computer

वेल्लूरच्या एका खाटेच्या दवाखान्याचं १८ वर्षांत मेडिकल कॉलेजमध्ये रुपांतर करणाऱ्या आयडा स्कडर यांच्याबद्दल तुम्हांला काय माहित आहे??

आता संशोधनामुळे आपलं आयुष्य बरंच सुखकर झालं असलं तरी पूर्वीच्या काळी जगात आणि अर्थातच भारतातही साथीचे आणि इतरही बरेच रोग असायचे. त्यातला प्लेग, कॉलरा, कुष्ठरोग यांसारख्या रोगांशी अनेक डॉक्टरांनी लढा दिला. त्यातलंच एक नांव होतं, डॉ. आयडा स्कडर. नाव भारतीय वाटत नाही ना? हो, अमेरिकेतून भारतात आलेल्या मिशनरींच्या तिसऱ्या पिढीतल्या त्या डॉक्टर होत्या. परदेशातून भारतात समाजकार्य करायला आलेल्या व्यक्तींचा आढावा घ्यायचा झाला तर काही ठराविक आणि प्रसिद्ध नावंच आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु डॉ. आयडा स्कडर यांचं नाव मात्र फारसं कोणाला माहीत नाही.

त्यांचा जन्म भारतातलाच. आधी म्हटलं तसं त्यांच्या सामाजिक कार्याला तीन पिढ्यांची परंपरा लाभली आहे. त्यांचे आजोबा, काका, आई-वडील, चुलत भावंडे अशा सर्वांनीच स्वतःला सामाजिक कार्याला वाहून घेतलं होतं. डॉ. आयडा यांचे वडील डॉ. जॉन स्कडर (दुसरे) व आई सोफिया वैद्यकीय मिशनरी म्हणून भारतात आले आणि आपल्या कामासाठी त्यांनी मद्रासजवळील तिंडीवनम् या खेड्याची निवड केली.

आयडा यांचा जन्म राणीपेट येथे झाला. पण आयुष्याची पहिली आठ वर्षं त्यांनी तिंडीवनम् मधेच घालवली. या आठ वर्षांत त्यांना भारतातला दुष्काळ, गरिबी, उपासमार, रोगराई या सगळ्याचा खूप जवळून अनुभव आला. त्यांच्या संवेदनशील मनावर या सर्वांचा खूप खोल ठसा उमटला. काही काळानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना अमेरिकेला पाठवण्यात आले. मॅसॅच्युसेट्समधील नॉर्थफिल्ड सेमिनरीमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर त्या आपल्या आजारी आईला भेटायला म्हणून भारतात परतल्या ते मिशनरी न बनण्याचा पक्का निर्धार करूनच.

पण तसं व्हायचं नव्हतं. निव्वळ स्त्री प्रसुती तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे बाळंतपणात एक रात्रीत त्यांना तीन महिलांचे मृत्यू  झालेले पाहावे लागले. या प्रसंगामुळे त्यांच्या विचारांची दिशा पुर्णपणे बदलली व त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निश्चय केला. महिलांसाठी खुल्या असलेल्या अमेरिकेतल्या कॉर्नेल युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमधून पहिल्या वर्गात त्यांनी पदवी मिळवली आणि त्या दक्षिण भारतातल्या वेल्लूर येथे परतल्या. दरम्यान डॉ. जॉन स्कडर यांच्या मृत्यू झाला आणि डॉ. आयडा यांनी आपली वैद्यकीय सेवा आपल्या राहत्या बंगल्यात पुढे सुरू ठेवली. तीही पुरे पडेना म्हणून त्यांनी फिरता दवाखाना सुरू केला. त्यासाठी वेळप्रसंगी बैलगाडीतूनही प्रवास करावा लागायचा, पण तो ही त्यांनी केला. वेळप्रसंगी रस्त्यांवरसुद्धा त्यांनी अनेक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.

मॅनहॅटनमध्ये त्याकाळी श्री. शेल नावाचे एक बँकर होते. डॉ. आयडांचे अमेरिकेत शिक्षण सुरु असतानाचा पुढे चालून डॉ. आयडांना सुसज्ज दवाखाना उभारता यावा यासाठी या शेलकाकांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ १०,०००/- डॉलर्स दिले आणि दवाखान्यासाठी इतर आवश्यक सामानही देणगी स्वरूपात दिले. डॉ. आयडांनी या देणगीचा योग्य प्रकारे वापर केला. दोन वर्षांत त्यांनी जवळजवळ ५००० रुग्णांवर उपचार केले. १९०२ साली याच शेलकाकांच्या पत्नीच्या नावे मेरी टॅबर शेल इस्पितळ सुरू केले व बंगल्यातला दवाखाना त्यांनी इस्पितळात हलवला.

सुरवातीला त्यांच्या मदतीला फक्त एक मदतनीस होती. रुग्णांची संख्या भरमसाठ वाढल्यामुळे त्यांनी अजून काही महिलांना परिचारिकेचे प्रशिक्षण देऊन कामात सामावून घेतले. यादरम्यान त्यांना विविध प्रकारचे नेत्ररोग, अस्वच्छतेमुळे होणारे नारू सारखे त्वचारोग, कुष्ठरोग, बालविवाह पद्धतीमुळे येणाऱ्या अल्पवयीन माता व बालकांचा अपमृत्यु, दुष्काळामुळे होणारे कुपोषण व या सर्वच समस्येच्या मुळाशी असणारी अंधश्रद्धा अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी परिचारिका प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे ठरवले. १९०९ च्या सुमारास त्यांनी डेलिया होग्टन हिच्या मदतीने १५ विद्यार्थीनीसाठी परिचारिका प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्या स्वतः शरीरशास्त्र व शस्त्रक्रिया हे विषय तिथे शिकवत असत. याआधीच त्यांनी एका १९०३मध्ये कंपाऊंडर्सासाठीही प्रशिक्षण केंद्र सुरु केले होते.

हळूहळू रुग्णालयावरील ताण वाढत होता. १८ नर्सेस व ४ कंपाउंडर्स सुध्दा कमी पडत होते. हे बघून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती ही की दक्षिण भारतातल्या महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना आता आणखी मदतीची आवश्यकता आहे, त्या एकट्या प्रत्येक ठिकाणी जाऊ शकणार नाहीत व म्हणून त्यांनी मुलींसाठी वैद्यकीय शाळा उघडण्याचे ठरविले. अनेक प्रयत्नांती १९ ऑगस्ट १९१८ रोजी Union Missionary Medical School for Women ची स्थापना झाली. या महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवत, डॉ. स्कडर यांचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. १९२० साली ब्रिटिश सरकारने डॉ. स्कडर यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी कैसर-ए-हिंद हा किताब देऊन सन्मानित केले. महाविद्यालय आणि रुग्णालय सुसज्ज बनवण्यासाठी आवश्यक असणारा निधी गोळा करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा अमेरिकेत प्रवास करून एकूण दहा लाख डॉलर्सचा निधी उभा केला.

सुरवातीला फक्त स्त्रियांसाठी असलेले हे महाविद्यालय १९४५ मध्ये पुरुषांसाठीही खुले करण्यात आले आणि आज त्याची गणना भारतातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयात होते. ज्या वैद्यकीय केंद्रासाठी डॉ. स्कडर यांनी आपली हयात वेचली ते आशियातील सर्वात मोठे वैद्यकीय केंद्र बनताना बघण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांची भाची डॉ. आयडा बी. स्कडर, डॉ. पॉल ब्रॅण्ड आणि इतर बरेच लोक यांच्या मार्गदर्शनाखाली रेडिएशन-ऑन्कोलॉजी, वक्षस्थळावरील शस्त्रक्रिया, कुष्ठरोग शल्यक्रिया आणि पुनर्वसन, सूक्ष्म जीवशास्त्र, ग्रामीण कार्य, मानसिक आरोग्य, नेत्रचिकित्सा असे अनेक नवीन विभाग रूग्णालयात सुरू झाले.

विपुल उर्जा आणि अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी जे स्वप्न बघितले ते अखेर साकार झाले. हळूहळू त्यांनी आपल्या कार्याची धुरा डॉ. हिल्डा लाझरस यांच्यावर सोपवली व स्वतः निवृत्त झाल्या. १९५२मधल्या जगातल्या सर्वोत्कृष्ट पाच महिला डॉक्टरांना मिळालेल्या इलिझाबेथ ब्लॅकवेल मानांकनात एक नाव त्यांचंही होतं. इलिझाबेथ ब्लॅकवेल यांना जगातल्या पहिल्या महिला डॉक्टर मानलं जातं. त्यांच्या नावाचा किताब मिळणं ही अर्थातच मोठी गोष्ट होती. अर्थात जगातल्या पहिल्या खऱ्या महिला डॉक्टरने डॉ. इलिझाबेथच्या ३७ वर्षे आधी, म्हणजेच १८१२ साली डॉक्टर असल्याची पदवी घेतली होती हे तुम्ही वाचलं असेलच.

निवृत्तीनंतर ही त्या अधूनमधून रुग्णालयात येत असत. एकदा अशाच भेटीत त्या पाय घसरून पडल्या. कमरेच्या हाडाला दुखापत झाली व कायमचं अपंगत्व त्यांच्या पदरी पडलं. त्यानंतर साधारण वर्षभरातच २४ मे १९६० रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी वेल्लूरमधील आपल्या हिलटॉप बंगल्यात शेवटचा श्वास घेतला. एक पर्व समाप्त झालं.....

 

लेखिका : भारती मुळे

सबस्क्राईब करा

* indicates required