं विकणारी आई!! यांचं पुढे काय झालं? ते एकमेकांना पुढे भेटले की नाही?
हा फोटो बघितल्यावर पहिलाच विचार मनात असा येतो की 'अरे! हा तर प्रसिध्दी मिळावी म्हणून रचलेला फोटो आहे!'
असे अनेक प्रयोग लोक करत असतात. कारणं वेगवेगळी असतात. गरीबीचे चित्रण-सरकारची नालस्ती- पैसे उकळणे यापैकी किंवा इतर अनेक कारणं असू शकतात. सध्या श्रीलंकेत जे चालू आहे ते बघता येत्या काही काळात असे अनेक फोटो बघायला मिळतील. पण हा फोटो खरा आहे- म्हणजे १९४८ साली एका जोडप्याने आपली मुलं काही डॉलर्ससाठी विकून टाकली होती. त्या घटनेचा हा फोटो आहे. काय आहे या फोटोमागची सत्यकथा ते आज जाणून घेऊया.
१९४८ साली घेतलेल्या या फोटोत शिकागो शहरातल्या ल्युसिल आणि रे शालीफू या जोडप्याची ही चार मुलं आहेत. ल्युसिल म्हणजे या मुलांची आई आपला चेहेरा लपवताना या फोटोत दिसते आहे. रे शालीफू म्हणजे या मुलांचा बाप एक ट्रक ड्रायव्हर होता. त्याला काम मिळेना तेव्हा तो कुटुंबाला वार्यावर सोडून पळून गेला. तो पळून गेल्यावर घराचे भाडे थकले, खाण्याची पंचाईत झाली. ल्युसिलकडे नोकरी आणि ती मिळेल अशी शैक्षणिक पात्रताही नव्हती. अशावेळी समोर एकच उपाय होता, तो म्हणजे दुसर्या एखाद्या पुरुषासोबत संसार थाटणे. तसा एक माणूस तिला भेटला. पण आधीची चार मुलं सांभाळायला त्याने नकार दिला. केवळ या कारणास्तव या आईने पोरांना विकून टाकायचा निर्णय घेतला. बाप पळून गेला आणि आईने काही डॉलर्ससाठी -अक्षरशः २/४ डॉलरमध्ये पोरं विकून टाकली. हा फोटो घेतला तेव्हा ल्युसिलच्या पोटात आणखी एक बाळ होतं. त्याच्या जन्मानंतर त्यालाही दत्तक देऊन आई मोकळी झाली.
आता पुढचा प्रश्न मनात येतो तो असा की या लहान मुलांचं पुढे काय झालं? या मुलांना काही कुटुंबांनी दत्तक घेतलं. एका कुटुंबाने तर चारपैकी दोनजणांना दत्तक घेतलं. पण दोन मुलं दत्तक घेण्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा नव्हता. त्यांना घरात काम करायला मुलं हवी होती. म्हणून त्यांनी दत्तक घेतली. या मुलांनी नंतर एकदा मुलाखतीत असं सांगितलं की पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून त्यांना साखळीने बांधून ठेवण्यात यायचे. एक मुलगी १९९८ साली कर्करोगाने गेली. एक मुलगीच आईला भेटली. साहजिकच आहे की आईला भेटल्यावर ती म्हणाली, "She needs to be in hell burning." अर्थात आणखी वेगळं काहीच अपेक्षित नव्हतं. या उद्वेगाचं आणखी एक कारण असं होतं की या मुलांना विकल्यानंतर ल्युसिलने नवा संसार थाटला आणि चार मुलींना जन्म दिला. त्यावर एका मुलाने रागाने असेही म्हटले की, "आईने त्यांना ठेवले, पण आम्हाला नाही."
दुर्दैवाच्या फेर्यात अशी ताटातूट झाल्यावर ही मुलं कशी भेटली? त्यांच्यापैकी एकाने सोशल मिडियाचा वापर करून ही कथा सांगितली आणि हळूहळू एकमेकांचा शोध लागत गेला. समाजमाध्यमाचा सकारात्मक उपयोग असाही होऊ शकतो. हा मूळ फोटो The Vidette-Messenger of Valparaisoच्या फोटोग्राफरने ५ ऑगस्ट १९४८ रोजी घेतला होता. काहीजणांचे म्हणणे असेही आहे की या ल्युसिलला या फोटोचे पैसे देण्यात आले होते. ही शक्यता नाकारता येत नाही. पण त्यामुळे सत्य घटना बदलत नाही.
१९४४ साली यशस्वी अणुस्फोट घडवणार्या अमेरिकेसारख्या देशात असे घडू शकते का असा संशयही वाचकांच्या मनात येणे शक्य आहे. त्यावर एकच उत्तर आहे ते असे की आपल्याला दिसते ती अमेरिका 'शोकेस' मधली आहे. शोकेसच्यामागे अमेरिका कशी आहे हे त्यांच्या नागरिकांनाच माहिती असेल.