अमेरिकेतील व्हिक्स भारतातल्या प्रत्येक घरात कसं पोचलं? वाचा व्हिक्सचा संपूर्ण प्रवास!!
पावसाळा जसा 'नेमेचि' येतो, तसेच खास पावसाळी आजारही नित्यनेमाने येतात. यात सगळ्यात कॉमन म्हणजे सर्दी-पडसं. आपल्या सर्वांच्याच याबद्दलच्या आठवणी मुख्यत: दोन गोष्टींशी संबंधित आहेत. एक म्हणजे आलं-गवती चहा-तुळस-मिरे यांचा काढा आणि दुसरं म्हणजे व्हिक्स! आजही व्हिक्स म्हटलं की नॉस्टॅल्जीक व्हायला होतं. तो केवळ सर्दीवरचा रामबाण उपाय नाही, तर आपल्या माणसांच्या मायेच्या स्पर्शाची अनुभूती देणारं माध्यम आहे. व्हिक्सची डार्क निळ्या रंगाची, डोक्यावर हिरवी कॅप चढवलेली छोटीशी बाटली म्हणजे सर्दी पडशाने हैराण झालेल्या तमाम लोकांसाठी संजीवनी. लहानपणी नाक वाहू लागलं, चोंदलं, शिंका आल्या की आई किंवा आजी नाकावर, कपाळावर, छातीवर व्हिक्स चोळून द्यायची. चोळता चोळताच त्या जागी उबदार वाफांची संवेदना निर्माण होई. नाकातून, डोळ्यांतून उष्ण पाणी वाहू लागे. थोड्या वेळात शांत झोप लागे. उठेपर्यंत सर्दीचा प्रताप बराच ओसरलेला असायचा. घरोघरी जी काही खास औषधं असायचीच असायची, त्यात व्हिक्सचं स्थान अव्वल होतं.
पण प्रत्यक्षात प्रत्येक घराचा अविभाज्य हिस्सा बनणं आणि पिढ्यानपिढ्या आपलं स्थान कायम राखणं व्हिक्ससाठी सोपं नव्हतं. १९६४ मध्ये व्हिक्सचा भारतातल्या मध्यमवर्गीय घरात प्रवेश झाला. त्याआधी सत्तर वर्षं या ब्रॅण्डने अमेरिकेत पाय रोवले होते. भारतात ते आलं रिचर्डसन हिंदुस्तान लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून. या कंपनीचा संस्थापक ल्युन्सफोर्ड रिचर्डसन हा स्वतः फार्मासिस्ट होता. त्या काळात सर्दीवर पोटीस (औषधी वनस्पतींचं मिश्रण कापडावर थापून आणि तापवून त्या मिश्रणाचा शेक देणं) आणि व्हेपर लॅम्प (ज्यात औषधाचा वाफारा घेता येई) हे इलाज केले जात. रिचर्डसनला मात्र हे उपाय पुरेसे नाहीत असं वाटायचं. असंही म्हणतात, की रिचर्डसनची तिन्ही मुलं एकदा एकाच वेळी सर्दीपडशाने आजारी पडली. त्यावेळी हे उपाय फारसे प्रभावी नाहीत हे त्याला जाणवलं. त्यातून व्हिक्सचा १८९४ मध्ये जन्म झाला.
व्हिक्सचं स्वरूप मलमासारखं आहे. यात कापूर, टर्पेंटाइन आणि मेंथॉल हे घटक आहेत. याशिवाय अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे एक जपानी औषधी द्रव्य आहे. नक्की कोणते द्रव्य हे मात्र टॉप सिक्रेट आहे. जेव्हा व्हिक्स छातीवर चोळलं जातं तेव्हा शरीरातील उष्णतेने मेंथॉलची वाफ होते. ज्या सुखद, उबदार वाफा असतात त्या याच!
(ल्युन्सफोर्ड रिचर्डसन)
व्हिक्सचं व्हिक्स असं बारसं झालं त्याच्यामागेही इंटरेस्टिंग थिअरीज आहेत. एका थिअरीनुसार, रिचर्डसनने आपला मेहुणा आणि गुरु-मार्गदर्शक जोशुआ व्हिक याच्या स्मरणार्थ व्हिक्स हे नाव दिलं तर दुसऱ्या थिअरीनुसार, त्याला व्हिक्स हे नाव द्यावं लागलं कारण त्याचं स्वतःचं भलंमोठं लांब नाव त्या छोट्याशा बाटलीवर मावणं कठीण होतं. काहीही असो, त्या नावाने बाजारपेठ गाजवली हे नक्की. १९११ मध्ये रिचर्डसनच्या मुलाने व्हिक्सचं नाव बदलून ते व्हिक्स वेपोरब असं केलं.
सुरुवातीला व्हिक्सने लहान मुलं संभाव्य ग्राहक मानून आपलं उत्पादन बाजारात आणलं. प्रमोशनचा भाग म्हणून त्यांनी त्यावेळी लहान मुलांसाठी चक्क एक स्टोरीबुक प्रकाशित केलं. यात रिकाम्या व्हिक्सच्या डबीत राहणारी ब्लिक्स आणि ब्ली ही दोन पात्रं आजारी असलेल्या लहान मुलाला सर्दीच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी कायकाय साहसं करतात याची गोष्ट सांगितली होती.
पुढे आपलं उत्पादन मोठ्या माणसांसाठी पण उपयुक्त आहे हे लक्षात आल्यावर व्हिक्सने जाहिरातीचं तंत्र बदललं. सार्वजनिक ठिकाणी शिंकणं आणि खोकणं कसं लाजिरवाणं आहे इथपासून 'तिला' प्रपोज करताना स्वच्छ आणि स्पष्ट आवाज कशी जादू घडवू शकतो इथपर्यंत अनेक विषय घेऊन त्यांच्या 'स्टोरीज' व्हिक्सने हाताळल्या. याशिवाय रेडिओ शो सारख्या माध्यमांमधूनही व्हिक्सची जाहिरात केली.
भारतात आपला ब्रँड डेव्हलप करताना व्हिक्सने अजून वेगळी स्ट्रॅटेजी आखली. यात बाजाराला प्रत्यक्ष भेटी देणं आणि ग्राहकांशी सविस्तर चर्चा यांच्यावर अधिक भर होता. समशीतोष्ण हवामान आणि कोरडा हिवाळा अशा वैशिष्ट्यपूर्ण हवामानामुळे भारत ही व्हिक्ससाठी मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे इथे आपलं स्थान भक्कम करणं गरजेचं होतं. बाजारात वारंवार जाऊन, ग्राहकांशी प्रत्यक्ष बोलून अनेक गोष्टी कंपनीच्या संचालकांना नव्याने कळल्या. इथल्या लोकांची मानसिकता कशी आहे हे समजलं. त्याचा त्यांना ब्रँडच्या विकासासाठी फायदाच झाला. सुरतमध्ये त्यांना एका महिलेकडून चमचाभर व्हिक्स उकळत्या पाण्यात टाकून नंतर त्याची वाफ घेतल्यास ती अजून प्रभावी ठरते हे समजलं. एका ब्रॅंडने आपल्या उत्पादनाचा हटके आणि अचूक प्रकारे वापर कसा करायचा याचे धडे आपल्या ग्राहकांकडून घेतल्याचं हे अनोखं उदाहरण आहे. नंतर या कल्पनेचा जाहिरातीतही उपयोग करून घेतला गेला. पावसाळा सुरू झाला, की व्हिक्सच्या जाहिराती हमखास येऊ लागल्या.
गमतीची गोष्ट अशी, की पावसाळा वगळता, सर्दी वगैरे झालेली नसतानाही अनेकजण व्हिक्सचा वापर करू लागले. कित्येकांना त्याची जणू चटक लागली. व्हिक्स न लावल्यास झोप न येण्याची तक्रारही अनेकजण करू लागले. कानात घालायच्या कॉटन बड्सला थोडं व्हिक्स लावून त्याने कानाला मसाज केल्यास कानदुखी थांबते असा 'शोध'ही काहीजणांनी लावला. व्हिक्स किती 'मौल्यवान' आहे यावर अजून एकदा शिक्कामोर्तब झालं.
खुद्द व्हिक्सनेदेखील केवळ मलमसदृश उत्पादनावरच न थांबता 'गले की खिचखिच' मिटवणारी व्हिक्सची त्रिकोणी गोळी, व्हिक्स ऍक्शन ५०० टॅबलेट अशी इतर उत्पादनंही बाजारात आणली. याशिवाय या ब्रॅन्डचं अजून एक प्रसिद्ध उत्पादन म्हणजे क्लीअरसिल हे पिंपल्सवरचं मलम. सौंदर्याबद्दलचं सर्वसामान्य आकर्षण लक्षात घेत पिंपल्सने हैराण झालेल्या किशोरवर्गाला यात लक्ष्य करण्यात आलं. याची जाहिरात करताना अतिशय हँडसम असे तरुण निवडण्यात आले आणि त्यांना शाळांमध्ये पाठवून क्लीअरसिलचं प्रमोशन केलं गेलं. आपल्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी आकर्षक, सुंदर असे चेहरे निवडून कंपनीने तरुण वर्गात सुंदर दिसण्याचं, आणि भविष्यात आकर्षक जोडीदार निवडण्याचं स्वप्न पेरलं.
एकीकडे नवनव्या कल्पना, उत्पादनं, त्यांचं मार्केटिंग याबद्दलचं ब्रेनस्टॉर्मिंग सुरू होतं आणि त्याच वेळी दुसरीकडे सरकारी कायदे आणि नियम यांच्या कचाट्यात व्हिक्सचा जणू गळा घोटला जात होता. किमतींवर सरकारी निर्बंध होते. विक्रीचे आकडे मोठे असले तरी नफ्याचं मार्जिन कमी होतं. त्यामुळे प्रॉडक्शन कॉस्ट कमी करणं हा एकच उपाय होता. त्यातूनच व्हिक्सचा पेट्रोलियम बेस जाऊन त्याऐवजी स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असणारी तेलं वापरण्यात येऊ लागली. याचदरम्यान १९८३ मध्ये जास्त नफ्याचं मार्जिन मिळावं यासाठी देशभरातल्या केमिस्ट्सनी व्हिक्सवर बहिष्कार घातला. यामुळे कंपनीची अवस्था अजूनच नाजूक झाली. यातून कंपनीला बाहेर पडायला मदत केली ती भारत पटेल या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मुत्सद्दीपणाने.
त्यांनी व्हिक्सचं आयुर्वेदिक उत्पादन म्हणून रीब्रॅंडिंग करायचं ठरवलं. यावेळी आयुर्वेदिक आणि युनानी प्रणालीत वापरायची औषधं, होमिओपथी औषधं आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट, १९४० या कायद्याच्या कक्षेबाहेर असलेली औषधं या तिन्ही घटकांचा वापर टाळून आपलं उत्पादन विकसित करायचं ठरवलं. सुरुवातीला या प्रस्तावाला थोडाफार विरोध झाला, पण अखेर त्याचं महत्त्व सगळ्यांना पटलं. रीसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे टी. राजगोपालन यांनी व्हिक्सचे घटक आयुर्वेदिक आहेत या गोष्टीला पुष्टी दिली आणि अखेर व्हिक्स हा ब्रँड आयुर्वेदिक उत्पादन म्हणून कायदेशीररित्या रजिस्टर झाला. आयुर्वेदिक उत्पादन करणारी कंपनी असल्याने व्हिक्सची आपोआपच लायसन्स, एक्साईज ड्युटी, किमतीवरील नियंत्रण या सगळ्यापासून सुटका झाली. आतापर्यंत फक्त केमिस्टच्या दुकानात मिळणारं व्हिक्स आता इतर दुकानांमध्येही उपलब्ध होऊ लागलं. परिणामतः व्हिक्सची बाजारपेठ तिपटीने विस्तारली. १९८५ मध्ये रिचर्डसन हिंदुस्तान लिमिटेड प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या ताब्यात गेलं. तोवर भारत व्हिक्स वेपोरब या उत्पादनाचा आघाडीचा निर्माता बनला होता.
पाश्चिमात्य ब्रँड आणि त्याला भारतीय मुलामा अशा स्वरूपात साकारलेलं व्हिक्स हे अनोखं प्रॉडक्ट. अनोखं अशासाठी, की त्याचे इतर बरेच फायदे आहेत. पिंपल्स घालवण्यासाठी, त्वचेवरील जखमा बऱ्या करायला, डास - माश्या हटवण्यासाठी, स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी, टेनिस एल्बोच्या वेदना कमी करण्यासाठी व्हिक्स वेपोरबचा वापर केला जातो. आहे की नाही बहुगुणी? तुम्हाला याचे अजून काही हटके उपयोग माहिती असतील तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.