हिवतापावर (मलेरिया) पहिल्यांदा लस आलीय. या रोगाचा जगभर काय हाहाकार आहे कल्पना आहे??
बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने RTS,S/ AS01 मलेरिया या मलेरिया म्हणजेच हिवतापावरील लसीला मान्यता दिली आहे. मॉस्कीरिक्स नावाची ही लस डास चावल्याने होणाऱ्या आजारांवरील पहिली लस आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी एक पायलट कार्यक्रमांतर्गत २०१९ पासून केनिया, घाना, मलावी या आफ्रिकन देशांमध्ये २० लाखांपेक्षा अधिक लसी दिल्या गेल्या आहेत.
दरवर्षी हिवताप किंवा मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही तब्बल ४ लाख आहे. मलेरियामुळे लहान मुलांना अधिक धोका संभवतो. WHO नुसार दर दोन मिनिटांना जगात एक बालक मलेरियामुळे मृत्यूमुखी पडत असते. जगात दरवर्षी २ लाख २९ हजार रुग्ण मलेरियाचे निघतात. यातही एकट्या आफ्रिका खंडात ९४ टक्के रुग्ण असतात.
WHOच्या २०१९ च्या आकडेवारीनुसार मलेरियामुळे होणारे अर्ध्याहून अधिक मृत्यू हे आफ्रिकन देशांमधून आहेत, तर त्यातले २५ टक्के एकट्या नायजेरियामधून आहेत. २०१९ पासून २ लाख ६० हजार बालके या आजारामुळे मृत्यूमुखी पडली आहेत. WHOनुसारच भारतात २०१९ साली हिवतापाचे ५६ लाख रुग्ण होते, तर २०२० साली ही संख्या वाढून २ कोटी झाली होती.
मलेरिया हा पॅरासाईट म्हणजे परजीवी जीव असतो. डास चावल्याने तो पसरतो. हा यकृत पेशी आणि लाल रक्त पेशींवर हल्ला करतो. मलेरिया पॅरासाईटचे १०० हून अधिक प्रकार आहेत. एखादा माणूस पुन्हापुन्हा हिवतापाला बळी पडतो, तेव्हा त्याची प्रतिकारशक्ती वाढते. यातही फक्त अतिआजारी पडण्याचे चान्स कमी होतात.
आजवर हिवताप किंवा मलेरियाचा प्रभाव कमी करण्यासाठी डास मारणे, औषधोपचार करणे असे उपाय वापरले जात होते. ही नवी लस स्पोरोझाईट फॉर्मला लक्ष्य करते, ही डास चावणे आणि हा परजीवी जंतू यकृतात जाण्याच्या मधली पायरी असते. ही लस फक्त ४० टक्के प्रभावी आहे आणि यामुळे मलेरिया पूर्णपणे नियंत्रणात आणला जाऊ शकत नाही.
ही लस आफ्रिकेच्या बाहेर मात्र वापरली जाणार नाही. कारण ही लस आफ्रिकेबाहेरच्या देशांमधील मलेरियाच्या विविध रुपांना आळा घालू शकत नाही. या लसीला आफ्रिकेत मोठे यश मिळाले आहे आणि तिला अजून प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किंमतीच्या बाबतीत पण ही लस चांगली असून रुटीन लसीला यामुळे धोका नाही.
WHOच्या म्हणण्यानुसार ही लस मलेरियाच्या १० पैकी ४ केसेस आणि गंभीर असलेल्या १० पैकी ३ बऱ्या करते. WHOच्या केट ओब्रायन यांच्या म्हणण्यानुसार या कामासाठी निधी उभा करणे हे महत्वाचे काम असणार आहे. आफ्रिकन देशांमध्ये या लसीकरणाला वर्षाला १२ बिलियन डॉलर्स एवढा खर्च येणार आहे.
गेल्या २० वर्षांमध्ये ११ देश मलेरियापासून मुक्त झाले आहेत. १) युनायटेड अरब अमिराती, २) मोरोक्को, ३) तुर्कमेनीस्तान, ४) अर्मेनिया ५) श्रीलंका, ६) किर्गीझिस्तान ७) पॅराग्वे ८) उझबेकीस्तान ९) अल्जेरिया १०) अर्जेंटिना ११) अल साल्वाडोर.
जितके नवे उपाय तितक्यात विविध रोगराई जगात अद्यापही अस्तित्वात आहेत आणि कोरोनासारखे जीवजंतू नव्याने निर्माण होतच आहेत. मलेरिया हा सर्वसामान्यपणे सगळ्यांना सहज होणारा रोग, पण तो अनेकांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरला आहे. त्याच्यावर आज आफ्रिकन देशांसाठी लस बनलीय. भारतातही पोलिओसारखेच याही रोगाचे समूळ उच्चाटन होईल अशी आशा बाळगूया!!