computer

सावध व्हा... रोजच्या आहारातील हे पांढरे पदार्थ तुमचं आरोग्य धोक्यात आणू शकतात!

आपल्या खाण्या-पिण्यावरून आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. दैनंदिन जीवनात आपण खात असलेले बरेच पदार्थ आपल्यासाठी पोषक असतात, पण अशाच रोजच्या खाण्यातल्या काही पदार्थांमुळे आपलं आरोग्य धोक्यातही येऊ शकतं. हे पांढरे पदार्थ पाहून तुम्ही म्हणाल की हे पदार्थ तर मी रोज खातोय...! असं असेल तर मग वेळीच सावध व्हा! 

या पांढऱ्या पदार्थांच्या यादीत समावेश होतो साखर, पांढरे मीठ, पांढरा भात, ब्रेड, मैदा, पास्ता आणि अशा अनेक बेकरी उत्पादनांचा ज्यांच्यात मैदा आणि साखरेचा सर्रास वापर केला जातो. यापैकी बहुतांश पदार्थ हे आपल्या रोजच्या आहारातले अविभाज्य घटक आहेत. पण रिफाइन आणि प्रक्रिया केलेले हे पांढरे पदार्थ आपल्या आरोग्याचा घात करू शकतात. 

आज प्रत्येक भारतीय घरातील आहारात ब्रेड, कुकीज, ब्रेड सॅन्डविच, ब्रेड-बटर, ब्रेड-जाम, केक या पदार्थानी आपली हक्काची जागा बनवलीय. पण गव्हाच्या पिठाला रिफाईंड केल्यानं त्यातले फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स नष्ट होतात. कोणतेही पोषक घटक नसलेला हा मैदा त्यातल्या कर्बोदकांमुळे आपल्या वजनवाढीला आणि रक्तातील साखरेचा समतोल बिघडवायला कारणीभूत ठरतो.

 

आपल्या जिभेचा आणखी एक लाडका पदार्थ म्हणजे साखर. २०२० या वर्षात भारतीयांनी तब्बल २ कोटी ७० लाख मेट्रिक टन इतकी साखर फस्त केलीय. गेली ५ वर्षे हे प्रमाण बदललेलं नाही. या साखरेतूनही आपल्याला कोणतेही पोषक घटक मिळत नाहीत. साखरेच्या सेवनानं शरीराला फक्त ग्लुकोजच्या स्वरूपात भरपूर कॅलरीज मिळतात ज्या आपलं वजन तर वाढवतातच, पण मधुमेह, हृदयरोग, नैराश्य, आणि कॅन्सरसारख्या भयावह आजारांनाही आमंत्रण मिळतं. तेव्हा साखर, साखरयुक्त पदार्थ आणि सॉफ्टड्रिंक्सचं सेवन शक्य तितकं मर्यादित ठेवा. याऐवजी तुम्ही फळांचा पर्याय निवडू शकता; जिथे तुम्हाला गोड खाण्याच्या आनंदासोबत अनेक पोषक घटकही मिळतील.

आपल्या आहार संस्कृतीत जवळपास प्रत्येक पदार्थ हा मिठाशिवाय अपूर्ण समजला जातो. मीठ हे आपल्या शरीरासाठी गरजेचंही आहे. पण मिठाच्या अतिसेवनामुळं उच्च रक्तदाब, किडनीविकार, हाडांची ठिसूळता असे अनेक आजार होतात. चिप्स, वेफर्ससारख्या अनेक हवाबंद पदार्थ दीर्घकाळ खाण्यायोग्य ठेवण्यासाठी त्यांच्यात मिठाचा वापर होतो. याचबरोबर भात खाल्ल्याशिवाय आपल्याला तृप्तीचा ढेकर येत नाही. पण पॉलिश केल्यामुळं यातूनही फायबर, प्रोटीन, मिनरल्स, आणि व्हिटॅमिन्स नष्ट झालेले असतात. यातल्या ग्लुकोज आणि कर्बोदकांमुळे भाताचं अतिसेवन मैद्यासारखंच आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. याऐवजी तुम्ही आपल्या आहारात ब्राउन राईसचा समावेश करू शकता.

हे सगळे दुष्परिणाम आजपर्यंतच्या अनेक अभ्यासांमधून मांडले गेलेले आहेत. पण सगळेच पांढरे पदार्थ काही हानिकारक नसतात. फ्लॉवर, कांदा, लसूण, काजू, नारळाचं दूध, पांढरे मासे, कमी फॅटचे दूध, तीळ, अंडी, खोबरे, दही, मशरूम, मुळा... असे अनेक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. शेवटी पदार्थाच्या रंगावरून त्याचा चांगले-वाईटपणा न ठरवता त्यातून आपल्याला किती पोषण मिळतं हा विचार करणं गरजेचं ठरतं. 

अभ्यासांमधून हेच दिसतं की प्रक्रीया आणि रिफाइण्ड केलेले बहुतांश पदार्थ हे कमी उपयुक्त आणि जास्त अपायकारक असतात.  त्याचबरोबर आपण ते किती प्रमाणात सेवन करतो हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळं आपलं स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी तुमच्या आहारपद्धतीत वेळीच योग्य तो बदल करा.

 

आणखी वाचा:

फळांवर फवारणी केलेले किटकनाशक घालवायचा हा सर्वोत्तम उपाय आहे !!

आपल्या अन्नात कोण विष कालवतंय ?? अमेरिकेत हे आधीच होऊन गेलंय. वाचा ८७०० खटले असलेल्या एका कंपनी बद्दल !

सबस्क्राईब करा

* indicates required