चीनमध्ये ९ जणांचा अनेकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाव्हायरसपासून सावधान? तो कसा पसरतो? त्याची लक्षणे काय आहेत?
स्वाईन-फ्ल्यू, इबोला, चिकनगुनिया, झिका, निपाहनंतर आता एक नवीन आजार लोकांचा जीव घेत आहे. या आजाराचं नाव आहे कोरोनाव्हायरस. चीनने त्याला वूहान व्हायरस नाव दिलंय. हा आजार चीनमध्ये सर्वात आधी २००२ साली पसरला होता. त्यानंतर २०१२ साली पुन्हा या आजाराची साथ आली होती. यावेळच्या लाटेत आतापर्यंत ९ जणांचा बळी घेतला आहे, तर ४४० लोकांना संसर्ग झाला आहे.
आजच्या लेखात आपण कोरोनाव्हायरस म्हणजे काय? तो कसा पसरतो? त्याची लक्षणे काय असतात? जाणून घेणार आहोत.
काय आहे कोरोनाव्हायरस?
कोरोनाव्हायरस हा विषाणूंचा मोठा गट असतो. हा आजार Severe Acute Respiratory Syndrome (SARS) या आजाराशी मिळताजुळता असल्याची माहिती मिळते आहे. SARS आणि कोरोनाव्हायरसच्या अनुवंशिक संरचनेत ८०% साम्य आढळून आलं आहे. हा आजार खरं तर प्राण्यांमध्ये आढळणारा आजार आहे, पण काही दुर्मिळ घटनांमध्ये तो माणसांमध्येही पसरू शकतो.
यावेळी चीनमध्ये पसरलेला कोरोनाव्हायरस एका मासळी बाजारातून पसरला आहे. सुरुवातीचे रुग्ण हे या भागातील मासळी विक्रेते आणि ग्राहक होते. सध्या या बाजाराला बंद करण्यात आलं असून विशुद्धीकरण सुरु आहे.
कोरोनाव्हायरसची लक्षणे काय असतात ?
कोरोनाव्हायरसची लक्षणे न्युमोनिया सारखी असतात. ताप येणे, श्वास घेताना अडथळा येणे, थंडी वाजणे, थकवा, सर्दी, डोकेदुखी अशी सर्वसाधारण लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे काही दिवसांपर्यंत टिकू शकतात.
Middle East Respiratory Syndrome (MERS) आजार काय आहे?
कोरोनाव्हायरस आणि SARS प्रकारातील आणखी एक आजार म्हणजे MERS. हा आजार वरच्या दोन्ही आजारांपेक्षा जास्त गंभीर असतो. याची साथ चीनमध्ये २०१२ साली आली होती. वैद्यकीय निरीक्षणानुसार दर १० रुग्णांमधल्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
आजार कसा पसरतो ?
वरती सांगितल्याप्रमाणे हा आजार प्राण्यांमध्ये आढळतो. जागतिक आरोग्य परिषदेने सांगितल्याप्रमाणे MERS आजार उंटांमधून आला आहे, तर SARS हा मांजरींमधून. माणसांमध्ये हा आजार संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क आल्यानंतर पसरतो. खोकला, शिंका, स्पर्शातून हा आजार पसरतो. बाधित व्यक्तीला शिवल्यानंतर त्याच हाताने तोंडाला, नाकाला, डोळ्यांना शिवल्यास आजार पसरतो.
उपचार काय आहेत ?
आधी तर हे लक्षात घ्या की कोरोनाव्हायरसबद्दल अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या आजारावर कोणतंही एक विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. लक्षणे काही दिवसात अपोआप निघून जाऊ शकतात. ताप, सर्दी सारख्या लक्षणांसाठी नेहमीची सर्वसाधारण औषधे सुचवली जातात. भरपूर पाणी पिणे, विश्रांती आणि झोप घेणे सुचवले जाते.
संसर्ग कसा टाळावा
गर्दीची ठिकाणे टाळा. स्वच्छ ताजे अन्न घ्या. तीन दिवस ताप न गेल्यास तपासणी करून घ्या. थोडक्याय कोणत्याही व्हायरल साथी पासून दूर राहण्यासाठी आपण जी काळजी घेतो ती घ्यावी.
कोरोनाव्हायरसबद्दल भारतालाही चिंता करण्याची गरज आहे. कारण भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मोठ्याप्रमाणात संपर्क असतो. हा आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला पसरत असल्याने तो लवकरच फक्त भारतच नाही तर जगभर पसरण्याची शक्यता आहे. भरीस भर म्हणजे २४ जानेवारीला चीनी नववर्षाच्या निमित्ताने चीनमध्ये गेलेल्या लोकांना हा आजार होण्याची मोठ्याप्रमाणात शक्यता आहे.
हा लेख लिहित असताना जपान आणि थायलंडमध्ये कोरोनाव्हायरसचे ३ रुग्ण आणि दक्षिण कोरियामध्ये १ रुग्ण आढळल्याची बातमी आली होती. जगभरात चीनमधून येणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी होत आहे. भारतानेही सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. चीनमधून भारतात येणाऱ्यांची तपासणी थर्मल स्कॅनरद्वारे करण्यात येणार आहे. भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या व्यक्तींना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.