घाबरू नका !! हंता विषाणूबद्दल या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या !!
चीनमधून पसरलेला कोरोनाव्हायरस जगात धुमाकूळ घालत असतानाच एका नवीन विषाणूचं आगमन झालं आहे. या नवीन विषाणूचं नाव आहे ‘हंता’. चीनमध्ये हंताने काही लोकांचे जीव घेतल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्याच असतील. लोकांमध्ये या नवीन विषाणूच्या नावाने घबराट उडाली आहे, पण हा नवीन विषाणू खरंच जीवघेणा आहे का? तो कसा पसरतो? तो भारतात येईल का? या प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊया.
सर्वात आधी तर एक गोष्ट लक्षात घ्या, हंता विषाणू हा नवीन विषाणू नाही. तो अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. हंता विषाणूमुळे हँटाव्हायरस पल्मनरी सिंड्रोम हा आजार होतो. कोरोना विषाणूप्रमाणेच हा विषाणू हवेमार्फत पसरत नाही. हा आजार उंदीर आणि खार यांच्या लाळ, मल आणि मुत्राच्या संपर्कात आल्याने माणसांमध्ये पसरतो. दुसऱ्या कोणत्याही मार्गाने तो पसरत नाही. महत्त्वाचं म्हणजे त्याचा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला प्रादुर्भाव होत नाही.
या आजाराची लक्षणं काय असतात?
थकवा, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे, पोटात दुखणे ही सुरुवातीची लक्षणे असतात. जर उपचार केला नाही तर खोकला आणि श्वास घेण्यास अडचण येऊ शकते.
या आजारावर उपचार आहेत का?
या आजारावर एकच एक उपचार नाही, पण उपचार कसे करावेत याचे नियम आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हंता विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा त्याला लगेचच अतिदक्षता कक्षात ठेवण्यात येतं आणि श्वसन सुरळीत राहावं यासाठी ऑक्सिजन थेरपी वापरली जाते. जर एखाद्या रुग्णाला मूत्रपिंडाचा आजार आणि तपासोबत रक्तस्त्राव होत असेल, तर त्या रुग्णालां खास निरीक्षणाखाली ठेवलं जातं. काही केसेसमध्ये रुग्णांना डायलिसिसची गरज पडू शकते.
तर वाचकहो, हंता विषाणूबद्दल ज्या काही अफवा पसरत आहेत त्यावर विश्वास ठेऊ नका. हा आजार भारतात येणं जवळजवळ अशक्य आहे. सध्या तरी आपण सगळे मिळून घरी राहून कोरोनाव्हायरस संपवूया.