जंबो किंग, जंबो झेरॉक्स, जंबो वडापाव!! पण हा मूळ जंबो शब्द कुठून आला हे तर आधी वाचा!!
ही 'जंबो' या एका शब्दाची कथा आहे ज्या सोबत शेकडो ब्रँड जोडले गेले आहेत.जे काही सर्वसाधारण आकारापेक्षा मोठं असेल ते सगळं जंबो या एका शब्दात मावतं.
हा शब्द पहिल्यांदा १८८५ साली अमेऱीकेत अस्तित्वात आला. एका अमेरीकन सर्कशीत आफ्रिकेतून आणलेल्या एका हत्तीचं हे नाव होत. दुर्दैव असं की हा हत्ती रेल्वेलाइन पार करत असताना त्याला आगगाडीची धडक बसली आणि तो गेला. त्याचा मालक प्रसिध्दी तंत्रात फारच वाकबगार होता. त्याने त्या मेलेल्या हत्तीत भुसा भरून एका विद्यापीठाला भेट म्हणून दिला. हत्ती गेला, पण जंबो हा शब्द मात्र अमर झाला. त्यानंतर अनेक उत्पादनांना जंबो नाव देण्याची फॅशनच आली. परदेशात काय, भारतात काय, जंबो हे नाव ब्रँडसाठी आजतगायत वापरलं जातं.
भारतात हा शब्द १९७० नंतर फारच लोकप्रिय झाला. त्याचं कारण एकच होतं ते म्हणजे १९७० च्या दशकात एअर इंडियाने आणलेल्या जेट विमानांचं नाव होतं जंबोजेट! त्या काळात या मोठ्या विमानाचं लोकांना इतकं अप्रूप होतं की मुंबई विमानतळाच्या आसपासच्या इमारतींच्या गच्चीवर उभं राहून लोक जंबोजेटचं दर्शन घ्यायचे. त्याच भागात नंतर नव्या सोसायट्या आल्या. त्यापैकी एका सोसायटीचं नाव जंबोदर्शन तर दुसर्या सोसायटीचं नाव विमानदर्शन! नंतरच्या काळात मोठ्ठा वडापाव म्हणजे जंबो वडापाव, मोठं मंत्रीमंडळ म्हणजे जंबो मंत्रीमंडळ. सगळ काही जंबो जंबो!! आजच्या तारखेस ट्रेडमार्क नोंद करणार्या सरकारी संकेतस्थळाचा धांडोळा घेतला तर १०० हून अधिक ब्रँड जंबो नावाशी निगडीत आहेत.
आता एक महत्वाचा मुद्दा : जंबो हा शब्द मूळ इंग्रजी भाषेतला नाही, पण वापरात आल्यावर त्याचा व्यापारात उपयोग झाला. आपल्या बोली भाषेत अनेक नवे शब्द येत असतात. एटीकेटी हा शब्द बघा. हा खरे म्हणजे शब्दच नाही. तर 'अलाउड टू किप टर्म्स'चा तो शॉर्ट फॉर्म आहे. पण एटीकेटी माहिती नाही असा एकही विद्यार्थी नाही..एका हुशार उद्योजकाने त्याचाच वापर करून एक कपड्याचा ब्रँड बनवला. दुसरे उदाहरण तर आणखी गमतीदार आहे. गँग ऑफ वासेपूर हा चित्रपट लोकप्रिय झाल्यावर मुंबईत 'देसी कट्टा' नावाचा चहाच्या दुकानाचा ब्रँड आला. असे शब्द वापरून काही नवे ब्रँड तयार झालेले तुम्ही बघितले आहेत का?