computer

ऑक्सिजन प्लांटच्या व्यवसायात नवीन संधी उपलब्ध झाली आहे....पण त्यापूर्वी हे महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या !

सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या दुसऱ्या लाटेत प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा. भारताची लोकसंख्या आणि त्यातून कोरोना बाधितांची संख्या बघता ऑक्सिजनची मागणी मोठ्याप्रमाणात वाढणार हे साहजिक होतं. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक देशांनी भारताला मदत केली. ऑक्सिजन प्लांटपासून ते लिक्विड ऑक्सिजनपर्यंत पुरवठा करण्यात आला.

या सगळ्या धामधुमीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती ही की ऑक्सिजनचं उत्पादन हा एक मोठा व्यवसाय होऊ शकतो. हा व्यवसाय तर आहेच पण या माध्यमातून कित्येक लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. म्हणूनच आज बोभाटा मेडिकल ऑक्सिजन गॅस सिलिंडर व्यवसायाबद्दल काही महत्त्वाची माहिती देणार आहे. ही माहिती आवडली तर शेअर करायला विसरू नका.

भांडवल

मेडिकल ऑक्सिजन गॅस सिलिंडर प्लांटच्या व्यवसायाचं एकूण भांडवल हे त्या प्लांटच्या ऑक्सिजन निर्मितीक्षमतेवर अवलंबून असतं. मागील वर्षभरात जवळजवळ १५० ऑक्सिजन प्लांट्सचे टेंडर आरोग्य मंत्रालयाकडे आले होते. त्या सगळ्यांची क्षमता १०० ते ३२०० लिटर प्रत्येकी मिनिट होती. हिशोब काढायचाच झाला, तर दिवसाकाठी २४ सिलेंडर ऑक्सिजन उत्पादन क्षमता असलेल्या प्लांट्सच्या उभारणीसाठी ३३ लाखांचं भांडवल लागतं. हे उभारणीचं काम काही आठवड्यातच पूर्ण होऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे आजच्या घडीला देशभरात २५ विक्रेते महिन्याकाठी २ ते २० प्लांट्स सहज उभारून देऊ शकतात.

तंत्रज्ञान

ऑक्सिजनला उच्च दबाखाली स्थिर करण्यासाठी जिओलाइट्स, कार्बन. Molecular sieve या सारख्या घटकांचा वापर केला जातो. यातून मिळालेले ऑक्सिजन पूर्णपणे शुद्ध नसते. त्यात ऑक्सिजनचं प्रमाण १०० नसतं. आता ही बातमी तुम्हाला धक्कादायक वाटू शकते पण हेच सत्य आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी पुरवल्या जाणाऱ्या ऑक्सिजनमध्ये ९० ते ९६ टक्के ऑक्सिजन असतो तर उरलेला भाग आर्गन आणि नायट्रोजन वायू असतो. क्रायोजेनिक तंत्रज्ञानाने मिळवलेले ऑक्सिजन जास्त शुद्ध असल्याचे मानले जाते. या तंत्राने मिळवलेले ऑक्सिजन इस्रोपासून इतर इतर अनेक व्यवसायात वापरला जातो.

परवाना मिळवणे

ऑक्सिजनचा व्यवसाय सुरु करणे सहज सोपे नाही. यासाठी रितसर राज्य सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. कारण हे काम लोकांच्या आरोग्याशी निगडित आहे. राज्य सरकारकडून परवानगी घेतल्यावर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. याची माहिती मग स्थानिक प्रशासनाला द्यावी लागते. याचे कारण असे की, ऑक्सिजन व्यवसाय चालवण्यासाठी जे मानक ठरवण्यात आले असतात ते पूर्ण होत आहेत की नाही यावर स्थानिक प्रशासन लक्ष ठेऊन असते.

ऑक्सिजन सिलेंडरच्या किमती

साधारणपणे ७५ लिटरच्या सिलेंडरसाठी ५५०० रुपये मोजावे लागतात. एका मोठ्या हॉस्पिटलला प्रत्येक महिन्याला ५ लाखांपर्यंतच्या ऑक्सिजनची आवश्यकता असते. कोरोना संकटामुळे हे सर्वसाधारण गणित कोलमडलं आहे. ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली असल्याने तेवढ्याच मोठ्या ऑक्सिजन प्लांटची गरज भासू लागली आहे.

धोका

ऑक्सिजन प्लांटचा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्यातला एक धोकाही जाणून घ्यायला हवा. ऑक्सिजन मोठ्या दाबाखाली ठेवले जात असल्याने ते ज्वलनशीलही असते. त्यामुळे सिलेंडर हाताळताना अत्यंत काळजीने काम करणे आवश्यक आहे.

तर, वाढती ऑक्सिजनची मागणी बघता ऑक्सिजन प्लांट उभारणे हे नवीन व्यवसाय उभारू इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. फक्त कोरोना काळातच नाही तर भविष्यातही ऑक्सिजनचा व्यवसाय अनेकांचे प्राण वाचवेल यात शंका नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required